बालकांड अध्याय ६
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड
॥ अध्याय सहावा ॥
श्रीरामजन्मप्रसंग
॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥
श्रीरामाचा जन्मकाळ :
श्रीरामाचा जन्मप्रभाव । अजन्मा जन्मेल रामराव ।
पाहूं आला सुरनरसमुदाव । तो नवलाव पाहूं आले ॥ १ ॥
संत एकनाथ महाराज सांगतात श्रीरामांच्या जन्माचा प्रभाव म्हणून देव लोक, मनुष्य समुदाय सगळेच ज्याला जन्म नाही अशा अजन्मा असलेल्या श्रीरामांच्या जन्माचं आश्चर्य पहायला आले.
प्रसूतिसमय कौसल्येसी । तंव अयोध्येच्या चौपासीं ।
विमानें दाटलीं आकाशीं । विबुध वेगेंसी पैं आले ॥ २ ॥
माता कौसल्येच्या प्रसुतीची वेळ आली तेव्हा आयौध्येच्या परिसरात सगळीकडे आकाशात विमानांची दाटी झाली सर्व देव लोक लगबगीनं लवकर आले.
सूर्यवंशा येईल रघुनाथ । यालागीं मध्यान्हीं आला आदित्य ।लग्नीं साधिला अभिजित । जन्ममुहूर्त राघवा ॥ ३ ॥
आपल्या वंशात भगवान जन्माला येणार आहेत याचा आनंद झाल्याने सुर्य डोक्यावर येतो तेच श्रीरामाचे जन्म मुहूर्त आहे.
वक्री अतिचर होऊन । वेगीं चालोनि आपण ।
केंद्री आणि उच्चस्थान । तेथे ग्रहगण स्वयें आले ॥ ४ ॥
प्रत्येक ग्रह ज्या स्थितीत माणसाला अनुकूल असतात त्या अनुकूल राशीमध्ये लगबगीने ग्रह आले आकाशात ज्या ठिकाणाहून ते उच्च स्थानी असतात ते तिथे आले.
शुद्धसुमनीं वसंत ऋतु । मधुमास अति विख्यातु ।
शुक्ल पक्ष नवमी आंतु । जन्म रघुनाथ पावला ॥ ५ ॥
शुध्द अशाप्रकारची सगळीकडे वृक्षांना फुले लागली आहेत अशा वसंत ऋतूमध्ये चैत्र महिन्यात शुक्ल पक्ष नवमीला श्रीरामचंद्र प्रभुंचा जन्म झाला.
सुखरूप प्रसूती व श्रीरामांचे प्रकटन :
श्रीराम स्वयें अयोनी । तो स्पर्शला नाहीं जन्मयोनी ।
कौसल्या सन्मुख देखे नयनीं । आश्चर्य मनीं विस्मित ॥ ६ ॥
श्रीराम हे अयोनीजा असून त्यांचा नाशवंत जिथं जन्मतात अशा योनीद्वाराचा स्पर्श झाला नाही कौसल्येने प्रकट झालेले श्रीराम बघीतले आणि तिला आश्चर्य वाटू लागले.
नाहीं लागली वेण उद्भट । नाहीं दुखिंनलें गर्भपोट ।
स्वयं राम जाला प्रकट । अति उद्भट निजतेज ॥ ७ ॥
भगवंताचा जन्म झाला त्यावेळी आईला कळ लागली नाही किंवा तिचे पोटही दुखले नाही.श्रीराम स्वतः अतिशय तेजासह प्रकट झाले.
स्वप्रकाशें स्वलीला । निजतेजें अति सोज्वळा ।
घवघवित घनसावळां । दें डोळां कौसल्या ॥ ८ ॥
स्वप्रकाशाने स्वलिलेने तेजस्वी असणारे राम अतिशय स्वज्वळ घवघवीत घन अवस्थेतील सावळ रुप कौसल्येने डोळ्याने बघीतले.
जेणें निजतेज विलासे । मीतूपणाचा ठावचि पुसे ।
जग आत्मत्वें प्रकाशे । सोहळा उल्लासे परमानंदे ॥ ९ ॥
ज्या निजतेजाचा आनंद घेतल्यानंतर मी आणि तु ह्या द्वेत भावनेच अधिष्ठान मुळासकट संपते जसे सुर्य उगवल्यानंतर अंधार संपतो तसे संपुर्ण जग आत्मत्वाने प्रकाशमान असल्याची अनुभूती होण्याचा सोहळा अतिशय उल्हासात ,परमानंदात संपन्न होतोय.
ज्या तेजाचे निजनिर्धारें । अहं सोहं समूळ विरे ।
त्रैलोक्य ब्रह्म्त्वें अवतरे । सर्वांगी भरे स्वानंद ॥ १० ॥
भगवंताच्या तेजापासून आनंद मिळवण्याचा जर निर्धार केला तर अहं,सोहं,हि अवस्था संपुर्णत: विरघळून जाते आणि भगवंत स्वरुपाशी एकरुप झाल्यामुळे त्रिलोक ब्रम्ह स्वरुपानेच भरलेले असल्याची अनुभूती येते ज्यामुळे सर्वांगात स्वानंद भरलेला आहे.
ज्या तेजाचे निजनिष्ठे । विषयांचें विषयत्व आटे ।
बंधमिक्षाचे बिरडें फिटे । स्वयं कोंदाटे परब्रह्म ॥ ११ ॥
ईश्वरीय चैतन्यावर ंइष्ठा ठेवली तर जे विषय विषासारखे कटू व जिवाला वेदना देणारे असतात त्यांच त्रास देण्याचे विष आटून जाते म्हणजे संपते व जे विषय मोक्ष मार्गातील सर्वात मोठे बंधन आहे जे एखाद्या वासराला बिरडे फोडून बांधतात तसे जिवाला बांधून परमार्थीपासून दुर ठेवतात त्या विषयांची बंधन भगवंताच्या तेजावर निष्ठा ठेवल्याने फिटून जाते व सगळीकडे ब्रम कोंदाटून भरले जाते असे सांगतात.
ज्या तेजाचिये दीप्ती । रवि चंदू हे स्वयें हरपती ।
ते तेज प्रकाशे ब्रह्मस्फूर्ती । निर्विषयस्थिती सुख कोंदे ॥ १२ ॥
त्या ईश्वरीय तेजाच्या दिप्तीपुढे सुर्य , चंद्र हे स्वतःहुन हारपतात सुर्य आहे की नाही हे ओळखू येणार एवढं तेज प्रकाशमान झाले त्या तेजाकडे बघीतले की ब्रम्ह स्पुर्ती निर्माण होते ज्या आनंदापूढे विषय संपतात व निर्विषयस्थितीत सुख कोंदून जाते.
देखे ठकराचें निजठाण । दों हातीं धनुष्यबाण ।
करावया राक्षसनिर्दळण । ओढी काढोनि विन्यांसें ॥ १४ ॥
कौसल्या माता पाहू लागल्या भगवान दोन हातात धनुष्य घेऊन राक्षसांचे निर्दळण करण्यासाठी कानापर्यंत दोरी ओढून उभे आहेत.
करावया बंदिमोचन । सुरनरग्रहां अभयदान ।
अभयहस्तें संपूर्ण । विराजमान रघुवीर ॥ १५ ॥
देवांना बंदी मुक्त करून सुर,नर, किन्नर, नवग्रह सर्वांना संपुर्ण अभय देण्यासाठी हात भिऊ नका असे अभय देण्यासाठी धरून प्रभू धनुष्य घेऊन कौसल्या मातेसमोर विराजमान झाले आहेत.
करितां रामनामस्मरण । जीवांस करावया ब्रह्मपूर्ण ।
स्वयें कृपाळू आपण । वरदहस्तें पूर्ण आश्वासीत ॥ १६ ॥
फक्त तोंडानं जय श्रीराम जरी म्हटलं तरीसुद्धा जिवाला पुर्ण ब्रम्ह करतो असे आश्वासन देण्यासाठी देवाने एक हातवर केला आहे परमकृपाळू भगवान वरदहस्त देत भक्तांना आश्वासन देत आहेत संसारभवसागराला घाबरू नका फक्त माझं भजन केलात तरी सुद्धा मी तुमचा उध्दार करतो.
