भावार्थ रामायण बालकांड अध्याय ५

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

बालकाण्ड

॥ अध्याय पाचवा ॥

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

कौसल्येचे डोहाळे :

पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।

डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥

कथेचे अनुसंधान असे की मागच्या अध्यायात कौसल्येने डोळे उघडले की लगेचच राजा डोहाळे विचारण्यासाठी सावधान झाला.

कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।

दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ॥ २ ॥

कौसल्येच्या गर्भात प्रभू श्रीराम असल्यामुळे कौसल्या श्रीरामस्वरुपावर आहे व राजा संसारींक प्रवृत्तीने पुत्रलोभार्थी आहे या प्रेमपुर्वक दोघांचा संवाद व डोहाळे ऐका.

राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।

वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥

राजा दशरथ म्हणतो हे प्रिये तुला काय आवडते,तुझे डोहाळे काय आहे ते मला कोणताही संभ्रम न ठेवता सांग. 

येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।

अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥

राजाचे बर बोलणे ऐकून कौसल्या बोलू लागली मी संपुर्ण राम आहे माझ्यात कशाचा भ्रम?मी पुरुषोत्तम देवांचे दु:ख दुर करण्यासाठी अवतरलो आहे.

ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।

आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥

कौसल्येचे बोलणे ऐकून राजाला शंका आली आणि म्हणू लागला हिला काय झाले.हे कौसल्ये जरा सावध हो आणि तु कोण आहेस जरा पहा.

येरी म्हणे मी नव्हे स्त्री ना पुरुष । नर वानर ना राक्षस ।

ईशाचा ज्ओ निज ईश । परम पुरुष श्रीराम ॥ ६ ॥

राम रुप झालेली कौसल्या बोलू लागली मी स्त्री किंवा पुरुष नाही मी नर किंवा वानर नाही सर्व देवांचा देव परमपुरुष श्रीराम आहे.

राजा म्हण तन्वंगी । काय झालें तुजलागीं ।

कैंचा भ्रम भरला अंगीं । पाहें वेगीं मी कोण ॥ ७ ॥

तिचे बोलणे ऐकून राजा म्हणू लागला तुला काय झाले आहे?कसला भ्रम तुझ्यामध्ये भरला आहे लवकर बघ माझ्याकडे मी कोण आहे मला ओळख.

येरी म्हणे माझ्या ठायीं । मी तूं ऐसे उरले नाही ।

अधिष्ठान जे विदेही । आत्मा पाहीं श्रीराम ॥ ८ ॥

राजाचे बोलणे ऐकून कौसल्या म्हणते आता माझ्या ठिकाणी मी आणि तु हे उरलेच नाही जे विश्वाचे अधिष्ठान आहे जे देहधारी नाही ते अधिष्ठान सर्वांचा आत्मा म्हणजे श्रीराम मी आहे.

दशरथ म्हणे कौसल्ये । माझें तुझें जैं लग्न झालें ।

तैं रावणें अति विघ्न केलें । ते विसरलीस कैसेनी ॥ ९ ॥

दरशथ कौसल्येला देहभानावर आणण्यासाठी प्रयत्न करतोय कोसल्ये तुला आठवत का?तुझं आणि माझं लग्न झाले त्यावेळी आपल्या लग्नाला रावणाने विरोध केला होता.ते कसकाय विसरलीस?


रावणाचे नाव ऐकतांच :


नांव ऐकोनि रावण । येरी म्हणे दे दे धनुष्यबाण ।

करूं लंकेचें निर्वाण । मारूं दारुण राक्षस ॥ १० ॥

रावणाचे नाव ऐकल्याबरोबर कौसल्या म्हणते दे दे मला धनुष्यबाण लवकर दे लंका उध्वस्त करून मोठमोठे राक्षस मारून टाकूया.

