भावार्थ रामायण बालकांड अध्याय ४

 

॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥ ॥ श्रीभावार्थरामायण ॥ बालकाण्ड॥ अध्याय चवथा ॥

॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥कौसल्येचे डोहाळे :

जय श्रीराम

ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।

नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥

मागच्या अध्यायातील कथा ऐकल्यानंतर अनेक ग्रंथ वाचण केलेले श्रोते म्हणतील की हि कथा मुळग्रंथातील नाही त्यांनी ज्ञानी जनांनी शिवरामयण पहावे असे ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात. 

स्कंद पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती मज सांगा ॥ २ ॥

कार्तिक स्वामींनी अगस्तीऋषींना प्रश्न केला की माझे आईवडील रामनाम जपतात तो श्रीराम या जगतात कोण आहे त्याची संपुर्ण स्थिती मला सांगा असा प्रश्न केला. 

तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥

त्यावेळी अगस्तीऋषी म्हणतात श्रीरामांचे वर्णन करण्यासाठी मी सामान्य आहे ज्या श्रीरामाचे वर्णन वेद करू शकला नाही तो सुध्दा मौन झाला ते वर्णन करण्यासाठी माझ्या मुखामध्ये सामर्थ्य नाही असे म्हणतात. 

तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥

कार्तिक स्वामिंना अगस्ती म्हणतात जसा तु मला प्रश्न केला आहेस तसाच प्रश्न एकदा माता पार्वतींनी भगवान शंकराना केला होता मला तो श्रीराम सांगा ज्याच श्रीरामाच तुम्ही अखंड भजन करतात. 

श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥

श्रीरामाची स्थिती काय आहे. नेमकी श्रीरामाची किर्ती काय आहे. हे संपुर्ण मला सांगा अस माता जगदंबा अतिशय आनंदाने विचारत होत्या. 

कोण श्रीरामाची ख्याती । श्रीरामाची कोण गती ।श्रीरामाची कोण उत्पत्ती । कोण त्रिजगीं श्रीराम ॥ ६ ॥

श्रीरामांची ख्याती काय आहे श्रीरामाची काय गती आहे श्रीरामाची कुठे उत्पत्ती झाली. नेमके या जगात श्रीराम कोण आहेत हे सांगावे. 

जेथें सदाशिव स्वयें वक्ता । मुख्य पार्वती स्वयें श्रोता ।ते ही शिवरामायणीं कथा । संदेहार्था पहावी ॥ ७ ॥

त्या प्रश्नाला उत्तर देताना वक्ते स्वत: श्री भगवान शंकर आहेत आणि श्रोता माता पार्वती आहेत. ती शिवरामायणातील कथा मी संदर्भ म्हणून संत एकनाथ महाराज आपल्याला देतात. ज्यांना संदेह आहे की मागच्या अध्यायातील कथा मुळग्रंथातील नाही त्यांनी भगवान शंकरांनी सांगितलेली कथा पहावी आणि भावार्थ रामायणातील कथेवर पुर्ण विश्वास ठेवावा. 

श्रीरामांची श्रीएकनाथांना भावार्थरामायणाची प्रेरणा :

तूं कैसा झालासी वक्ता । पुसाल माझी योग्यता ।तेही मी सांगेन तत्वता । सावध श्रोतां परिसावी ॥ ८ ॥

ज्ञानीश्रोते(तथाकथीत ज्ञानी ) म्हणतील की तु कसा रामायणाचा वक्ता झालास तुझी काय पात्रता आहे रामायण सांगायची तर त्यांच्या सुध्दा प्रश्नांची उत्तरे मी देतो अस संत एकनाथ महाराज सांगतात. 

मी नेणें मूळींच्या संस्कृतासी । मूर्खपण माझी मिरासी ।त्या मूर्खाच्या मुखासी । श्रीराम ऐसी कथा वदवी ॥ ९ ॥

मला मुळ संस्कृत भाषेच ज्ञान नाही, मुर्खपणा हिच माझी मिरासी आहे अस काहींना वाटत असेल परंतू तरीही माझ्यासारख्या मुर्खाकडून श्रीराम अशी कथा बोलावून घेतात. 

माझे अंगी मूर्खपण । माझें मी जाणे संपूर्ण ।न करीं म्हणतां रामायण । श्रीराम आपण कथा प्रेरी ॥ १० ॥

माझ्या अंगात मुर्खपणा आहे हे मला माहिती आहे. मी मुर्ख आहे म्हणून मी रामायण लिहीणार नाही असे सांगितले तरीही श्रीराम मला कथा लिहीण्याबद्दल प्रेरणा देऊ लागले. 

प्रेरिताही मी न करीं जाण । तंव स्वप्नामाजी रामायण ।श्रीराम विस्तारी संपूर्ण । ऊण खूण ग्रंथांची ॥ ११ ॥

श्रीरामांनी कथा लिहिण्यास प्रेरणा दिली तरीही मी कथा न लिहीता झोपलो तर श्रीराम माझ्या स्वप्नात रामायणाचा विस्तार करून सांगु लागले ग्रंथ कुठ काहि कमी आहे का? ते योग्य करून घेण्याबद्दल श्रीरामांनी सांगितले. म्हणजे भाविकांनी हि गोष्ट लक्षात घ्यावी भावार्थ रामायण हा प्रमाण ग्रंथ आहे. या ग्रंथाच्या निरुपणालाच प्रमाण मानावे. इतर रामायण ग्रंथाचे प्रमाण भावार्थ रामयणाला देऊ नये तर इतर रामायण ग्रंथाला भावार्थ रामायणचे प्रमाण देऊ शकतात. कारण सर्व रामायण ग्रंथाचे उने अधीक, कमीजास्त सर्व गोष्टी बरोबर करून श्रीरामांनी भावार्थ रामयण हा ग्रंथ लिहून घेतला आहे. 

जागृतीमाजी वर्ततां । पुढे प्रकाशे रामकथा ।दुश्चितपणें ठेवों जातां । राम तत्वता रामायण दावी ॥ १२ ॥

जागे असताना काही इतर काम करू लागलो तर श्रीराम रामायण ग्रंथ पुढे दाखवू लागले. दुर्लक्ष करून रामायण लिहायचे सोडले तर श्रीराम लगेचच मला रामायण दाखवू लागले आणि त्यांनी हा ग्रंथ लिहून घेतला. 