सामुद्रिक चिन्हें :
चरणांतरी आरक्त शोभा । लोपित बाळसूर्याचा प्रभा ।
जगातें भुलवी जगदंबा । तेही चरणरंगा भूलली ॥ १७ ॥
भगवंताच्या तळपायाचे संत एकनाथ महाराज वर्णन करतात पायाची लालबुंद शोभा दिसू लागली ज्या पुढं बाळसुर्याचे तेजसुध्दा कमी पडेल ज्या तेजाने जगाला भुलवणारी लक्ष्मी तिला भुलवले.
माया अतर्क्य सर्वांसी । वेदशास्त्रीं प्रसिद्धी ऐसी ।
तीही भुलली चरनांसी । जाली दासी सर्वदा ॥ १८ ॥
जगाला भुलवण्याच्या कामात माया प्रसिद्ध आहे असे वेद, शास्त्र पुराणांनी सांगितले आहे ज्या माझ्याबद्दल तर्क करता येत नाहीत.ति माया,लक्ष्मीसुध्दा देवाच्या पायाला भुलली आणी सदा सर्वकाळासाठी भगवंताची दाशी झाली.
सनकादिक आणि विरक्त । तेही चरणारविंदी आसक्त ।
भ्रमर होवोनियां संतत । आमोद घेत स्वानंदें ॥ १९ ॥
भोगविलासातून अतिशय विरक्त असणारे सनकादिकसुध्दा भगवंताच्या चरणांची एवढी आसक्ती ठेवतात की चरणकमळावरील जणू भुंगे बनून सतत भगवंताच्या चरणसेवेतच अडकून तेथील आमोद घेतात.
चरणांचिया सामुद्रिका । न वर्णवे वेदेंशेषादिकां ।
ध्वजवज्रांकुश ऊर्ध्व रेखा । पायीं पद्म देखा यवांकित ॥ २० ॥
भगवंताच्या चरणाच्या सामुद्रीकेबद्दल वेदशास्त्र सुध्दा तर्क करू शकत नाहीत वर्णनात ते फिके पडतात.भगवंताच्या चरणावर ध्वज,वज्र व अंकुश व वरच्या दिशेने रेषा आहेत.पायाचा जो खोदगा असतो तो फुलासारखा , इंद्रधनुष्यात रेषा असतात तसा दिसतो.
चरणांतळी आरक्त शोभा । बरवंटी शुद्ध श्याम प्रभा ।
। इंद्रधनुष्य मिरवे नभा । तैसी शोभा शोभत ॥ २१ ॥
भगवंताच्या चरणाखाली तळपायाची शोभा रक्तासारखी लालबुंद आहे व त्याची खाली पडणारी सावली काळी असून जणू काही आकाशात इंद्रधनुष्य मिरवते तशी त्याची शोभा दिसू लागली.
उपासका यंत्र पूर्ण । तैसी घोंटी पैं त्रिकोण ।
दोहीं पायी नीळवर्ण । विरामजामन् शोभती ॥ २२ ॥
पायाची जे घोटे असतात ती जणू एखादे त्रिकोणी चरख्या सारखे उपासना यंत्र असते तसे त्रिकोणी घोटे दिसू लागले दोन्ही पायांची घोटे निळ्या रंगाची छान दिसू लागली.
यंत्रपीठीं वर्ण प्रबळा । तैशा पोटरिया सकळा ।
अक्षररूपें त्या निसळा । अति निर्मळा सकुमारा ॥ २३ ॥
उपासना यंत्रावर जशी नाना प्रकारची वर्ण असतात तशा भगवंताच्या पायाच्या सगळ्या पोटऱ्या आहेत अक्षररुपाने त्या निसळ आहेत अतिशय निर्मळ आणि सुकुमार तेजस्वी दिसतात.
जानुचक्रें अति वर्तुळ । जैसे आरसे निज निर्मळ ।
निजात्मरूप सकळ । तेथें तत्काळ प्रतिविंब ॥ २४ ॥
भगवंताच्या गुडघ्यावरील वाट्या गोल वर्तुळाकार आहेत जसा आरसा निर्मळ असतो तशा आहेत जिथे आपण निजात्मस्वरुप आहोत याचे लागलीच प्रतिबिंब दिसते(म्हणजे जिवाला ब्रम्हरुपाची जाणीव होते.
कर्दळीस्तंभाचे शुद्ध सार । त्याहूनि मांडिया सुकुमार ।
लागतां खुपती चंद्रकर । ऐसें अरुवार जघनद्वय ॥ २५ ॥
कर्दळीचे खांब हे अतिशय सरळ व मृदू असतात जणू त्या खांबाचे सार आहे.त्यापेक्षासुध्दा अतिशय कोमल, सुकुमार भगवंताच्या मांड्या आहेत ज्यांना अतिशय शितल असणारे चंद्र किरण सुध्दा टोचलील एवढे अरुवार भगवंताच्या दोन मांड्या आहेत असे संत एकनाथ महाराज सांगतात.
श्रुति आणि स्मृति । दोहीं पायीं वांकी गर्जती ।
अंदुवा जाण निश्चिती । उपवेद स्थितिविभागें ॥ २६ ॥
श्रुती आणि स्मृती या जणू भगवंताच्या चरणातील वाकी आहेत ज्या वेदांच्या उपवेदस्थितीबद्दल गर्जना करताहेत...म्हणजे चैनाचा आवाज हा चारवेद वाचल्या सारखा येतोय.(म्हणजे त्यातून भगवंताचे वर्णन होत आहे)
वेदांत शुद्ध शास्त्र थोर । चरणीं गर्जती तोडर ।
धन्य दैत्यांचे शरीरभार । चरणीं निरंतर रुळती तोडरी ॥ २७ ॥
भगवंताच्या पायातील वाक्यांनी केलेली गर्जना त्या आवाजाला वेदांत शास्त्र म्हणतात जे शुध्द शास्त्र आहे.राक्षसांची शरिर धन्य धन्य आहेत कारण भगवान त्यांना तुडवताना भगवंताच्या पायाचा ,भगवंताचे वर्णन करणाऱ्या वाक्यांचा त्यांना स्पर्श होतो.
जगाचें गुह्य श्रीराम पूर्ण । त्या गुह्याचें गुह्य लक्षण ।
तेथें पावों शके कोण । तें सुख संपूर्ण जानकी भोगी ॥ २८ ॥
सर्व जगाचे गुह्य प्रभु श्रीराम आहेत त्यांच्या गुह्यतेची गुह्य लक्षणापर्यंत कोणीही पोहचू शकत नाही.ते सुख माता सिता उपभोगतात असे एकनाथ महाराज सांगतात.
स्वयें अछिद्रत्वें मनोहर । आणि पुढिलांचे आच्छादी छिद्र ।
तोचि कांसेसीं पीतांबर । तेजें दुर्धर देदीप्यमान ॥ २९ ॥
स्वतः छिद्र नसल्याने अतिशय मनोहर दिसणारा आणि समोरच्याच्या अंतकरणातील छिद्ररुपी म्हणजेच शंका रुपी चित्राला संपवणारा तोच भगवंताच्या काशेला लागलेला अतिशय तेजस्वी दुर्धर दैदिप्यमान असा पितांबर आहे.
पीतांबर श्रीराम कांसेसीं । लागला निजभावेसी ।
तेणेचि तो अनायासीं । गुह्यगुह्यासीं पावला ॥ ३० ॥
पितांबर श्रीरामाच्या कासेला भाव धरून लागला त्यामुळे तो कोणताही सायास न करता भगवंताचा अतिशय गुह्य असलेल्या गुह्यापर्यंत पोहोचला.