पाचारा वनींचे वनचर । मुकुट कुंडलें द्या अलंकार ।

राज्या देवोनि धरा छत्र । वानभार चालवा ॥ ११ ॥

वनातील वनचरणांना बोलवा,मुकुट कुंडले देऊन सुग्रिवाला राजा करा त्याला छत्रधरा आणि सगळी वानर लंकेवर आक्रमणासाठी चला.

केउता गेला रे हनमंत । अंगद सुग्रीव जांबवंत ।

अखूनि रावणाची मात । जगाआंत उरलीसे ॥ १२ ॥

हनुमान कोठे गेला,अंगद , सुग्रीव,जाबवंत,कुठे आहेत?आणखी देखील जगात रावणाचे नाव शिल्लक आहे का?

अहो वज्रदेही निजगडा । पुच्छें घालोनियां वेढा ।

लंका जाळा ते भडभडां । पाडा तुडतुडां राक्षस ॥ १३ ॥

वज्रदेही बलवान हनुमंता शेपटाचा वेढा लंकेला द्या आणि भडभड लंका जाळून टाका तडतड राक्षसांना पाडा असं माता कौसल्या बोलत आहेत.

अमित पाचारा वानर । शिळीं बुजा रे सागर ।

पाडा पाडा रे नगर । निशाचरवस्ती जे ॥ १४ ॥

अगणित वानरे बोलवा,दगडांनी सागर बुजवून टाका आणि जिथे राक्षस राहतात ते गाव पाडून टाका.

केउते गेले रे जुत्पती । लंका उलथा रे हाताहातीं ।

पाडा पाडा चारी भिंती । दुर्ग किती आम्हांसी ॥ १५ ॥

कुठं गेले रे माझे वानर लंका उलथून टाका,लंकेच्या चारही बाजूंनी असलेल्या भिंती पाडून टाका आम्हा वानरांच्या पुढे लंका किती आहे?

आगड भेदा रे चोहटा । पांडू लंकेच्या त्रिकूटा ।

मारूं रावणा अति दुष्टा । स्वधर्मवाटा रुंधित ॥ १६ ॥

रावणाला लंकागड भेदून टाका,लंकेचे त्रिकूट पाडून टाका आणि रावणाला मारून टाकूयात ज्या रावणाने स्वधर्माच्या वाटा बंद केल्या होत्या त्या रुंद करूयात सर्वांना सुखाने स्वधर्माचे आचरण करणा येईल अशी परिस्थिती निर्माण करुयात.

बाण घेवोनि स्वांगें । छेदूं कुंभकर्णाचे टांगे ।

भेदूं रावणाची सर्वांगे । भिडतां मागें मी न सरें ॥ १७ ॥

मी हातात बाण घेऊन कुंभकर्णाची तंगडे तोडून टाकतो रावणाच्या सर्वांगात बाण मारतो आता रणभूमीवर मी मागे हटणार नाही असे कौसल्या माता बोलू लागल्या.

राक्षसांच्या शिरकमळीं । खेळूं लंकेपुढें चेंडूफळी ।

साजुक रुधिरांच्या कल्लोळीं । तृप्त कंकांईं करूं आजी ॥ १८ ॥

राक्षसांची मुंडके कापून लंकेपुढे त्यांची चेंडूफळी खेळूयात.राक्षसांचे ताजे रक्ताचे पाट चे पाट कंकाळीला देऊन तृप्त करुयात.

तोडा नवग्रहांची बेडी । सोडा देवांची बांधवडी ।

उभवा रामराज्याची गुढी । आज्ञा धडफुडी तिहीं लोकीं ॥ १९ ॥

नवग्रहांची बेडी तोडून टाका,देवाची बांधवडी तोडा आणि जगात राज्याची गुडी उभी करावी हि त्रिभुवणाला माझी आज्ञा आहे.