करूं जातां फुकट गोष्टी । त्यांमाजी रामकथा उठी ।रामें पुरविली पाठी । खिळिली दृष्टी रामायणीं ॥ १३ ॥

काही रिकाम्या गोष्टीवर चर्चा करताना त्यातच श्रीरामकथेचा विषय उठायचा आणि लगेचच माझ्याकडूनश्रीराम श्रीरामकथा लिहून घेऊ लागले यासर्वप्रकारे माझा पाठलाग करून श्रीरामांनी माझी वृत्तीच हरण करून श्रीरामकथेवरच दृष्ठी केंद्रीत करून घेतली. 

ऐसियांत न करीं म्हणता । राम चढे मीपणाचे माथां ।मग तो आपुलिया निज सत्ता । वदवी कथा बलात्कारें ॥ १४ ॥

अशातही मी कथा लिहीणार नाही अस म्हणायचो तर श्रीराम माझ्यातील मी या परिछिन्न भावनेवर जाऊन तिला व्यापकाच्या अनुसंधावर बसवयाचे आणि स्वत:च्या सर्व सत्तेने श्रीरामांनी जबरदस्तीने माझी पात्रता नसताना सुध्दा माझ्याकडून भावार्थ रामयण ग्रंथ लिहून घेत आहेत असे संत एकनाथ महाराज म्हणतात. (श्रोत्यांनी लक्षात घ्यावे संत एकनाथ महाराज भावार्थ रामायणच प्रमाण ग्रंथ आहे हे सांगण्याबद्दल आग्रही आहेत फक्त विनाकारण मतभेद निर्माण करू नयेत हा ग्रंथ प्रमाण का तो ग्रंथ प्रमाण इतर ग्रंथांचा सुध्दा सन्मान करावा सर्व ग्रंथ हे श्रीरामचरणावर प्रेम उत्पन्न करण्यासाठीच लिहीले आहेत त्यामुळे वंदनीय आहेत आदरणीय आहेत परंतू या ग्रंथाला प्रमाण मानावे हि विनंती कारण स्वत:हा श्रीराम लिहवून घेत आहेत.हे मत भाष्यकार श्री वैजनाथ यांच आहे.) 

मज निजलों असता जाण । राम थापटी आपण ।म्हणे उठी करीं रामायण । तेथे मी कोण न करायवा ॥ १५ ॥

संत एकनाथ महाराज म्हणतात मी झोपलो असलो की श्रीराम येऊन पाट थापटून उठवायचे उट नाथा रामायण लिह लवकर श्रीरामांनी सांगितल्यावर मी नाही कसा म्हणू शकेल बरे. 

यालागीं कथादूषण भूषण । माझें अंगीं न लागे जाण ।कर्ता श्रीराम आपण । माझे मीपण तो जाला ॥ १६ ॥

यामुळे कथा छान आहे अस श्रोते म्हणले तरी कथा श्रीरामांनीच करून घेतली आहे आणि कथेला कोणी दोष ठेवले तरी ती श्रीरामांनीच केली आहे कथा कर्तेपणाचा तगुणदोष मला नाही एवढच नाही तर माझ्यातील मी पणा सुध्दा श्रीरामच झाला आहे. 

ग्रंथ निंदिती अथवा वंदिती । ते दोघें आम्हां ब्रह्ममूर्ती ।हे श्रीजनार्दनाची युक्ती । उपदेश एकांतीं निजगुह्यार्थ ॥ १७ ॥

ग्रंथाची निंदा करणारे अथवा स्तुती करणारे दोघेही आम्हांला ब्रम्हस्वरूप आहेत असे संत एकनाथ महाराज सांगतात कारण द्वेत संपवण्याची सद्गुरु जनार्धन स्वामींची एकांतात उपदेश करुन शिकवलेली गुह्ययुक्ती आहे. कारण शंकाघेणारांना एकनाथ महाराजांनी प्रमाणशिर उत्तर, संदर्भ दिला आहे तरीसुध्दा कोणी टिका करत असेल तर तो सत्य न स्विकारता द्वेत उत्पंन्न करू पाहतोय अशाला उत्तरे न देता चर्चा बंद करावी व परमार्थाकडे लक्ष द्यावे हा गुह्यगुह्यार्थ आहे. (कारण खळ लोक उत्तरासाठी प्रश्न करत नाहीत तर विकल्प, द्वेत उभ करण्यासाठी प्रश्न करतात. ) 

असो अबद्धही रामकथा । पवित्र करी गातां ऐकता ।हें न माने ज्यासी विकल्पता । त्यासी तत्वता लोटांगण ॥ १८ ॥

जर समजा माझ्या कथेला एखादा व्यक्ती प्रमाणबध्द नाही असे म्हणत असेल तरीही ही श्रीरामकथाच आहे आणि रामकथा अबध्द जरी ऐकली ,वाचली,सांगितली तरी केल्याणच होते. याबोलण्यावरही जर कोणाचा विश्वास नसेल तर त्याला सांगण्यात कोणताही अर्थ उरत नाही. त्याला पाया पडतो म्हणून समोरून हाकलून द्यावे आणि आपले अनुसंधान कथेवर ठेवावे. 

यद्‌वाग्विसर्गो जनताघविप्लवो यस्मिन् प्रतिश्लोकबद्धवल्यापि ।नामान्यनंतस्य यशोंकितानि यच्छृण्वति गायंति गृणांति साधवः ॥ १ //

अबद्ध रामकथा श्रवणीं । वक्ता पावन तत्क्षणीं ।श्रोत्यांच्या पापा होय धुणी । अबद्ध वाणी पढतांही ॥ १९ ॥

अबध्द श्रीरामकथेच विवेचन केल तरीही वक्ता पावण होतो म्हणजेच रामायण सांगण्याचा प्रयत्न करणारा कमीज्ञानी सुध्दा पावन होतो. (परंतू रामायणाच्या व्यासपीठावरून परमार्थाशिवाय नको त्या गोष्टी बोलणारा तथाकथीत महाज्ञानी सुध्दा नरकाला जातो.) श्रोत्यांची पापे धुऊन जातात अबध्द कथा ऐकली वाचली तरीही. 

अबद्धही रामचरित्र । महापातकियां करी पवित्र ।तो राम गातां माझें वक्त्र । केवीं अपवित्र ज्ञाते म्हणती ॥ २० ॥

अबध्द रामचरित्र सुध्दा महापाप्याला पवित्र करते. इथे तर माझ्या मुखातून श्रीराम स्वत: बोलत आहेत मग माझे रामायण सांगणे अपवित्र कशी होईल. (आता सुध्दा तथाकथीत महाज्ञानी स्वत:च्या गावात कथेला न जाता फक्त दररोज सेवा करणार्या श्रीराम भक्ताला नावे ठेवतात त्यांनी ओवी पाठ करून आपली श्रीरामकथेवरील श्रध्दा अढळ ठेवावी.) 