नाभी सोल अतिशयेसीं । सहस्राब्द बुडतां ब्रह्मासीं ।
ठावो न निघे तयासी । होवोनि कासाविसी वरता आला ॥ ३१ ॥
भगवंताची नाभी अतिशय खोल असून 1000 वर्ष त्यामध्ये ब्रह्मदेव बुडाला तरी त्याला सुद्धा किती खोल आहे याचा ठाव ठिकाण लागला नाही तेव्हा अतिशय कासावीस होऊन भगवंताच्या कृपेने तो वर आला.
तेव्हां श्रीरामें आश्वासोनी । बैसविला कमळासनीं ।
त्यासी चतुःश्लोकी उपदेशूनी । श्रेष्ठ करोनि स्थापिला ॥ ३२ ॥
नाभी मध्ये बुडालेल्या ब्रह्मदेवाला भगवंतांना आश्वासन दिल आणि कमळाच्या असणावर बसवून त्याला वर घेतल्यानंतर चतुश्लोकाचा उपदेश करून श्रेष्ठ बनवून त्याची विधीस्थापना केली.
तें श्रीरामाचें नाभिस्थान । बैसला देखे कमळासन ।
त्याचे हृदयीचें महिमान । बोलतां मौन श्रुतिशास्त्रां ॥ ३३ ॥
ते भगवंताचे नाभीस्थान ज्या ठिकाणी ब्रह्मदेव कमळावर बसलेले आहेत त्या भगवंताच्या हृदय स्थानाचे महिमान बोलत असताना श्रुतीशास्त्राला सुद्धा मौन पडले.
ज्याचे हृदयचिदाकाशीं । आकाश हरपे स्वकार्येंसी ।
सिद्ध पावले त्या ठायासी । चिदंशासी एकत्वें ॥ ३४ ॥
ज्याच्या हृदया आकाशामध्ये आकाशी स्वकार्याची म्हणजे त्याच्या तत्वासहित कार्यासहित हरपून जाते एवढं ज्याचं हृदय आकाश मोठा आहे त्याच्या हृदयाच्या ठिकाणी सिद्ध ऋषी एकत्र होऊन चीद अंशाने पोहोचले.
तेथें अनन्यत्वें मुनिजन । जडोनि जाले अभिन्न ।
तेअंचि हृदयीं पदक पूर्ण । गुणेंवीण ल्यालासे ॥ ३५ ॥
त्या भगवंताच्या हृदय स्थानाच्या ठिकाणी मुनिजन अनन्यत्वे म्हणजे तुझा भाव न ठेवता चिटकून राहिले अभिन्न झाले तेच भगवंताच्या छातीवरती हृदय स्थानावरती पदक आहे जे भगवान गुणाशिवाय धारण केलेले आहेत असे सांगतात.
सूक्ष्म माजाची जी अति थोरी । अभिमान होता केसरीं ।
देखोनि राममध्यकुसरीं । लाजें रामभरी ते जाले ॥ ३६ ॥
छोटी कंबर असल्याचा अतिशय अभिमान सिंहाला होता परंतु त्याने ज्यावेळी रामचंद्र प्रभूंची कंबर बघितली तेव्हा त्याला लाज वाटली आणि तो वनाला निघून गेला.
पहावया श्रीराममध्यरचना । अभिमानत्याग पंचानना ।
मेखळा अंगवूनि अंगवणा । मध्यभागीं जाणा चित्रत्वें जडले ॥ ३७ ॥
वनाला गेलेल्या सिंहाला रामचंद्र प्रभूंची कंबर बघण्याची इच्छा झाली आणि त्यांना अभिमानाचा त्याग केला आणि खाली मान घालून भगवंताच्या कमरेच्या मध्यभागी चित्र स्वरूपाने चिटकला आहे.
जो अपरंपार अनंत । त्यास अनुभवी आकळित ।
तेवी मेखळेमाजि रघुनाथ । दिसे समस्त आकळिला ॥ ३८ ॥
जो भगवान अपरंपार आहे अनंत आहे त्याला अनुभवाने साधुसंत आकळत असतात तशा पद्धतीमध्ये तो करदोडा भगवंताच्या पूर्ण कमरेला बांधलेला आहे.
जालिया निजवस्तुप्राप्ती । सकळ वृत्ति उपशमती ।
तेवीं क्षुद्रघंटिकांची पंक्ती । जे मेखळेप्रती अधिमुख ॥ ३९ ॥
निज वस्तूची प्राप्ती झाल्यानंतर सर्व ज्या काही वृत्ती असतात त्या उपशमतात म्हणजे शांत होतात अशा प्रकारे ज्या काही घंटी का आहेत त्या करदुड्याला खाली मुख घालून शूद्र घंटिका पंगतीमध्ये उभे आहेत अशा पद्धतीचा भाव नाथ महाराज व्यक्त करतात.
नाना मतांचा जितमेळा । त्याची किंकिणी ज्वाळमाळा ।
यापरी विचित्र लीळा । कटीं मेखळा शोभत ॥ ४० ॥
देव कसा याबद्दलची जी काही नाना प्रकारची वेगवेगळी मतं असतात त्या मत म्हणजेच किमतीने जाळ माळा या विचित्र पद्धतीमध्ये करदोळ्याला शोभू लागलेले आहेत.
पितांबराचे उभय भाग । दोन्ही भांगी मुक्तलग ।
तेणें अंगाचा फिटला पांग । अंगींच अव्यंग निजांगशोभा ॥ ४१ ॥
पितांबराच्या दोन्ही बाजूला मुक्ताचे घोष त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याच्यामुळे अंगाचा जणू काही पांगच पेटला एवढी अभंग अवक्र शोभा भगवंताच्या अंगाची दिसू लागलेली आहे.
ज्याचें पाहतां वक्षस्थळ । सबाह्य भरित समूळ ।
तेथें वसती विजनशीळ । जन वन सकळ समसाम्य ॥ ४२ ॥
त्या भगवंताची छाती बघितल्यानंतर सभा ही आत बाहेरून भरलेली आहे म्हणजेच वजनदार छाती आहे त्या छाती वरती विजनशील राहतात ज्यांच्यासाठी जन आणि वन सारखे आहे अशी संत छाती वरती केस स्वरूपामध्ये राहतात.
पाहतां ज्याचा कंबुकंठ। वेदांची ते वाहती वाट ।
तेथोनियां होती प्रकट । स्वरवर्ण वरिष्ठ मर्यादा ॥ ४३ ॥
त्या भगवंताचा कमुकंठ बघितला तर त्यातून वेदांना वाहती वाट आहे तिथून वेद प्रगट होतात वर्ण वरिष्ठ मर्यादा वेदांची आहे.
ॐकारामाजी वर्णव्यक्ती । तेवीं मुखामाजीं दंतपंक्ती ।
चौकीचे चारी मिरवती । चिदानंददीप्ती सोलींव ॥ ४४ ॥
ओमकार पासून चार वेद उत्पन्न झाले तशाप्रकारे मुखामध्ये चार पंक्ति आहेत ज्या चिदानंदाची सोलीव दिप्ती आहे अशी दात चमकतात.
जीव शिव विभाग जनीं । तैसे देखा अधर दोनी ।
ऐक्या आले श्रीराम वदनीं । मिनले मिळणीं एकत्वें ॥ ४५ ॥
जीव आणि शिव असे विभाग आहेत त्याच पद्धतीचे भगवंताचे दोन ओठ आहेत जणू हे जीव आणि शिव रामचंद्र प्रभूंच्या मुखामध्ये एकत्र झालेले आहेत आणि एकत्वाने मिळालेले आहेत असं वाटतं.
निवटोनियां नास्तिक्य । अवक्र जें का आस्तिक्य ।
तेंचि श्रीरामचे नासिक । शोभेचे बिक शोभवी ॥ ४६ ॥
नास्तिक्य भावना संपवून कोणत्याही प्रकारची वक्रता म्हणजे शंका न ठेवता जी सरळ भगवंताच अस्तित्व स्वीकार करण्याची शुद्ध भावना आहे ती भक्ताची भावना म्हणजेच श्रीरामाचे नाशिक आहे जे अतिशय भक्ताची शोभा वाढवत.