पाचारा बिभीषण पवित्र । करा राज्याभिषेक धरा छत्र ।

लंका दिधली स्वतंत्र । यावचंद्रस्र्यपर्यंत ॥ २० ॥

दुष्ट राक्षसाला मारले आता पवित्र असणाऱ्या माझ्या बिभीषणला बोलवा त्याचा राज्याभिषेक करा त्याच्यावर छत्रधरा माझ्या बिभीषणाला मी जोपर्यंत चंद्र सुर्य आहेत तोपर्यंत लंका दान दिली असं माता कौसल्या बोलत आहेत.

नासा रे जगाचीं दुःखें । त्रैलोक्य भरारे हरिखें ।

दुमदुमित विश्व सुखें । परम परुरुषें श्रीरामें ॥ २१ ॥

जगाची दु:ख नासवा,त्रैलोक्य सगळीकडे आनंदाने भरुन टाका श्रीरामांच्या कृपेने सर्व विश्वसुखाने दुमदुमून गेले पाहिजे.

नामें कळिकाळासी शिक । यम पराङ्‌मुख कांपती ॥ २२ ॥

माझं फक्त नाव जरी घेतले तरी कळीकाळाला शिक्षा करता येईल एवढं सामर्थ्य येईल यमसुध्दा नामधारकाला घाबरून जाईल.

जो वाचे उच्चारी रामनाम । त्याचे पुरवावे सकळ काम ।

हरावे जन्ममरणश्रम । सहज सम करावें ॥ २३ ॥

जो मुखाने रामनाम घेईल त्यांचे सर्व काम पुरवावेत त्यांचे जन्म मृत्यू चे दु:ख नष्ट करावे सहज सर्वांना माझ्या समान करावे.

नित्य जपे जो रामनाम । तो जाणावा मजचि सम ।

पुरुषांमाजी पुरुषोत्तम । सकळ नेम तेणें केले ॥ २४ ॥

जो नित्य रामनाम जप करेल तो माझ्याच समान समजावा तो पुरुषांमध्ये पुरुषोत्तम आहे असे समजावे त्याने सर्वनेम केले असे समजावे.

रायासी पडली आशंका । पोटीं विवसा आली देखा ।

कीं गर्भींच उठली ताटका । सिस्थिया सुखा अंतरलों ॥ २५ ॥

प्रवृत्ती धर्मानं राजा साशंकित झाला राजाला वाटू लागले पोटाला विवसी आली की काय का?गर्भातच ताटली की काय?या गर्भसुखाला मी आंतरलो असं राजाला वाटू लागले.

येरी म्हणे रे सुमित्र नेटका । अझूनि कैंची री ताटका ।

छेदूनियां बाणें एका । जनाच्या सुखा अवरोधी ॥ २६ ॥

राजाच्या मुखातून ताटका हा शब्द कौसल्येने ऐकला आणि म्हणू लागली लक्ष्मणा अरे आणखी ताटका कशी जिवंत आहे तिला एका बाणात मारुन टाकूया हि लोकांच्या वाटा आवडणारी आहे त्या वाटा मोकळ्या करुयात.

राजा म्हणे न चले मंत्र । गुणिया पाचारा विश्वामित्र ।

येरी म्हणे केउता गेला सुमित्र । आला विप्र यागासी ॥ २७ ॥

राजा म्हणू लागला कोणते मंत्रतंत्र चालणार नाहीत भुतं मोठं आहे त्यामुळे ज्याचा गुण येतो असे गुणवान श्री विश्वामित्रांना बोलवावे.विश्वामित्र शब्द ऐकला की लगेचच माता म्हणतात लक्ष्मण कुठे गेला अरे लक्ष्मणा विश्वामित्र यज्ञाकार्यासाठी आले आहेत.


वेगें बाणे दे कां बहुवस । विंधूनि मारूं मारीचबाहूंस ।

आणि राक्षसां करूं नाश । हाहाहूहू करिताती ॥ २८ ॥

लक्ष्मणा लवकर मला भरपूर बाण दे आपल्याला बाण लावून मारीच सुबाहुस मारून भरपूर राक्षस मारुयात हि राक्षस हाहा हूहू करत यज्ञात बाधा आणत आहेत.