कथा नंदिती वंदिती जनीं । ते माउली माझे दोनी ।निंदक ते सखी जननी । मजलागूनी कृपाळु ॥ २१ ॥

श्रीरामकथेची निंदा करणारी दोन्ही व्यक्ती आम्हाला मातेसमान आहेत आणि निंदा करणारे माझी सखी आई आहेत त्यांची माझ्यावर जास्त कृपा आहे.कारण ते निंदेच्या माध्यमातून दोष दाखवतात व मला अधिक निर्मळ कथा विवेचन करता येते. निंदा करणारे स्वत: नरकात जातात आणि सतत आपल्या स्वच्छ बनवण्यासाठी प्रयत्न करतात. कोणतीही पगार न घेता काळजीपुर्वक काम करतात म्हणून ती सखी माऊली आहे. 

जैसे जननीचे करतळ । वरीवरी क्षाळिती बाह्य मळ ।निंदक सबाह्य कलिमळ । करी निर्मळ निजवदनें ॥ २२ ॥

ज्याप्रमाणे आईने हाताने आपल्या शरिरावर असलेली मळ वरवर धुऊन टाकते परंतू निंदक तोंडावाटे निंदा करुन आपल्या आतिल व बाहेरील मळ साफ करतात. 

यालागीं निंदकचि तत्त्वता । साह्य सखा परमार्था ।त्या निंदकातें निंदितां । दोषी सर्वथा स्वयें होय ॥ २३ ॥

यामुळे निंदा करणारेच साधकासाठी परमार्थाला साह्य असतो फक्त निंदेला सकारात्मक घेण गरजेचे आहे. निंदेला नकारात्मक घेणारे साधक परमार्थापासून दुरावतात मला हा व्यक्ती अस का बोलला म्हणून देवाला मंदिराला सोडून घरी जातो परंतू घरातील लोकांनी हाकलून दिले तरी बाहेर जात नाही म्हणजेच कोवळ्या साधकावर निंदेचा विपरित परीणाम होतो त्यामुळे आपण दृढ आस्थावंत राहून कोणासाठीच परमार्थाचा त्याग करू नये कारण निंदक स्वत: दोषी होऊन नर्काला जातो तरीही तो आपल्या नर्काला जाण्याच्या मार्गावर ठाम असतो तर मग आपण देवाकडे जाण्याच्या मार्गावर ठाम रहावे. आणि निंदकाचा साबणाप्रमाणे वापर करून घ्यावा. 

निंदा म्हणिजे परमामृत । निंदा निर्द्वंद्व सुखस्वार्थ ।निंदक न पाहे निजस्वार्थ । अति समर्थ परोपकारी ॥ २४ ॥

खर पाहता निंदा म्हणजे परमामृत आहे कारण निंदकाने कोणतही द्वंद न ठेवता आपल्या परमार्थिक स्वार्थासाठी पोषक बोललेला असतो आणि तो कोणत्याही अपेक्षेशिवाय निरंतर साधकाला परमार्थ मार्गावर परिपक्व बनवतो म्हणून तो समर्थ परोपकारी आहे. 

निंदा हे साधकासाठी परमामृत आहे

जेथें निंदा सुखरूप समाय । त्याचे मस्तकीं वंदूं पाय ।

धन्य धन्य त्याची माय । जो निंदा साहे निर्द्वंद्व ॥ २५ ॥

जो निंदकाने केलेली निंदा सुखाने सहन करतो तो वंदनीय आहे. त्याची माता धन्य धन्य आहे जो निद्वंद म्हणजे निंदकासोबत कोणताही वाद न करता, आकस न ठेवता निंदा सहन करतो आणि आपल परमार्थीक कार्य सुरुच ठेवतो. 

आतां किती सुचवूं परिहार । परिहार तोचि अहंकार ।मी होऊं पाहें कवीश्वर । हा अपराध थोर मजमाजी ॥ २६ ॥

हि कथा प्रमाण आहे व कथा श्रीरामांनी माझ्याकडून लिहून घेतली आहे हे समजावून सांगताना ग्रंथाची बाजू मांडताना अनेक परिहार दिले आणि देत असताना मी कवि आहे असा हि भावना अप्रत्यक्षपणे व्यक्त होण्याचा अनवधानाने थोर अपराध होऊ पाहतोय. कारण लेखक श्रीराम आहेत तर मग मी एवढे परिहार देण योग्य नाही. 

आतां रामकथा रामायणीं । तो मी अपराध न गणीं ।झणीं निवाराल तुम्ही कोणी । घेऊं द्या धणी कथामृताची ॥ २७ ॥

आता रामायणाच्या माध्यमातून श्रीरामकथा करण्याचा अपराध झाला तर झाला मी त्याचा विचार करणार नाही जर तुम्ही कोणी म्हणाल की तुला काय अधिकार तु करु नको रामायण तर मी ऐकणार नाही उग मला रामायणाचा आनंद घेऊ द्या. कुणाला टिका करण्याची हौस असेल तर करत बसा मी रामायण करणारच हा नाथ महाराजांचा निर्धार या ओवीत दिसून येतो. 

रामकथा पुढे सुरू करण्याविषयी श्रीनाथांना श्रोत्यांची विनवणी :

तंव श्रोते म्हणती नवलाहो । ग्रंथी साधला शुद्धान्वयो ।परिहार्मिषें पहाहो । केला निःसंदेहो ग्रंथार्थ ॥ २८ ॥

ग्रंथ करणारच हा निर्धार करणारा वक्ता संत एकनाथ महाराज होते त्यामुळे सत्य संकल्पाचा दाता श्रीराम आहेत. . . काही निंदा करतील असे नाथ महारांना वाटत होते परंतू आश्चर्य झाले श्रोते म्हणत होते ग्रंथाचे निरुपण हे शुध्दान्वयाने सुरु आहे तुम्ही परिहार देऊन सर्व संदेह दुर केला आहे आता आम्हाला ग्रंथाचे निरुपण प्रमाण असण्यावर कोणताही प्रश्न नाही असे श्रोते म्हणाले. 

याचे मराठी बोल । परी अमृतातें करिती फोल ।क्षीराब्धीहूनि अति सखोल । नित्य नवी बोली स्वानंदसुखाची ॥ २९ ॥

श्रोते म्हणू लागले या एकनाथ महाराजांचे मराठी रामकथा बोलण्यातली गोडी अमृताला फोल ठरवणारी आहे. आणि क्षीरसमुद्रापेक्षाही खोल रसाळ आणि बोलण्यामधील नित्यनुतनपणा स्वानंद देणारा आहे. 