चालता जितुका वाय जाण । तोचि श्रीरामाचा मुख्य प्राण ।
तेंचि वेदाचें जन्मस्थान । त्रिकांड पूर्ण प्रतापें ॥ ४७ ॥
नाक श्वास उच्चवास करत असताना जेवढा काही वारा जातो तोच भगवंताचा मुख्य प्राण आहे तिथूनच वेदांत जन्म झालेला आहे आणि त्रिकांडात तीन प्रकारे वेद स्वरूपाला आलेले आहेत.
चैतन्याचे देखणेपण । त्याच्या डोळां आले शरण ।
देखणें देखे देखणा होऊन । देखणेपण सबाह्य ॥ ४८ ॥
चैतन्याचे जणू काही देखणे पण सौंदर्य श्रीरामाच्या डोळ्यांना शरण आलेला आहे की काय असे रामाचे सुंदर अशा प्रकारचे डोळे आहेत राम सर्वांचे देखणे आहेत सर्वांना पाहणारे आहे म्हणून अंतर बाह्य सभाह्य देखणे श्रीरामाचे डोळे आहेत असे सांगतात.
स्वानंदे निडारली दृष्टी । चिन्मात्रेक देखे सृष्टी ।
देखणेपणा आणिली पुष्टी । दृश्य पाठी पोटी द्रष्टाच देखे ॥ ४९ ॥
स्वानंदाच्या सामर्थान निर्भय झालेली भगवंताची दृष्टी ज्ञानस्वरूपच सृष्टी पाहत आहे त्यामुळे जो काही दृष्टीचा देखनेपणा असतो तो पुष्टतुष्ट झालेला आहे त्यामुळे दिसणार दृश्य हे नाशवंत आहे आणि त्याच्या पलीकडचा ज्याच्यामुळे ते दृश्य आहे तो दृष्टाच म्हणजेच आत्मस्वरूपच त्या दृष्टीला दिसतं.
दीपामागें पडसाई । तैशा डोळ्यांमागें भोवई ।
व्यंकटी सांडोनिया पाहीं । श्रीरामदेही विनटल्या ॥ ५० ॥
जशी दिव्याच्या मागे त्याचे सावली असते तसे चैतन्य स्वरूपी डोळ्याच्या मागे भव्य आहेत प्रभूंच्या व्यंकटभावना सोडून श्रीराम देहामध्ये त्या भुवया विनटलेल्या आहेत.
जयाची विक्षेपभ्रुकुटी । रची ब्रह्मांडाच्या कोटी ।
तेथेंचि राहे व्यंकटी । अगाध दृष्टो श्रीरामाची ॥ ५१ ॥
ज्याने भुवई वाकडी केली तर ब्रह्मांड त्या ठिकाणी बनवलं जातं किंवा त्याचा विनाश होतो एवढं सामर्थ्य ज्याच्या भ्रकुटीमध्ये आहे ती भगवंताची दृष्टी आहे.
पूर्व उत्तर मीमांसा पूर्ण । तेंचि मुख्य श्रीरामश्रवण ।
श्रवणे श्रवणाचे भूषण । जें निज मंडण वेदांता ॥ ५२ ॥
पूर्व आणि उत्तर मीमांसा हे ग्रंथाचे दोन भाग असतात तेच श्रीरामचंद्र प्रभूंचे कान आहेत आणि कानाचे मुख्य भूषण जर काही असेल तर ते लक्ष देऊन श्रवण करणं जे वेदांतांचे सुद्धा मंडण आहे त्याची शोभा आहे असे सांगतात.
कुंडलें म्हणती साकार । एक म्हणती मकराकार ।
परी ते सत्यत्वें निर्विकार । श्रवणें विकार नासती ॥ ५३ ॥
भगवंताच्या कानातील कुंडलाचं वर्णन करत असताना म्हणतात की कोणी म्हणतात ते साकार आहेत म्हणजे त्याला आकार आहे तर कोणी म्हणतो तू आकार माशासारखा आहे परंतु जर सत्यत्वाने बघितलं तर भगवंताचे कुंडलही निर्वीकार आहेत म्हणजेच भगवंताची कथा कीर्तन पुराण जर श्रवण केलं तर कानाच्या माध्यमातून जीवाचे अंतकरणातील विकार नष्ट होतात.
श्रवणासी संपूर्ण । सावधानता निजभूषण ।
सावधानतेवीण जाण । भूषण तें दूषण श्रवणासी ॥ ५४ ॥
कानाचं खरं भूषण असेल तर ते सावधानतेने ऐकलं आणि सावधानते शिवाय जे काही कानामध्ये अलंकार कुंडल वगैरे घातले जातात ते कानाचे दुशन आहे.
श्रीरामाचें निजश्रवण । वेदशस्त्रांसी निज भूषण ।
तेथे रिघों न शके दूषण । पावना पावन श्रीराम ॥ ५५ ॥
आणि रामचंद्र प्रभूंचं जर श्रवण केलं तर ते वेदशास्त्राला सुद्धा भूषण अलंकृत आहे म्हणजे रामायण ऐकणं रामकथा सांगणं राम राम म्हणणं हे वेदाचसुद्धा मंडण आहे अलंकार आहे म्हणून जिथे राम म्हणतो राम ऐकतो त्या ठिकाणी कलंक कसल्याही प्रकारचा लागू शकत नाही असे पावन आणि पावन करणारे राम आहेत.
जैसें अधिष्ठान निर्मळ । तैसे देखा विशाळ भाळ ।
ज्याच्या कपाळावी वेळ/ सुर सकळ वांछित ॥ ५६ ॥
जसं मुख्य अधिष्ठान हे निर्मळ असतं तशा प्रकारचं भगवंताचे विशाळ मोठं अशा प्रकारचं कपाळ त्याच्या कपाळाची वेळ सूर सकळ सर्व वंचित म्हणजे अपेक्षित करतात पण भगवान अवतार घेऊन राक्षसाधिकांना मारल्यानंतर देव लोकांची सुटका होते अशा भावनेने ग्रंथ करते या ठिकाणी सूर म्हणजेच देवलोक भगवंताच्या भाग्याच्या वेळेची कामना करतात असे सांगतात.
उगाळोनि अहंपण । सोहं काढिलें शुद्ध चंदन ।
तेंही केले रामार्पण । चंदनाचर्चन लल्लाटी ॥ ५७ ॥
त्या भगवंताच्या कपाळावरती अहंकार उगाळून त्या अहंम भावनेतील सोहम शुद्धचंदन काढून ते रामाला अर्पण करून त्याच्या लालाटाला चंदनाचे चर्चन केलेलं आहे असं सांगतात जसं की अंतकरणातील अहंकार जस चंदन अगोदर कठोर असतो तो उगाळल्यानंतर तो मृदू होतो आणि त्यालाही रामाच्या कपाळावर लावल्यानंतर त्याचा फक्त सुगंध येतो कशाप्रकारे भगवंताच्या कपाळाला चंदनाचे चर्चन केलेले आहे असं वर्णन करतात.
आधींच तो घनसावळां । वरी टिळक रेखिला पिंवळा ।
शोभा शोभली कपाळा । सुरांसकळां स्वानंद ॥ ५८ ॥
अगोदरच रामचंद्र प्रभू घनसावळे आहेत आणि त्याच्यावर पिवळा टिळक लावलेला आहे त्याच्यामुळे भगवंताच्या कपाळाची शोभा अतिशय वाढलेली आहे ती पाहून सूर सकळ सिद्धांना आनंद झालेला आहे.