राजा करिताहे स्मरण । परशुराम अवतार जाण ।

त्याचेनि नांवे हतो दारुण । महद्‌भूत जाण संचार ॥ २९ ॥

कौसल्येच्या बोलण्यातून राजाला वाटले भुतं जास्तच मोठ आहे हे भुत काढण्यासाठी आपण भगवान परशुराम यांना बोलावूया.

येरी म्हणे ऐकें गा जमदग्न्या । धनुष्य भंगिले म्यां प्राज्ञा ।

विचारीं ब्राह्मणा सर्वज्ञा । जाई तू अज्ञा तपासी ॥ ३० ॥

परशूरामाचे नाव ऐकताच कौसल्या गर्भातून श्रीराम बोलतात हे जमदग्नीच्या मुला तुला सांगतो मी स्वयंवराच्या ठिकाणी शिवधनुष्य तोडले आहे तुला काय करायचे ते कर ..पण तुला सांगतो तु ब्राह्मण आहेस सर्वज्ञ आहेस तुला समजते तु आता शस्त्र सोडून दे आणि तपश्चर्या करायला जा ही तुला माझी आज्ञा आहे.

हिचिये देहीं संचाराचा ताठा । मुखीं सुटलासे फांटा ।

कायसे डोहळे कटकटां । नेणों पोटा काय आलें ॥ ३१ ॥

राजाला वाटू लागले हिच्या देहात ताठा चढला आहे म्हणून हिच्या मुखाला फाटा फुटला आहे म्हणजे हिला बडबडी सुटली आहे हि काहीपण बोलत आहे.आता कशाचे डोहाळे माझ्या पोटाला काय आले आहे काही कळत नाही असे दशरथाला वाटू लागले.

वेगीं पाचारा वसिष्ठा । पंचाक्षरी तो अदटा ।

परीक्षा करील तो श्रेष्ठा । सकळ वरिष्ठा तो गुरू ॥ ३२ ॥

आता राजानं विचार केला आणि सेवकांना आज्ञा दिली लवकर वशिष्ठांना बोलवा ते पंचागण जानण्यात चतूर आहेत तो परिक्षा करेल ते श्रेष्ठ सद्गुरू आहेत.

येवोनि वसिष्ठ जंव पाहे । तंव ते राममय जाली आहे ।

म्हणे धन्य धन्य वो माये । वंदावे पाय इयेचे ॥ ३३ ॥

जवळ येऊन वसिष्ठ पाहतात तर कौसल्या संपुर्णत:राममय झाली आहे खरोखरच माते कौसल्ये तु धन्य धन्य आहेस आता तुझे चरण वंदन करतो म्हणत वशिष्ठजी कौसल्येचा चरणावर डोके ठेवतात.

आदरें पाहूं गेला दृष्टी । चित्तचैतन्या पडली मिठी ।

हर्षे बाष्प दाटे कंठी । पडिला सृष्टीं मूर्छित ॥ ३४ ॥

आदर वाटला देव पाहण्यासाठी वशिष्ठांनी कौसल्येच्या नजरेला नजर मिळवली कौसल्येच्या पोटात असलेल्या चैतन्यघन प्रभु श्रीरामांचे चैतन्य तेज व वशिष्ठांचे चित्त एक झाले आनंद वाटला ह्रदयात राम प्रगटले कंठात सबाष्प प्रेम दाटले आणि वशिष्ठ धाडकन जमिनीवर मुर्छीत पडले.

नेत्रीं अश्रूंचिया धारा । रोमा फरकती स्वेदांकुरा ।

अंग कांपतसे थरथरां । अवस्था मुनीवरा अनिवार ॥ ३५ ॥

वरिष्ठांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले शरिराचे केस फिरकू लागले केसांच्या मुळाशी असलेल्या छिद्रातून घाम आला शरिर सुखाने दाटू दाटू भरले असल्याने थरथर कापू लागले ऋषींची अवस्था अनिवार झाली.