श्रवणीं ऐकतांचि कथा । सुख उपजतसे चित्ता ।धन्य धन्य तूं रसाळ वक्ता । कथा परमार्थ निजपूज्य ॥ ३० ॥

एकनाथ महाराज तुम्ही सांगितलेली कथा कानाने ऐकली की चित्ताला सुख होते खरच तुम्ही रसाळ वक्ते आहात तुम्ही सांगितलेली कथा म्हणजेच परमार्थ पुज्यनिय आहे. 

तुझेनि मुखें रामायण । श्रीराम वदविताहे आपण ।परिहारें जालें ब्रह्म पूर्ण । कथा निरूपण चालवीं ॥ ३१ ॥

श्रोते म्हणतात अरे एकनाथा तुझ्या मुखातून रामायण स्वत: श्रीराम बोलावून घेताहेत त्यामुळे तुझे परिहार हा तुला कवित्व करण्याचा अभिमान दाखवणारे नसून ते परिहार हे ब्रम्हरूप झालेले आहेत त्यामुळे आता तु निशंक होऊन कथा सांग असे म्हणू लागले. 

हें ऐकोनि संतवचन । निवाला एका जनार्दन ।मस्तकीं वंदोनियां चरण । ग्रंथनिरूपण अवधारा ॥ ३२ ॥

हे संताचे बोलणे ऐकून सद्गुरुच्या आशिर्वादाने एकनाथ महाराज तृप्त झाले. त्यांनी सर्व संताना वंदन करून आता श्रीरामकथेकडे लक्ष द्यावे अशी विनंती केली. 

पुढील कथेचे अनुसंधान । केलिया पिंडप्राशन ।तिघी जणी सुखसंपन्न । गर्भसमाधान तिघींसी ॥ ३३ ॥

पुढील कथेचे अनुसंधान असे आहे मागच्या अध्यायात तिन्ही मातांनी पिंडप्राशन केले होते त्या गर्भवती झाल्याच्या आनंदाने सुखी समाधानी झाल्या असे संत एकनाथ महाराज सांगतात. (महाराष्ट्रातील वारकरी भाविकांनी लक्षात घ्यावे भावार्थ रामायण हा प्रमाण ग्रंथ आहे हे समजावण्यासाठी संत एकनाथ महाराज यांनी ३३ ओव्या खर्च केल्या आहेत.) 

कैकयीचे डोहाळे विचारणासाठी दशरथांचे आगमन :

वसिष्ठ म्हणे रायासी । धर्ममर्यादा आहे ऐसी ।

डोहाळे पुसावे स्त्रियांसी । मागती त्यांसी तें द्यावें ॥ ३४ ॥

वसिष्ठ राजा दशरथाला म्हणू लागले की धर्मनितीनुसार गर्भवती स्त्रीला पतीने डोहाळे विचारावे आणि तिचे मागणे पुरवावे. 

शिरी वंदोनि ब्रह्मवाक्यासी । राजा निघाला वेगेंसी ।आला कैकेयी भुवनासीं । अति उल्लासीं पुत्रार्थीं ॥ ३५ ॥

सद्गुरुचे बोलणे ऐकले त्यांना वंदन केले व राजा दशरथ कैकयीच्या घराला मला मुले होणार आहेत या अतिशय उल्हासाने आला. 

राजाचें विपरीत स्वागत :

कैकेयी गर्भविलासी । बैसली होती मंचकासीं ।येतां देखोनि रायासी । निजसेजेसी पहुडली ॥ ३६ ॥

कैकयी मी गर्भवती आहे या सुखामध्ये पलंगावर बसलेली होती राजा आपल्याकडे येतोय हे पाहून झोपली कारण मी गर्भवती आहे माझी राजाला गरज आहे किंवा माझ्यात राजाच माझ्यात चित्त आहे हा अभिमान तिला होतो खर पाहता असा अभिमान असलेल्या स्त्रिया पतिच्या प्रेम भावनेला प्रतिसाद न देता त्याचा गैर फायदा घेण्याच्या भावनेने भरलेल्या असतात. पुरुषाने अशावेळी अशा स्त्रिला बोलू सुध्दा नये आणि जर बोलला तर त्याला भयंकर परिणामाला सामोरे जावे लागते. 

जेथें भ्रतारा स्त्रियेसी वर्चस्वपण । तेथें मर्यादा राखे कोण ।बरवेपणाचा गर्व पूर्ण । त्याहीवरी जाण् गर्भिणी ते ॥ ३७ ॥

ज्याठिकाणी नवर्याला वरचढ बायको असते तिथे कसली मर्यादा नसते आणि त्यावर मी सुंदर आहे याचा गर्व त्यामध्ये ती गर्भवती आहे त्यामुळे गर्वाचा ताठाच होता तिच्याकडे. 

अमावस्ये अंधारी रात्री पाहीं । त्याहीवरी दाटे धुई ।गडदपणें न दिसे कांही । ते दशा पाहीं कैकेयीसी ॥ ३८ ॥

अमावस्येच्या रात्री अंधार असतो त्याच रात्री दाट धुई पडावी मग गडद अंधार पडतो मग त्यागडद अंधारात काय? दिसेल त्याप्रमाणे कैकयीच्या अंतकरणात गर्वाचा गडद अंधार पडला होता तिथ पतिचा,राजाचा सन्मान करावा हि भावना कशी जगेल बरे.... पतिच्या स्वागताची औपचारिकता सोडून कैकयी अहंकाराने झोपी गेली. 

राजा पुसे डोहळे तिसी । ते हांसोनि म्हणे रायासी ।जरी पुरवालनिश्चयेंसी । तरी मी तुम्हांसी सांगेन ॥ ३९ ॥

राजा कैकयीला डोहाळे विचारत होता त्यावेळेस कैकयी हासुन राजाला म्हणत म्हणत होती राजा जर तुम्ही नक्की पुरवणार असलात तरच मी तुम्हाला सांगते. कारण काही स्त्रिया असतात ज्या प्रत्येक शब्दाला पतीला खाली उत्तर बोलतात तुमच्यान एवढ झाल नाही होत नाही अशा स्त्रियांच्या इच्छा पुरवण्याचा भाव पुरुषाच्या अंगलट येत असतो कारण त्यांच्या मागण्यात विपरीतार्थ असतो. आता बघा एवढा मोठा चक्रवर्ती राजा दशरथ त्याला हि कैकयी म्हणते इच्छा पुरवण होत असेल तरच विचारा तो काहीही देण्यात समर्थ आहे तरीही त्याच्या समर्थपनावर हिने प्रश्न उभा केलाच. आणि म्हणू लागली पुरवणार असलात तर सांगते. 