सच्चिदानंद एकमेळीं । तैसी लल्लाटींची त्रिगुण त्रिवळी ।
बोधचंदनाचे परिमळीं । पूजिला निर्मळीं निजसज्जनीं ॥ ५९ ॥
जणू काही सदचिद आणि आनंदाचा एकमेव व्हावा तशाप्रकारे भगवंताच्या कपाळावर तीन रेषा आहेत ज्या त्रिगुणांच्या तीन रेषा आहेत आणि त्रिगुण तेव्हा असतात जेव्हा बोध नसतो आणि म्हणून त्या तीन रेषांवरती बोधरूपी चंदन लावला आणि त्याचा सुगंध आणि त्याच्या सुगंधान अतिशय सुंदर निर्मळ अशा प्रकारचे भगवान दिसू लागलेले आहेत अशी पूजा सज्जनांनी केलेली आहे.
वानूं मुकुटाची महिमा । कैंची उपमा निरुपमा ।
मुकुटमणींची गरिमा । नेणे ब्रह्मा आकळूं तो ॥ ६० ॥
कपाळाचं वर्णन केल्यानंतर भगवंताच्या मुकुटाचं वर्णन सांगताहेत की कैची उपमा निरोपमा जे भगवान निरूपम आहेत ज्यांना उपमाच देता येत नाही अशा भगवंताच्या मुकुटाच वर्णन ब्रह्मदेवाला सुद्धा कळू शकत नाही.
राम मिरवी लेवूनिइ लेणें । तो श्रीराम लेणियांचे लेणें ।
जेवीं सोन सरे सोनटकेपणें । कीं सोनटका सोनेपणें सर्वत्र असे ॥ ६१ ॥
राम अलंकार लिहून मिरवतील असं नाही तर श्रीराम अलंकाराचे अलंकार आहेत.
लेणें मिरवे सगुणपण । निर्गुण भूषणाहि भूषण ।
मुळीं निर्गुणे शोभे सगुण । जेवीं लेणें सुवर्ण एकत्वें ॥ ६२ ॥
अलंकार घातल्यानंतर सगुण सौंदर्य दिसू लागलं परंतु रामचंद्र प्रभूंचं निर्गुण स्वरूप हे अलंकाराला सुद्धा भूषण आहे आणि मूळ श्रीराम हे निर्गुण आहेत जसं सोन ज्याला गुण नाही परंतु त्याचा अलंकार बनवला जातो आणि अलंकार सोन्याचा आहे म्हणून अलंकाराला किंमत असते तसं रामचंद्र प्रभूंनी अलंकार घातलेले आहेत म्हणून अलंकार सुंदर दिसत आहेत.
ऐसिया श्रीरामाच्या पोटीं । रामरूप देखें सृष्टी ।
सृष्टी सबाह्य संपुटी । देखे सृष्टी श्रीराम्ं ॥ ६३ ॥
अशा रामचंद्र प्रभूंच्या पोटात सर्व सृष्टी ही रामरुपानच भरलेली आत बाहेर दिसू लागलेली आहे.
ऐसिया देखोनि श्रीरामा । कौसल्येसी आला प्रेमा ।
त्या सुखाच्या सुखसंभ्रमा । देहधर्मा विसरली ॥ ६४ ॥
अशा श्रीरामाला बघून कौसलेल्या प्रेमाचा पान्हा आला जो सुखाचा संभ्रम आहे कारण राम ब्रह्म आहेत ब्रम्ह मुलगा झाला हा भ्रमच आहे परंतु तरीसुद्धा कौशल्या देहाच्या धर्माला विसरलेली आहे. देह धर्माला विसरणे म्हणजे काय मी एक व्यक्ती आहे मला बसावं लागतं मला बाळाला मांडीवर घ्यावं लागतं जी काही देह नावाने कर्तव्य आहेत ती सर्व विसरलेली आहे विदेह स्वरूपाला एक झाली.
अंग सर्वांगीं रोमांचित । स्वेदबिंदू रवरवीत ।
चित्त चैतन्यीं विरमत । नेत्रीं स्रवत आनंदाश्रू ॥ ६५ ॥
कौसल्याचा सर्व अंग रोमांचित झालेला आहे श्वेदबिंदू केसांमध्ये रवरवलेले आहेत चित्त चैतन्यांमध्ये विरघळून गेले आहे आणि कौसल्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले
स्वानंद न समाये पोटीं । सुखोर्मि बाष्प दाटे कंठीं ।
उन्मीलित जाली दृष्टी । पडली सृष्टी मूर्छित ॥ ६६ ॥
कौसल्येला एवढा आनंद झाला की तो पोटातच बसत नाही सुखाची उर्मी दाटून आली बाष्पकंठात दाटलं दृष्टी अर्धोन्मिलीत झाली पापण्या मचमच मचमच करू लागल्या अशातच कौसल्या जमिनीवर मुर्छित पडली.
जेंवि केळीतें झगटे पवन । तैसें शरीर कंपायमान ।
वाचेसी पडिले महामौन । देहाभिमान विसरली ॥ ६७ ॥
वारा आल्यानंतर केळी जशी फडफडते तशा प्रकारे कौशल्येच शरीर कंपायमान झालेला आहे वाचेला मौन पडलो आणि देहाचा अभिमान विसरली.
सत्वगुणाचें भरितें भरे । तें आपोआप ओसरे ।
होवोनि सावध चमत्कारें । रामनिर्धारें निर्धारीं ॥ ६८ ॥
भगवंताला बघितल्यानंतर कौशल्येला सत्वगुणाचं भरतं आलं ते आपोआप थोड्यावेळाने वसरलं गेलं कमी झालं आणि सावध झाली चित्ताला चमत्कारली आणि राम निर्धारण निर्धारू लागली पाहू लागली.
कौसल्येची विनंती व श्रीरामाचे बालस्वरूप :
येणें स्वरूपें रघुनाथा । तुज येथें प्रगट होतां ।
माझा पुत्र तूं हे कथा । लोकीं सर्वथा मानेना ॥ ६९ ॥
भगवंताला पाहून हात जोडून म्हणू लागली भगवंता या स्वरूपात जर तुम्ही प्रगट झालात तर तुम्ही माझे पुत्र आहात हे लोकांना मान्य होणार नाही.
होईन कौसल्येचा नंदन । तें आठवीं पूर्ववचन ।
ऐकोनि हांसे रघुनंदन । चमत्कारें पूर्ण तुष्टला ॥ ७० ॥
देवा तुम्ही मी कौसल्याचा मुलगा होईल असं अगोदर वचन दिलं होतं हा कौशल्याचा शब्द ऐकल्यानंतर रामचंद्र प्रभू हसू लागले आणि हसून कौशल्येवर प्रसन्न होतात.
वचन ऐकोनि तत्काळ । श्रीराम स्वयें जाला बाळ ।
बालार्कप्रभा सुनीळ । सुखकल्लोळ जननयनां ॥ ७१ ॥
होय भक्ती केला तैसा या प्रमाणे कौशल्येचा शब्द ऐकल्याबरोबर रामचंद्र प्रभू लहान झाले जशाप्रकारे बाळ सूर्याची प्रभा दिसावी तशाप्रकारे जगाला अतिशय आनंद होईल असं सुकुमार स्वरूप भगवंतांनी धारण केले.
भक्त माझें ऐश्वर्यें वोसंडी । परी चरणामृतीं पडे उडी ।
तेथें कैसी आहे गोडी । ते आवडी चाखों गेला ॥ ७२ ॥
माझे भक्त माझ्या ऐश्वर्याने ओतप्रोत भरलेले माझ्या समान असतात तरीसुद्धा माझ्या चरणांमृतावर उडी मारतो मग तिथे काय गोडी आहे हे पाहण्यासाठी भगवंतांना तात्काळ पायाचा अंगठा तोंडामध्ये घातलेला आहे.
चरणकमळींचा अंगुष्ठ । करकमळीं धरोनि स्पष्ट ।
मुखकमळीं करितां प्रविष्ट । गोडी उद्भट लागली ॥ ७३ ॥
पायाचा अंगठा हाताने धरून स्पष्ट मुखांमध्ये घालून ज्यावेळेस भगवंताने अंगठा चुकला त्यावेळेस अतिशय गोडी लागली.