राजा म्हणे कांही न चाले येथें । गुणिया ग्रासिला भूतें ।

कोण सोडवील यातें । म्हणोनि चित्तें व्याकुळ ॥ ३६ ॥

हे पाहून राजा म्हणतोय कौसल्येला खुप मोठ्या भुताने ग्रासले असल्याने त्याच्यावर काहीच उपाय चालत नाही काय करावे या भुताने वशिष्ठाला सुध्दा झपाटले आता वशिष्ठाला कोण?सोडवेल या चिंतेने राजाचे चित्त व्याकूळ झाले.


दशरथाची कौसल्येविषयी चिंता :


म्हणे कौसल्ये आवरूं । कीं वसिष्ठां सावध करूं ।

ऐसा जाजावे नृपवरूं । धांवा थोर पोकारी ॥ ३७ ॥

व्याकूळ झालेला राजा म्हणतोय मी काय करू आता बडबडी सुटलेल्या कौसल्येला आवरु का मुर्छित पडलेल्या वशिष्ठाला सावध करू अशा विचाराने राजा जाजाऊन गेला आणि मोठमोठ्याने धावारे वाचवारे अशा हाका मारू लागला.

श्रावणावधाचे क्लेश । सोसिले म्यां असोस ।

पुढां तेचि बहुवस । वसिष्ठदोहत्येचे ॥ ३८ ॥

राजा म्हणू लागला श्रावण बाळाच्या हत्येनंतर मी बरीच असह्य दु:ख भोगलीत परत माझ्या समोर ब्रम्ह हत्येचं पाप उभं राहतं की काय वशिष्ठाचा जिव गेला तर मला ब्रम्ह हत्येचे पाप लागेल या चिंतेने राजा धावा धावा म्हणू लागला 

अगा विधातिया श्रेष्ठा । काय लिहिले अदृष्टा ।

भूतें ग्रासिले वसिष्ठा । दोष मोठा मज घडला ॥ ३९ ॥

हे श्रेष्ठ असलेल्या ब्रम्हदेवा माझ्या अदृष्ठात असं काय लिहीलय की चक्क वशिष्ठालाच भुताने छपाटल आहे असा कोणता दोष माझ्याकडून घडला मला समजत नाही.

यज्ञ केला म्यां पवित्र । कुळीं पावेन सुपुत्र ।

तंव माझारी हे चरित्र । कैंचें विचित्र वोढवलें ॥ ४० ॥

माझ्या मुळामध्ये चांगली मुले जन्माला यावी म्हणून मी पवित्र असा यज्ञ केला परंतू आता त्याचे फळ मिळायची वेळ आली असताना हे आतमध्ये कोणतं विघ्न आले म्हणून दशरथ रडू लागला.


कुलगुरूंचे आश्वासन :

ती अवस्था जिरवोनि पोटीं । वसिष्ठे उघडिली दृष्टी ।

राव झोंबला कंठीं । सृष्टी उफराटी पैं जाली ॥ ४१ ॥

वशिष्ठ ऋषी श्रीराम स्वरूपाशी एकरुप झाले होते ती ब्रम्ह अवस्था वशिष्ठांनी पोटत गिळून घेतली आणि दृष्टी उघडली वशिष्ठ साधव झाल्याबरोबर राजाचा जिवात जीव आला राजाने वरिष्ठांना कडकडून मिठी मारली.आणि ऋषी ब्रम्ह अवस्थेतून पुन्हा सृष्टीमध्ये आले म्हणजे जिव अवस्थेवर जागे झाले.

स्वामी वसिष्ठा तुजही बाधा । हे तों गोष्टी न घडे कदा ।

पुत्रसुखाआड आपदा । भाग्यमंदा आम्हांसी ॥ ४२ ॥

एवढ्यात घाबरलेला राजा वशिष्ठांना म्हणू लागला गुरुदेवा तुम्हाला भुताची बाधा होणे हि गोष्ट कधीच शक्य नाही परंतू हे कशे झाले यात तुमचा दोष नाही काहीतरी माझंच भाग्य खोटं आहे मी मंद भाग्य आहे मला मुलगा होणार नाही जाऊद्या परंतू तुम्ही सावध झालात यांचा आनंद आहे दुसऱ्या ब्रम्ह हत्येपासून मला देवानं वाचवले.