राजा बोले अति प्रीती । तुझी नुल्लंगितां वचनोक्ती ।तुज म्यां नेले स्वर्गाप्रती । इंद्रादिकां हातीं गौरविलें ॥ ४० ॥

निष्कपट राजा अतिशय प्रेमाने बोलू लागला मी तुझ्या शब्दाच उल्लंघन न करता तुला स्वर्गात घेऊन गेलो. इंद्रादिक देवांनी तुझा गौरव केला हे सगळ तुझ ऐकतो म्हणूनच झाल की अस बोलू लागला. 

ऐसें मागे तुझें वचन । नाहीं उल्लंघिलें आपण ।आजुइचा प्राप्त काळ पूर्ण । डोहळे संपूर्ण करीन तुझे ॥ ४१ ॥

अशाप्रकारे मी आजपर्यंत कधीच तुझे वचन उल्लंघन केले नाही मग आता तर तु गर्भवती आहेस प्राप्त काळ आहे मग यावेळी मी तुझा शब्द कसा खोटा करीन तु फक्त माग मी सर्व इच्छा पुर्ण करतो अस आवेशात दशरथ राजा बोलू लागला. 

येरी म्हणे रायासी । डोहळे माझ्या निजमानसीं ।राज्य द्यावें कनिष्ठासी । ज्येष्ठा वनवसीं धाडावें ॥ ४२ ॥

राजा संपुर्णत: आपल्या बोलण्यात आडकलेला आहे हे समजल्यानंतर कैकयी बोलू लागली राजा माझ्या मनात आहे की अयोध्येचे राज्य कनिष्ठ मुलाला द्यावे आणि जेष्ठाला वनवासात पाठवावे. 

दवडावे दूरी दुरंतरता । जेथें नायके अयोध्येची वार्ता ।आणि या ज्येष्ठाची कथा । न ये सर्वथा अयोध्येसी ॥ ४३ ॥

मोठ्या मुलाला एवढ दुरवनात पाठवावे की अयोध्येची गोष्ट सुध्दा त्याला ऐकायला भेटू नये आणि तो काय करतो कुठे आहे हि वार्ता अयोध्येत यायला नको. इतके दुर पाठवा. 

ऐसें विपरीत करितां । तुम्ही म्हणाल हे अधर्मता ।तो अधर्म ठेवा माझिये माथां । जो वेदशास्त्रार्था अनि निंद्य ॥ ४४ ॥

अशी विपरीत वागणे हा अधर्म होईल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तो अधर्म माझ्या डोक्यावर ठेवावा वेद शास्त्रानुसार माझी निंदा झाली तरी मला त्याची पर्वा नाही. म्हणजे कैकयी जे सांगत होती ते चुकीचे हे तिला माहीती होत तरीही तेच करण्याबद्दल ती आग्रही होती. 

अति निंदेची निंद्य टाळी । तो वाजो माझिये कपाळीं ।मज निंदिजे लोकीं सकळीं । ही आवडी नव्हाळी डोहळियां ॥ ४५ ॥

अतिशय लोक माझी निंदा करतील सर्व निंदा माझ्याच कपाळावर यावी हेच माझे डोहाळे आहे असे ती म्हणत होती. 

ऐकोनि तिचे डोहळे । राजा सर्वांगें कंटाळे ।अश्रुपूर्ण जाले डोळे । होय तत्काळ कंपायमान ॥ ४६ ॥

तिचे डोहाळे ऐकून राजाला पुर्ण कंटाळा आला त्याचे डोळे पाण्याने भरले राजाच शरिर थरथरकापू लागले. कारण राजा अगोदर श्रीरामाकडे जायचे सोडून काम भावनेने कैकयी कडे गेला होतो. रामाशिवाय कामाकडे गेल्यावर नशिबी दु:खच येते. 

मन बुद्धि चित्त चांचरे । निश्चयासी आले शहारे ।बैसलीं इंद्रियांचीं द्वारें । प्रळयमहापूरें धैर्य गेलें ॥ ४७ ॥

मन, बुध्दी आणि चित्त चांचरु लागले आणि सत्य वागण्याचा निश्चिय डगमगू लागला दहाइंद्रीयांना सत्य वागण्याच्या निश्चयाने नांदवणारा दशरथाचे काम भावनेच्या प्रळयकाळीन महापुरात धैर्य गेले. ज्यावेळी कामाच्या पुरात धैर्य वाहते त्यावेळी अविवेकाची पहाट फुटत असते. त्यामुळे कामाच्या अगोदर श्रीरामाकडे जावे आपोआप धैर्य निर्धार सांभाळण्याची शक्ती मिळेल. 

इचे डोहळे पुरवितां । हाणी होईल स्वार्थ परमार्था ।शेखीं नुरे उरी जीविता । सर्वीं सर्वथा अति घात ॥ ४८ ॥

इचे डोहाळे जर पुरवले तर स्वार्थ आणि परमार्थ दोन्हींची हाणी होईल शेवटी जीवही जाईल हि सर्वांचाच घात करेल असे वाटत आहे. 

ऐसी रायासी जाली व्यथा । मग तिसी न बोलेचि मागुता ।अत्यंत वचकोनि चित्ता । हाये निघता कंटाळोनी ॥ ४९ ॥

असा राजाला त्रास झाला. राजा मनात वचकला आणि तिला न बोलताच कंटाळून परत निघाला. 

राजाचे सुमित्रेकडून आनंदपूर्ण स्वागत :

सवेंचि निघे सुमित्रेमंदिरी । तंव ते आली सामोरी ।मस्तक ठेविला चरणांवरी । आरती करी निंबलोण ॥ ५० ॥

कैकयीकडून दु:खी झालेला राजा सुमित्रामातेच्या मंदिरात गेला अतिशय आनंदाने सुमित्रामातेने स्वागत केले. राजाला आरती करून निंबलोण केले व राजाच्या चरणांचे दर्शन घेतले. 

आले देखोनि प्राणनाथ । जीवीं उल्हास अति अद्‌भुत ।आनंदें पूर्ण भरित । प्रेमाचा अत्यंत पूर आला ॥ ५१ ॥

पती माझ्याकडे आले याचा तिच्या जिवाला अतिशय आनंद झाला. उल्सासाने आनंदाच अंतकरणात भरत आल. आपले पती घरी आले तिच्या मनात जणु प्रेमाच पुरच आला इतकी ती भारावून गेली. 