आपुली आपणियां गोडी । स्वभावें फावली धडफुडी ।
तोंडींचा अंगुष्ठ न काढी । चोखी वाफ़डी चुरदुरां ॥ ७४ ॥
स्वतःची स्वतःला गोडी स्वभावाने भगवंताला लागली आणि लागल्यानंतर तोंडातला अंगठाच काढत नाहीत तर चुरचुरा चोखू लागले.
माझ्या स्वरूपाची गोडी । भक्तीं भोगिली धडफुडी ।
चरणामृतीं सुखाच्या कोडी । चोखी आवडी अंगुष्ठ ॥ ७५ ॥
माझ्या सौंदर्याची गोडी तर भक्तांनी भोगलेली आहे परंतु माझ्या चरणांमृताची गोडी कशी घेतात ते पाहण्यासाठी भगवान अंगठा आवडीने चोखू लागले.
तेंचि लक्षण बालकाचे ठायीं । अद्यापि भासतसे पाहीं ।
निजांगुष्ठ मुखाचे ठायीं । चोखी लवलाही स्वानंदें ॥ ७६ ॥
जन्मल्याबरोबर भगवान अंगठा चुकू लागली तीच आजही लहान लेकरं सहा महिन्याचे झाले की आनंदाने पायाचा अंगठा चोखतात.
सार्वत्रिक आनंद व श्रीरामांचे जातक :
यापरी रघुनंदना । देखोनि बाळभावना ।
कौसल्येसी आला पान्हा । जीवीं निंबलोणा करूं पाहे ॥ ७७ ॥
लहान मुलं सारखी लीला देवाने करायला सुरू केल्यानंतर ती पाहून कौसल्याला पान्हा आला आणि जिवाहून लिंबलोन कराव की काय असं तिला वाटू लागले.
सुरीं दुंदुभी त्राहाटिल्या भेरी । देव गर्जती जयजयकारी ।
वर्षती सुमनांच्या हारी । चराचरी आल्हाद ॥ ७८ ॥
देव लोकांनी दुदुंभी वाद्य वाजवल्याने सगळीकडे आवाजाचा जयजयकार झाला आणि देवलोकस्मनांचा वर्षाव करू लागले त्यामुळे चर आणि आचर सजीव निर्जीव सर्व आनंदी आनंद झाले.
आनंदाचे लवडसवडीं । नारदाची पडे उडी ।
सनकादिकांची आडाडी । स्वानंदें तांतडी नाचती ॥ ७९ ॥
श्री रामाचा जन्म झाल्याच्या आनंदाने तात्काळ नारदाची उड्डाण आली सनकादिक आले सर्वांनाच आनंद झालेला आहे.
सिद्ध आले श्रेष्ठ श्रेष्ठ । ऋषी आले झडझडाट ।
वेद होवोनियां भाट । अति उद्भट वानिती ॥ ८० ॥
श्रेष्ठ श्रेष्ठ सिद्ध आले ऋषी आले सर्वजण त्या ठिकाणी भगवंताचं वर्णन करता येत वेद सुद्धा भाट होऊन अतिशय मोठ्या वाणीत भगवंताचे वर्णन करू लागले.
योगी संन्यासी घनदाट । पुण्यकाळाचे दाटले थाट ।
तीर्थासी तेथें न फुटे वाट । तिहीं शरयूतट वसविलें ॥ ८१ ॥
योगी आले संन्यासी आले सर्वच त्या ठिकाणी आलेले आहेत ज पुण्यकाळ दाटून आलेला आहे तीर्थांना वाट फुटत नाही एवढी दाटी झाली सर्व तीर्थ शरयूतीराच्या ठिकाणी आलेले आहेत.
अयोध्येच्या हाटविदी । स्वये झाडिती महासिद्धी ।
रंगमाळा घालिती सिद्धी । गुढिया समाधी स्वानंदें उभविल्या ॥ ८२ ॥
अयोध्येच्या चौकात चौकात बाजाराबाजारात महासिद्धी झाडून काढतात रांगोळ्या काढतात माळा घालू लागल्या आहेत गुड्या उभारु लागलेले आहेत असे सर्व काम अष्टमहासिध्या करतात.
महासामें सुरस गाणीं । चारी मुक्ति त्या नाचणी ।
साही शास्त्रांची पेंखणी । शब्दश्रेणी स्वपक्षें ॥ ८३ ॥
सामवेद सुरस आवाजामध्ये गाणे गाऊ लागल्या चार मुक्ता नाचू लागल्या सहा शास्त्र गर्जना करू लागलेले आहेत आणि भगवंताचा पक्ष घेऊन बाजू मांडताहेत.
धर्माची पहिली पहाट । स्वानंदाची मोकळी वाट ।
सुखाची पिकली पेंठ । समयो श्रेष्ठ साधूनी ॥ ८४ ॥
भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचा जन्म हे धर्माची पहिली पहाट आहे त्यामुळे आनंदाची वाट मोकळी झाली आनंदाचे पीक पिकलं कारण श्रेष्ठ समय साधून भगवान अवतारीत झालेले आहेत.
कौसल्येसी पुत्र जाला । स्वधर्में वाधावा आणिला ।
राजा हर्षें निर्भर जाहला । वोसंडला स्वानंदें ॥ ८५ ॥
कौसल्येला पुत्र झाला स्वधर्म वाढू लागलेला आहे राजाला अतिशय आनंद झाला आनंदाने मन ओसंडून गेलं.
त्राहाटिल्या निशाण भेरी । गगन गर्हे मंगळतुरीं ।
त्रैलोक्य गर्जे जयजयकारी । घरोघरीं उल्लासु ॥ ८६ ॥
एकदाच सगळीकडे मंगल वाद्यांच्या गर्जना होऊ लागल्या त्र्यलोग्य जय जयकाराणे गर्जुन गेलं घरोघरांमध्ये उल्हास आहे.
मंगळजळीं निजनिवाडें । राजा स्नान करी वाडेंकोडे ।
तो शिंतोडा लागे जिकडे तिकडे । पूर्वज तिकडे सुखरूप होती ॥ ८७ ॥
मंगळजलाने राजा स्नान करू लागला स्नान केल्यानंतर जिकडे जिकडे शिंतोडा टाकील तिकडे पुर्वज सुखी होऊ लागले.
पूर्वज स्वयें सुखी होती । हेंचि आश्चर्य सांगो किती ।
तेणें जळे त्रिजगती । उल्लासती स्वानंदे ॥ ८८ ॥
संत एकनाथ महाराज सांगतात की राजाने पाणी टाकल्यानंतर फक्त पूर्वजच सुखी होऊ लागले या आश्चर्य नाही तर त्रिभुवन सगळं आनंदित होऊ लागलं.
पुत्रानंदे उदार दृष्टी । सवत्स गोधनांच्या थाटी ।
अश्व रथ गज धन कोटी । वांटित्आ सृष्टी मागता सरे ॥ ८९ ॥
पुत्र झाल्याच्या आनंदाने राजाची दृष्टी उदार झाले आणि गायीच्या थाटीचे थाटी अश्व रथ हत्ती आणि धन राजा वाटू लागलेला आहे मागणारा मागे सरकेल पण राजा देताना मागे सरकत नाही.
जन्म पावला रघुनाथ । उदार दानें दे दशरथ ।
मागते मागणें हरपत । होवोनि कृतार्थ मागणें विसरे ॥ ९० ॥
रामचंद्र प्रभूंचा जन्म झाला राजा दशरथ उदार होऊन दान देऊ लागला मागणाराच मागणी पण हरपल कृतार्थ झाले राम पाहून आणि मागनेच विसरले.
दशरथ म्हणे ये समयीं । जो जें मागेल ते देईन पाहीं ।
तंव मागतेचि जाले नाहीं । याचकां देहीं संतृप्ति ॥ ९१ ॥
राजा दशरथ म्हणू लागला यावेळी जो जे मागील तो ते दे परंतु मागणारे उरले नाही मागणारांच्या अंतकरणात श्रीरामाला पाहून तृप्ती झाली.