वसिष्ठ म्हणे भाग्य श्रेष्ठ । पोटीं आले वैकुंठपीठ ।

पुरुषोत्तम जाला रे प्रकट । दैवें उत्कट कौसल्या ॥ ४३ ॥

घाबरलेल्या राजाला वशिष्ठ म्हणू लागले अरे राजा तु मोठा भाग्यवान आहेस वैकुंठाचा मालक तुझ्या पोटाला आलाय.सर्व जगातील सर्वोत्तम पुरुष परमात्मा तुझ्या पोटी प्रकट होत आहेत उत्कट मोठं दैव कौसल्येच आहे.

जे जे कांही हे वदली । ते जाण पां ब्रह्मबोली ।

ते ते ख्याती करील भली । सुदशा आली सूर्यवंशा ॥ ४४ ॥

आता जे जे काही कौसल्या बोलली आहे ती बडबड नसून त्यातील प्रत्येक शब्द खरा आहे ती सर्व ख्याती तुझा मुलगा ब्रम्हाडांचा बाप करेल दशरथा सुर्यवंशाचे चांगले दिवस आले आहेत.

मुनिजनांचे ध्येय ध्यान । कीं देवांचे देवतार्चन ।

जगाचा जगज्जीवन । राम निधान प्रत्यक्ष ॥ ४५ ॥

सर्व देवांची देवपुजा,सर्व ऋषी ज्याचं ध्यान करतात ज्याला मिळवणं सर्वांच ध्येय आहे तो जगताला जागवणारा जगज्जीवन प्रत्यक्ष श्रीराम प्रकट झाला आहे दशरथा.

राया तुज नकळे सर्वथा वर्म । उदरा आलें परब्रह्म ।

धन्य धन्य आमचे कर्म । पुरोहितधर्म ये वंशी ॥ ४६ ॥

राजा तुला वर्म समजले नाही त्यामुळे घाबरलास तुझ्या पोटाला परब्रह्म आले आहे.आजपर्यत आम्ही केलेलं तुमच्या घराच पुरोहित कर्म धन्य आहे कारण आम्ही ज्याची सेवा केली त्याच वंशात भगवान प्रकट होत आहेत.

चरणीं उद्धरील शिळा । परणील जनकाची बाळा ।

आनंदवील लोकां सकळा । राम जिव्हाळा जीवाचा ॥ ४७ ॥

प्रभु लिला करतील पायाच्या स्पर्शाने दगडाचा उध्दार होईल सिता स्वयंवर जिंकतील सर्वांना आनंद देतील कारण प्रत्येकाच्या जिवाचा जिव्हाळा आहे.

याचेनि नामें मुक्ति फुकटा । नगरी नेईल वैकुंठा ।

राम म्हणता पापिष्ठा । गती उत्कृष्टा देईल ॥ ४८ ॥

दशरथा याच फक्त नाव घेतलं तरीही फुकट मुक्ती मिळेल,हा संपूर्ण आयौध्येला वैकुंठाला घेऊन जाईल.फक्त राम जरी म्हटलं तरीही अतिशय पापिष्ठ असलेल्या माणसालासुध्दा उत्कृष्ट गती मिळेल.

धन्य धन्य सूर्यवंश । धन्य धन्य अयोध्येचा देश ।

धन्य धन्य कौसल्यागर्भवास । जगन्निवास पै आला ॥ ४९ ॥

राजा सुर्यवंश धन्य धन्य आहे या आयौध्येचा देश धन्य आहे कौसल्येचा गर्भ धन्य धन्य आहे ज्या गर्भात ज्याच्यात सामावते त्याला गर्भात सामावून घेतले आहे तो गर्भ धन्य धन्य आहे.