घालोनियां वरासन । भक्तिभावें चरणक्षाळण ।करी चरणतीर्थप्राशन । सुमनादि चंदन यथोक्त पूजा ॥ ५२ ॥

तिने राजाला बसण्यासाठी उंच आसन घातले. भक्ती भावने चरणक्षाळण केले, पतीच्या चरणाचे तिर्थ प्राशन केले. फुले, चंदनाने.यथायुक्त दशरथ राजाची माता सुमित्रेने पुजा केली. 

सुगंध सुवास सुमनमाळा । घाली निजनाथाचिया गळां ।जोडल्या करीं त्या काळा । उभी वेल्हाळा निकट ना दूरी ॥ ५३ ॥

पतिव्रता माता सुमित्रेने आपल्या पतिच्या गळ्यात सुवासिक फुलांच्या माळा घातल्या हात जोडले व अनु रक्त भावनेने अतिदूर नाही किंवा अतिशय जवळ नाही अशी उभी राहीली. 

गर्भें टवटवीत मुखकमळ । शोभे सर्वांग सोज्ज्वळ ।गर्भतेजें निजनिर्मळ । मिरवे वेल्हाळ भक्तिभावें ॥ ५४ ॥

गर्भवती असल्याने तिचे मुखकमळ टवटवीत सर्वांग सोज्वळ दिसू लागले गर्भाच्या आणि पतिवर असलेल्या भक्तिभावाच्या निर्मळतेने पतिच्या पुढे सुमित्रा स्वत:ला प्रस्तुत करत आहे. 

जोचि भावो निजनाथेंसी । तोचि भावोसमस्तेंसी ।तेणेंचि भावे नृपनाथासी । पूजी उल्लासीं समसाम्ये ॥ ५५ ॥

जो भाव, जे प्रेम पतिवर आहे तीच निर्मळ भावना सर्वांबद्दल त्याला सुमित्र म्हणतात त्या सुमित्रेने उल्हासाने राजा दशरथाची पुजा केली. 

भक्तिभावो तिचा वांटा । त्याच्या उदरीं केला सांठा ।तैशाच रीतिच्या बाह्य चेष्टा । देखे द्रष्टा होवोनि रावो ॥ ५६ ॥

भक्तिभाव हाच तिचा वाटा आहे त्याचाच पिंड तिच्या उदरात साठवलेला त्यामुळे तिचे बाह्यवर्तन हे त्यानुसारच होते हे राजा पाहू लागला. 

देखोनि सुमेत्रेचा भावों । अत्यंत सुखावला रावो ।तिचे गर्भाचा निर्वाहो । देवाधिदेवो प्रतिपाळो ॥ ५७ ॥

सुमित्रामातेचा भाव बघीतला आणि राजाला खुप आनंद झाला आनंदाने राजा देवाला म्हणू लागला देवा माझ्या सुमित्रेच्या गर्भाचे रक्षण तुमच्याकडून व्हावे. 

कैकेयी डोहळियांचे दुःख । राजा विसरला निःशेष ।तिचें चुंबोनियां मुख । पुसे कौतुक डोहळियांचे ॥ ५८ ॥

कैकयीपासून झालेल दुख सुमित्रेच प्रेम पाहून राजा विसरला. सुमित्रेच चुंबन घेऊन तिला तिचे डोहाळे काय आहे ते मला सांग असे विचारत होता. 

कोण आवडी तुझ्या पोटीं । ते सांगावी जीवींची गोष्टी ।येरी सलज्ज अधोदृष्टी । न करी चावटी बहुबोल ॥ ५९ ॥

तुझ्या मनात काय आवड आहे काय ईच्छा आहे असे विचारल्यानंतर सुमित्रेन एक शब्दही न बोलता खाली मान घालून स्तब्छ झाली कोणतीही चंचलता किंवा बडबड ती करत नाही. कारण सुमित्रा निरपेक्ष प्रेमाच प्रतिक आहे. 

ज्येष्ठाची जे ज्येष्ठ सेवा । ते मज द्यावी नरदेवा ।हेची आवडी माझिया जीवा । सत्यस्वभावा प्रीत्यर्थ ॥ ६० ॥

जेष्ठाची सेवा करण्याची मोठी संधी मला द्यावी हि माझी आवड आहे हाच माझा सत्यभाव आहे अस सुमित्रामाता म्हणत होती. 

ज्येष्ठ सेवेचे निजसुख । मज आहे आत्यंतिक ।तुम्हीं द्यावें हेंचि एक । नावडे आणिक विषय मज ॥ ६१ ॥

मोठ्यांची सेवा करणे हेच माझे मोठे सुख आहे तेच तुम्ही मला द्यावे याशिवाय मला काहीही नको असे ती म्हणत आहे. 

नावडे वस्त्र दिव्यान्न । न आवडे राज्य त्रिभुवन ।नावडे स्वर्ग ब्रह्मसदन । ज्येष्ठसेवेवाचूनी ॥ ६२ ॥

मला भारी वस्त्र नको, त्रिभुवणाचे राज्यसुध्दा नको, स्वर्गप्राप्ती नको, ब्रम्हलोकाची प्राप्तीसुध्दा नको. मला फक्त जेष्ठाची सेवा मिळावी अस माता सुमित्रा म्हणू लागली. 

ऐसे स्वामी प्राणपती । तुझे पाय सेव्य असती ।ज्येष्ठसेवेची अति प्रीती । डोहळे निश्चिती हे माझे ॥ ६३ ॥

स्वामी, प्राणपती , तुमचे पाय मला वंदनीय आहेत. त्याचप्रमाणे जेष्ठ सेवेची मला खुप आवड आहे. हेच माझे डोहाळे आहे अस सुमित्रामाता बोलली. 

ऐकोनि ऐसें वचन । रायाचें विस्मित मन ।इचे डोहळे विलक्षण । दिसे सुलक्षण सर्वार्थीं ॥ ६४ ॥

अस सुमित्रेच बोलण ऐकले आणि राजाला आश्चर्य झाले कैकयी मोठ्याला वनवासात पाठवा म्हणते आणि हि मात्र मला मोठ्याची सेवा द्या म्हणते... हिचे डोहाळे सर्वबाजूंनी सुलक्षणी आहे. 

एक पायसाचें ताट । वसिष्ठें भाग केलेचोखट ।तिचे डोहाळे कां बिकट । इचे अति श्रेष्ठ परमार्थीं ॥ ६५ ॥

एकाच प्रसादाचे विभाग वसिष्ठांनी केले मग कैकयीचे डोहाळे वाईट आणि सुमित्रेचे डोहाळे परमार्थ दृष्ठीने एवढे श्रेष्ठ काय कारण असावे याचा विचार राजा दशरथ आश्चर्य चकित होऊन करू लागला. 