ऐसे श्रीरामपुत्र मुख । देखता रायासी परम हरिख ।
द्विज निर्भर केले देख । तृप्त याचक अति दानें ॥ ९२ ॥
असं श्रीरामच मूक पाहिल्यानंतर राजाला अतिशय आनंद झाला आणि ब्राह्मणांना सुखी केलं याचकांना तृप्त केलं भरपूर मोठे दान राजाने दिलेले आहे.
श्रीरामाचे जातक । दशरथ करी अलोलिक ।
तंव द्वितीय पुत्राचा हरिख । सद्भावें देख आणिली गुढी ॥ ९३ ॥
श्रीरामाचे जातक कर्म राजा दशरथ करू लागला तोपर्यंत दुसरा मुलगा झाल्याचा आनंद राजाला सांगितला.
सुमित्रेची प्रसूती व जन्मोत्सव :
सुमित्रा देखे स्वप्न । मज झालें पुत्ररत्न ।
जागृतीं पाहे सावधान । तंव पुत्र निधान सेजेसीं ॥ ९४ ॥
सुमित्र माता स्वप्न पाहत असताना तिला स्वप्न पडलं मला मुलगा झाला जागी होऊन बघू लागली तर बाजूला मुलगा जन्मलेला होता.
क्षीरसागरींहूनि निघाला । राम कौसल्यागर्भा आला ।
पाथीचा शेष पाठीं पावला । पाठीचा झाला सुमित्र ॥ ९५ ॥
क्षीरसागरावरून रामचंद्र प्रभू आले आणि कौसल्याच्या गर्भातून राम म्हणून जन्मले आणि क्षीरसागरात पाठीमागे झोपणारा शेष सुद्धा लक्ष्मणाच्या रूपान अवतरला.
श्रीरामासी सुष्ठु मैत्री । चालवील निजनिर्धारीं ।
सुमित्र म्हणणें यापती । सुमित्राउदरीं जन्मला ॥ ९६ ॥
श्रीरामा सोबत श्रेष्ठ श्रेष्ठ मैत्री चालवील म्हणून त्याला सुमित्रा म्हणतात जो सुमित्राच्या उदराला जन्माला असं सांगतात.
कौसल्येसी सुष्ठु मित्रा । चालवी यालागीं सुमित्रा ।
हाही आला तिच्या उदरा । सुमित्र खरा येणेंही ॥ ९७ ॥
कौशल्य सोबत श्रेष्ठ मैत्री चालवते म्हणून तिला सुमित्रा म्हणतात कौशल्याच्या पोटी असलेल्या रामचंद्र प्रभूंसोबत श्रेष्ठ मैत्री दृढ मैत्री चालवतात म्हणून सुमित्र लक्ष्मण सुमित्रेच्या पोटाला आलेले आहे.
लक्ष्मण शेषावतार । अयोनि जन्मला निर्धार ।
तोही नातळे योनिद्वार । जन्मव्यवहार स्वलीला ॥ ९८ ॥
लक्ष्मण शेषाचा अवतार आहे अयोनी त्याचा जन्म आहे तो सुद्धा योनी द्वाराला सापडलेला नाही अशा प्रकारे सोलिलेने त्यांनी जन्म घेतलेला आहे.
तें देखोनि पुत्रवदन । अष्टांगीं पावली समाधान ।
मन जालें आनंदघन । सुमित्रा संपूर्ण सुखरूप जाली ॥ ९९ ॥ ॥
त्या पुत्राचं मुख बघून अष्टंगाला समाधान झालं आनंदी आनंद झाला समित्रा सुखरूप झाली.
यावरी आनंद चढोवढीं । हर्षाचिया लवडसवडीं ।
सद्भावें उभविली गुढी । रायासी आवडी पुत्रसुख सांगे ॥ १०० ॥
आनंदाची चडावड लागलेली आहे हर्षाच्या आनंद लवडस वडीनं सद्भावानं राजाला दुसरा मुलगा झाल्याची गोष्ट सांगितली.
द्वितीय पुत्राचा प्रभाव । ऐकोनि सुखें सुखावे राव ।
घेवोनियां ऋषिसमुदाव । जातकार्था पाहों स्वानंदे आला ॥ १ ॥
दुसरा मुलगा झाल्याचे आनंद राजाला झाला आणि आनंदाने राजा ऋषी समुदायांमध्ये बसून बाळचे जातक पाहू लागला.
फोडिलीं धनाचीं भांडारें । मुक्त केलीं धान्यकोठारें ।
त्यागिली गाईंचीं खिल्लारें । लुलु दानभारें मूर्छित जाली ॥ २ ॥
धनाची धनाची भांडाराची भंडार राजानं मुक्त केली धन्य कोठार मुक्त केले गाईची खिल्लार ज्याला जेवढी न्यायची त्यांना तेवढी न्या कोणालाही बंधन नाही लोलूप असणारी माणसं वजन उचत नाही म्हणून मुर्छित पडली.
याञ्चा बुडाली दानसमुद्रीं । दरिद्र बुडालें दातृत्वपूरीं ।
माग त्यांचा दुष्काळ नगरीं । घरोघरी आनंद ॥ ३ ॥
एवढं दान झालं की याचक भावना बुडून गेली दारिद्र्य बुडून गेलं मागणाऱ्यांचा दुष्काळ झाला आणि प्रत्येकाच्या घरी आनंदी आनंद झाला.
कैकेयीस पुत्रप्राप्ती :
कैकेयी पुत्रवंती दो पुत्रीं । तिची प्रसूतीची थोरी ।
अतिशयेंसीं नवलपरी । निजनिर्धारीं अवधारा ॥ ४ ॥
कैकईला कैकयी ला दोन मुलं झाले तिच्या प्रसूतीची काही पद्धत आहे ते आश्चर्य लक्ष देऊन ऐका असं नाथ महाराज सांगतात.
कैकेयीसीं लागली सुषुप्ती । पुत्र जन्मले कैशा रीती ।
त्या पुत्रजन्माचे एख्याती । तिसीं तें स्थिती अलक्ष ॥ ५ ॥
कैकैला सुषुप्ती अवस्था लागली पुत्र कसे जन्मले हे कैकयीच्या लक्षात आलेलं नाही असं सांगतात.
एक श्रीरामाचा भाग । एक लक्ष्मणाचा विभाग ।
दोन्ही लीलाविग्रही सांग । योनीचें अंग नातळती ॥ ६ ॥
श्रीरामाचा अर्धा भाग आणि लक्ष्मणाचा अर्धा भाग दोन्ही सुद्धा लिहिला विग्रही असल्यामुळे कैकयीचे दोन्ही मुलं योनी द्वाराला आतळले नाहीत.
सख्या प्रबोधिती कैकेयीसी । दोघे पुत्र जन्मले कुशी ।
तुझी झोंप ऐसी कैसी । पुत्रसुखासी अनोळख ॥ ७ ॥
जवळच्या मैत्रिणी कैकयीला जागा करू लागल्या अग माय तुला दोन मुलं झाली तुला एवढी कशी झोप लागली पुत्र झाल्याचा आनंद तुला कसा होत नाही.
कैकेयी पाहे पुत्रमुख । हृदयीं वोसंडेना हरिख ।
सापत्नभावाचें सुख । लोकदृष्टी देख पावती जाली ॥ ८ ॥
मैत्रिणींच बोलणं ऐकून काही काही जागी झाली मुलांचे मुख बघितलं परंतु हृदयात आनंद होत नाही सापतन भावनेचा परिणाम लोक दृष्टी लोकांकडे पाहू लागले.