धन्य धन्य एथींचे जन । धन्य धन्य दशरथा तुझें मन ।

धन्य धन्य आमचे नयन । राम निधान देखती ॥ ५० ॥

आयौध्येचे लोक धन्य धन्य आहेत दशरथा तुझं मन धन्य धन्य आहे आमचे डोळे धन्य आहेत ज्या डोळ्यांना जगाचं निधान श्रीरामाला पाहणार आहेत.

दशरथाचा आनंद :

ऐसें वसिष्ठ सांगता । टक पडिले दशरथा ।

आठवू नाठवे चित्ता । पुत्रकथा ऐकोनि ॥ ५१ ॥

वशिष्ठांनी मुलाबद्दल हे बोललेल राजानं ऐकलं आणि राजाला टक लागली आता चित्ताला दुसरं काहीच आठवत नाही चित्त पुत्र कथा ऐकून रामरुप झाले.

ऐकतां ज्याचेनि श्रवणें । पडले तनमना भुलवणें ।

काय होईल त्याचेनि दर्शनें । ते सुख जाणे तो एक ॥ ५२ ॥

संत एकनाथ महाराज सांगतात फक्त जन्मणाऱ्या मुलाची किर्ती ऐकली तर राजाची हि अवस्था झाली आहे ज्यावेळी त्याच दर्शन होईल त्यावेळी काय होईल ?त्याच्या पुत्ररूपातील दर्शनाचे सुख एकटा दशरथालाच समजेल.

रामनामेंवीण कथा । ज्याल्या होत्या अनाथा ।

त्या केलिया सनाथा । कौसल्यासुताचेनि नामें ॥ ५३ ॥

जगामधील सर्व कथा रामनामाशिवाय अनाथ झाल्या होत्या त्या सर्व कथा कौसल्येच्या मुलाच्या नावाने सनाथ होतील म्हणजे ज्या कथेत किर्तनात किंवा कोणत्याही कार्यक्रमात श्रीरामाचे नाव नाही ती कथा अनाथ आहे ती रामनामाने सनाथ झाली असं सांगतात.

ऐकतां कौसल्येचे डोहळे । दसह्रथासी सुखसोहळे ।

तेणें परमानंद उचंबळे । वंदी तत्काळें वसिष्ठासी ॥ ५४ ॥

कौसल्येचे डोहाळे राजाला आता समजले आणि आनंद झाला त्याच्या मनात परमानंद उचंबळून आला दशरथ वशिष्ठांना पायावर लोटांगण घालू लागले.

एका जनार्दन विनंती संतां । ऐसी डोहळियांची वार्ता ।

ऐकतां उल्लास होय चित्ता । त्याची जन्मकथा अवधारा ॥ ५५ ॥

ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज साधूसंत श्रोत्यांना विनंती करतात डोहळ्यांची कथा ऐकून चित्ताला आनंद झाला आता प्रभु श्रीरामाची जन्म कथा ऐका असं पुढील कथाश्रवणाचे निमंत्रण देतात.

एका जनार्दनीं परम । डोहळियांचा अति संभ्रम ।

अजन्मा जन्मेल श्रीराम । तो जन्मसंभ्रम अवधारा ॥ ५६ ॥

एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात की कौसल्येच्या डोहाळ्याचा संभ्रम होता आज आपण ऐकले आता जन्माला न येणारा देव जन्माला येणार आहे हा सुद्धा संभ्रमच आहे कारण जन्माला न येणारा आहे आणि जन्माला येणार आहे त्याच्या जन्माची कथा आनंद देणारी आहे सर्वांनी लक्ष देऊन ऐकावी.

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां

कौसल्यादोहदनिरूपणं नाम पंचमोध्यायः ॥ ५ ॥

॥ ओंव्या ५६ 




Comments

Popular posts from this blog

भावार्थ रामायण बालकांड अध्याय १

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३

बालकांड अध्याय ६