राजा दशरथ विचार करू लागला 

तिचे भाग नव्हती स्वतंत्र । पोटींचा गर्भ तो सावत्र ।यालागीं ते अपवित्र । डोहाळे होती कैकेयीसी ॥ ६६ ॥

कैकयीला मिळालेले भाग तिचे स्वत:चे नव्हते म्हणून तिच्या पोटाला येणारी मुले तिचे नसुन सावत्र मुले आहेत. म्हणून अपवित्र डोहाळे तिला झाले. 

सावत्र छळिती मातेसीं । शनि लाता हाणीं छायेसीं ।ठावके पडलें सूर्यासी । तूं माता नव्हेसी सर्वथा ॥ ६७ ॥

शनिने आपली सावत्रमाता छायेला तु माझी आई नाहिस म्हणून लाता मारल्या हे सुर्याला कळले तसेच इथे कैकयीचा गर्भ स्वतंत्र नसुन सावत्र आहे हे लक्षात आले. (असे दशरथाला वाटते) 

तैसे सावत्र गर्भ तियेसी । यालागीं अधम डोहळे इयेसी ।निंद्य व्हावें मी जगासी । वदे गर्भवासी सावत्र ॥ ६८ ॥

कैकयीचे गर्भ सावत्र आहेत म्हणून जगात माझी निंदा व्हावी असे पापी डोहाळे तिला झाले. दशरथाला असे वाटत आहे की पोटातला गर्भच आईवर सावत्र पणाचा डोहाळ्यामाध्यमातून सुड उगवत आहे. 

सुमित्राभाग स्वतंत्र । यालागीं डोहळे अति पवित्र ।रायाचें निवालें जिव्हार । हर्षें निर्भर तो जाला ॥ ६९ ॥

सुमित्रेचा भाग स्वतंत्र यामुळे तिचे डोहाळे अतिशय पवित्र असे राजाला वाटत आहे. असो सुमित्रेचे डोहाळे राजा तृप्त झाला आनंदी झाला. 

मग उठोनि उल्लासेंसीं । सुमित्रा आलिंगी हृदयेसी ।जे जे डोहळे निजमानसीं । ते ते पावसीं मद्अनुग्रहें ॥ ७० ॥

मग राजा उल्हासाने उठला आणि सुमित्रेला ह्रदयाला लावले आणि म्हणू लागला जे जे तुझे डोहाळे आहे ते ते तुला प्राप्त होईल. 

नाना अलंकारभूषण । राजा त्यागी ओवाळून ।तिसी करवी निंबलोण । द्विजां दे दान नाना वस्त्रें ॥ ७१ ॥

वेगवेगळ्या प्रकारची अलंकार, भुषण राजा तिच्यावरुन ओवाळून टाकू लागला तिला निंबलोन केले आनंदाने राजा ब्राम्हणांना वस्त्रेदान करू लागला. 

आतां रायाची जेष्ठ राणी/कौसल्या जे कां धर्मपत्नी/न समाये त्रिभुवनी/तो गर्भाधानी श्रीराम//७२//

आता राजाची जेष्ठ राणी व धर्मपत्नी कौसल्या ति त्रिभुवनात सामावली जात नाही कारण त्रिभुवनाचे स्वामी श्रीराम तिच्या गर्भात आहेत.

जो त्रिभुवनी न समाये जाण/तो भावार्थी साठवे आपण/सद्भाव झालिया संपूर्ण/ब्रम्ह परिपूर्ण ह्रदयाकाशी//७३//

जो भगवान त्रिभुवनात सामावू शकत नाही तो कौसल्येने भावाच्या बळावर पोटामध्ये साठवला आहे संत एकनाथ महाराज सांगतात जर संपूर्ण सद्भाव असेल तर परिपूर्ण परब्रह्म ह्रदयाकाशात सामावले जाते.

तेथोनी राजा तत्क्षणी/उत्कंठा कौशल्या दर्शनी/भुवनी न देखे राजपत्नी/न देखे शेजशयनी पर्यंकी//७४//

सुमित्रेपासून राजा तात्काळ उठला राजाला कौसल्येच्या भेटीची उत्कंठा होती दशरथ कौसल्या भुवनात आला परंतु राजाला पत्नी कौशल्या दिसत नाही मग शयनगृहात मंचकावर पाहतो त्याला कौशल्या तिथेही दिसत नाही.

ऐका कौशल्यासंभ्रम/उदरी संभवला श्रीराम/पुसता डोहाळियांचे काम/आनेआन वर्तले//७५//

संत एकनाथ महाराज सांगतात कौसल्येचा संभ्रम ऐका तिच्या पोटात भगवान अवतरले असल्यामुळे तिला ज्यावेळी राजा डोहाळे विचारतो त्यावेळी वेगळेच घडते ते ऐका.

ऐका कौशल्येची स्थिती/अखंड वसे पै एकांती/न साहे संग सांगाती/गर्भप्रतीती श्रीराम//७६//

कौसल्येची स्थिती सांगत आहेत, कौसल्या म्हणजे ज्याने भगवान पोटात साठवला आहे तो सतत एकांतात राहतो त्याला इतरांचा संग आवडत नाही तसेच कौसल्येला गर्भातील श्रीरामांच्या प्रतितीचा आनंद येत होता.

नावडे वस्त्रभुषण/नावडे सुमन चंदन/नावडे भोग दिव्यासन/नावडे शयन पर्यंकी//७७//

पोटात राम असल्याने कौसल्येला भोतिक पदार्थ आवडत नाहीत वस्त्र, अलंकार,फुल,चंदन, स्वादिष्ट जेवण तसेच दिव्य आसणे व मंचकावर झोपायचे काहीच आवडत नाही.

देही निर्लोभलक्षण/ हेची वैराग्य दृढ दारुण/उदरा आला श्रीरघूनंदन/ब्रम्ह परिपूर्ण पुर्णत्वे//७८//

देहाबद्दल कोणताही लोभ नसणे हेच दृढ वैराग्याचे लक्षण आहे स्वतः श्रीराम पोटाला आल्यामुळे परिपूर्ण ब्राम्हत्वाच्या स्थितीच्या आनंदावर कौसल्या होती त्यामुळे बाह्य पदार्थांबाबत ति विरक्त होती.