पूर्ण कळवळा नाही मना । स्वानंदस्नेह नयेचि पान्हा ।
दाईच्यापरी स्तनपाना । लाविले स्तना पुत्र दोनी ॥ ९ ॥
पोटामध्ये त्या मुलांबद्दल पूर्ण कळवळा नाही आनंदाने तिला पाण्याची येत नाही जसं उसनी आईस स्तनाला लावून दूध पाजते तशा पद्धतीमध्ये ती उसन्या आईसारखं दूध पाजू लागली.
सपिंडगर्भ तिचा नव्हे । परभाग गर्भें सापत्नमाये ।
तिचे स्तनपान पाहें स्वभावें दाही हे जाली ॥ ११० ॥
गर्भपिंड तिचा नव्हता दुसऱ्याच्या भागातून गर्भवती झाली होती त्यामुळे तिच्या अंतकरणात सावत्र भाव कायम होतात तिचं स्तनपान जरी ती बाळ करत असतील तर ती दायीच्या पद्धतीत माईच्या पद्धतीत नाही असं नात मला सांगतात.
पुढें सहजचि सापत्न । पुत्र नायकती तिचें वचन ।
पुत्रांचे निजसमाधान । कैकेयी जाण पावेना ॥ ११ ॥
पुढे स्वभाविकच मुलं तिचं ऐकणार नाही मग मुलांमुळे तिला समाधान मिळणार नाही.
कैकेयीची गर्भस्थिती । पुत्रद्वयाची उत्पत्ति ।
यापरि जाली प्रसूती । वाधावा रायाप्रति धाडिला तिणें ॥ १२ ॥
कैकयीला या प्रमाणे दोन मुलं झाले दोन मुलं झाल्याची वार्ता राजाकडे पाठवली.
स्नेहाचिया लवडसवडी । सकामकामाचिया आवडी ।
पुत्रद्वयाची गर्वगोडी । कैकेयी धाडी रायापासी ॥ १३ ॥
स्नेहाच्या आवडीने लगबगवीन दोन पुत्र झाल्याचा गर्व भावनेमध्ये कैकयीन राजाला निरोप पाठवला.
पुत्रद्वयाचें प्रिय जन्म । तेणें रायासी सुख परम ।
उदार हस्तें करोनि धर्म । जातककर्म तेणें केले ॥ १४ ॥
पुत्रचतुष्टयाची दशरथाला प्राप्ती :
जेंवि कां चारी पुरुषार्थ । एके काळें घरा येत ।
तेंवि चारी पुत्र दशरथ । जाले प्राप्त समकाळें ॥ १५ ॥
ज्याप्रकारे चार पुरुषार्थ एकदाच घरात यावे त्या प्रकारे दशकाला चार पुत्र एकाच वेळी प्राप्त झाले.
चहूं मुक्तींचे सुख एक । तेचि चतुर्विध होवोनि देख ।
दशरथासी द्यावया सुख । चारी अलौलिक पुत्र जन्मल ॥ १६ ॥
चारही मुक्तींच सुख एकत्र होऊन चार विभागांमध्ये राम लक्ष्मण भरत शत्रुघन या पद्धती दशरथाला सुख देण्यासाठी पुत्र म्हणून जन्माला आले.
सच्चिदानंद तिन्ही जाण । तिहींचे प्रकाशक वस्तु चिद्वन ।
तेंवि चारी पुत्र परिपूर्ण । आनंदला आपण स्वयें राव ॥ १७ ॥
सचित आणि आनंदही तीन आहेत आणि तिन्हींची प्रकाशक वस्तूची चिदगण ज्ञानस्वरूपी चैतन्य आहे ते एकच आहे तशाप्रकारे राम हे एकच आहेत आणि त्या रामाचेच चार भाग म्हणून दशरथाचे चार पुत्र आहेत हे बघून राजा दशकाला आनंद झाला.
प्रणव तेचि वेद चारी । तेवी एक वस्तु चौं प्रकारीं ।
पुत्रत्वें दशरथाचे घरीं । सुखकारी सर्वांसी ॥ १८ ॥
प्रणव म्हणजेच चार वेद आहेत तसं एकच वस्तू चार प्रकारांमध्ये रामच चार रूपामध्ये पुत्रत्वान दशरथाच्या घरी आनंद देण्यासाठी अवतरले आहे.
एक सुख नित्य निश्चिती । त्यासी बहुविध चतुष्ट्य म्हणती ।
तेचि हे चारी मूर्ति । पुत्र सुखार्थी दशरथ ॥ १९ ॥
एकच सुख आहे नित्य आहे निश्चित आहे त्यालाच बरीच जण चतुष्ट म्हणतात त्याच चतुष्ठ रुपी चार मूर्ती पुत्र स्वरूपान सुख देण्यासाठी दशरथाच्या इथं अवतरले आहेत.
जो सकळ जगाचा निज विश्राम । सकळ सुखाचा आराम ।
जो निष्कामाचा पूर्णकाम । तो श्रीराम दशरथात्मज ॥ १२० ॥
जो संपूर्ण जगाचा विश्रांती स्थान आहे सर्व सुखाचा आराम आहे आणि निष्कामना सुद्धा पूर्ण वेळ ज्याची अपेक्षा आहे असं निष्ठानांचा पूर्ण काम श्रीराम दशरथाचा आत्मज मुलगा म्हणून जन्मलेला आहे.
सकळ लक्ष्यां आलक्षण । जो सकळ लक्षणीं संपूर्ण ।
तोचि तो लक्ष्मण जाण । सुमित्रानंदन दशरथात्मज ॥ २१ ॥
सर्व प्रकारे लक्ष देऊन सुद्धा जो लक्षात येत नाही असा विलक्षण सर्व लक्षणांनी संपूर्ण जो आहे तोच लक्ष्मण सुमित्रेचा नंदन दशरथाचा मुलगा आहे.
ज्याने सकळही पदार्थ । सदासर्वदा संपूर्ण भरित ।
ते वस्तूसी म्हणती भरत । कैकेयीसुत दशरथात्मन ॥ २२ ॥
ज्याच्यामुळे सर्व पदार्थ सदा सर्वदा संपूर्ण आहेत भरलेले आहेत ती वस्तू म्हणजे भरत कैकयीचा मुलगा दशरथाचा आत्मज होय.
मनुष्य शत्रूचें हनन । करी तो अल्प शत्रुघ्न ।
भवशत्रूचे निर्दळण । करी तो शत्रुघ्न दशरथात्मज ॥ २३ ॥
मनुष्य देहरूपी जे शत्रू आहेत त्यांना जो मारतो तो सामान्य शत्रुघन आहे परंतु जन्म मरणाच्या भवदुःख रुपी शत्रूचे निर्दालन जो करतो तोच शत्रुघ्न म्हणजे दशरथाचा मुलगा.
कनिष्ठ कैकयीचे नंदन । त्यांचे नाम भरत शत्रुघ्न ।
वसिष्ठें केले नामाभिधान । चौघे जण दाशरथि ॥ २४ ॥
चारही पुत्रांचे नामकरण :
श्रीवसिष्ठें आवश्यक । केले चौघांचे जातक ।
जन्मपत्रिका केली देख । नामनिर्दोष जगद्वंद्य ॥ २५ ॥
यापरि श्रीराम आणि लक्ष्मण । भरत आणि शत्रुघ्न ।
चौघे दशरथनंदन । नामाभिधान जगद्वंद्य ॥ २६ ॥
यापरी श्रीरामाचें जन्म । सांगितला अनुक्रम ।
निरूपिले जन्मकर्म । चरित्रानुक्रम अवधारा ॥ २७ ॥
येथोनि श्रीरामाचे चरित्र । अगाध अनुपम्य पवित्र ।
धन्य वाल्मीकीचें वक्त्र । कथा पवित्र शतकोटी ॥ २८ ॥
एका जनार्दना शरण । पूर्ण जालें जन्मकथन ।
पुढें स्वानंदनिरूपण । श्रोती अवधान मज द्यावें ॥ १२९ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
श्रीरामजन्मप्रसंगनिरूपणं नाम षष्ठोऽध्यायः ॥ ६ ॥
॥ ओंव्या १२९ ॥
Comments
Post a Comment