आस्था सांडोनियां जाण/आवडी वसवी विजन/लेईली गर्भ दिव्यांजन/राम निधान उदराते//७९//

लोकीकाची आस्था सोडून अत्यंत आवडीने वनात एकांतात ती थांबली व जसे डोळ्याला अंजन भेटल्यास दिव्यदृष्ठी येते तशीच भावाच्या दिव्य अंजनाने ती उदरातील निधान श्रीरामाचा आनंद घेत होती.

करोनी कल्पनेशी मारु/सेवीला निर्विकल्प कल्पतरू/तया तळी अति आदरु/सहजासनी सुंदरु बैसलीसे//८०//

ती वनात बसलीय असा भाव एकनाथ महाराज सांगतात कल्पतरू खाली बसले तर कल्पना सुचतात देव कल्पनेतला नाही त्यामुळे ती निर्विकल्पतरु वृक्षाखाली म्हणजे शांत चित्ताने सहज आदरपूर्वक कौसल्या बसली आहे असे सांगतात.

गर्भोदरी बैसली दृष्टी/वृत्ती झाली उफराटी/आपल्यासमान देखे सृष्टी/गर्भपुष्टी स्वभावे//८१//

तिची दृष्टी उदरातील गर्भावर बसली आहे त्यामुळे जगातील पदार्थांपासून विरुद्ध दिशेला दृष्टी झाली व श्रीराम साठवलेल्या नजरेला जगातील सर्व स्वतः सारखे दिसू लागले गर्भातील श्रीरामा सारख्या शुद्ध स्वरूपात सगळेच दिसू लागले.

यावरी ते राजबाळा/वसवी शुध्द सुमनशाळा/द्वैतदृष्टी न लगे डोळा/सुखसोहळा अद्वैती//८२//

भक्ती मध्ये कुशल असलेली कौशल्या निर्विकल्प मनात शुध्द सुमनशाळा बनवू लागली कारण विकल्पाच्या वनात सुमन शाळा नसतात शुध्द सुमन असलेल्या दृष्टीला द्वेतभाव दिसत नाही त्यामुळे कौशल्येच्या नजरेला अद्वेत भावनेचा सुखसोहळा आहे.

राजा पाहे भोगभुवनी/तेथे नातूडे राज पत्नी/पाहे अतिलोभे अवलोकोनी/परी ते नयणी न दिसे//८४//

राजा कर्मप्रवृत्त असल्याने राजा पत्नी पाहू लागला परंतू शुध्दसुमनाची कुशल कौशल्या जि निर्विकल्प वृक्षाखाली बसलिय ती राजाला भोगभुवनात कशी सापडेल?परंतू माझी पत्नी या सलोभ भावनेतून राजा पत्नीचा शोध घेत होता त्याला ती दिसली नाही असे सांगितात.

पाहता वैखरी भितरी/तेथे न देखे ते सुंदरी/मध्यमेच्या माजघरी/पाहतां दुरी दृष्टीसी//८४//

घरात पत्नी दिसली नाही तेव्हा राजाने हाक मारली परंतू श्रीरामाशी एक नजर झालेली कौशल्या राजाच्या हाकेला ओ देत नाही मग मधल्या घरात राजा येतो व माजघरात पाहतो तेव्हा ती राजाला दुर दिसते कारण राजा पत्नीला शोधतोय कौशल्या रामभक्त भावनेवर रमलीय संसारीक व्यक्तीला संत सापडत नसतात.वैखरी,मध्यमा या वाचेने खुणावले तरीही राजाला कौसल्या दिसत नाही.

शोधीता पशंतीवोवरी/तेथें न देखे निजसुंदरी/चढला परेच्या उपरी/शुध्दी निर्धारी न लभेची//८५//

पशंतीच्या पलंगावर शोधली म्हणजे मधल्या घराच्या पलिकडे बघीतले तरी सापडली नाही म्हणजेच पशंती वाचेने हाक मारली तरीही कौसल्येची शुध्दी लागत नाही.

काढोनी द्वैताची आर्गळा/फेडूनी शब्दाची शृंखळा/उघडी अद्वैतसुमनशाळा/गुरुवाक्यमेळा निर्धारे//८६//

राजा मी पती आहे या द्वेत भावनेत होता त्या भावनेची अर्गळा म्हणजे कडी,कुलुप काढले व शब्दाची शृंखळा फेडली राजाने पत्नी हाक मारायचे थांबवले व दोन नसून एकच ब्रम्ह या स्वच्छ सुमन भावनेने राजाने विचार केला व गुरुवाक्याच्या सामर्थ्याने जसे द्वैत संपून जातं तसे द्वेत भावनेची कडी तुटून पडली व श्रीरामांशी ऐक्य भावनेचा निर्धार झाला.

तेथे रिघता अतिसांकडी/फेडीली रजतमांची लुगडी/शुध्द स्वत्वाची भुषणें आवडी/तिही काढी तात्काळ//८७//

त्याठिकाणी पोहचल्यावर रजोगुण,तमोगुळाची मलीन वस्त्र म्हणजे जे गुण प्रभू पासून जिवाला दुर लोटतात ती फेडून टाकली व सत्व गुणांची अलंकार तात्काळ काढले व आनंदाने घातली.म्हणजे द्वेताची कडी निघाली,गुरुवाक्याने सत्य समजले व ते ठसावले आता त्याचीच गोडी लागली त्यावेळी आपोआप रज,तमोगुण गळून पडतात.

ऐसा एकाकी एकला/राव प्रवेशले सुमनशाळा/पाहे स्वयें सगर्भ बाळा/तंव तेथेही डोळा दिसेना//८८//

अशाप्रकारे द्वेतभावनेशिवाय एकटाच राजा सुमन शाळेत जाऊन गर्भवती असणाऱ्या कौसल्येला पाहू लागला परंतू तेथेही

कौसल्या दिसत नाही.

मग नेत्र भरोनी विवेक/देखे निर्विकल्प निजसुख/तयातळी बैसली देख/अति सुरेख कौसल्या//८९//

त्यावेळी डोळ्यात विवेक भरला व निर्विकल्प पणे ते सुख दशरथ पाहू लागला त्यावेळी विकल्प नसलेल्या वृक्षाखाली बसलेली कौसल्या दिसली.

राजा पाहे निजतन्वंगी/तंव तेज न समाये अंगीचे अंगी/धन्य हेची जगीं/गर्भलिंगी स्विंग//९०//

राजा कौसल्येकडे पाहू लागले तर तिचे तेज अंगावर सामावले जात नाही संत एकनाथ महाराज सांगतात खरोखरच कौसल्या धन्य जिच्या गर्भात श्रीराम आहे.

तिसी देखतांची दृष्टी/आनंदें ओसंडे सकळसृष्ठी/तिसी करितां सुख गोष्टी/पडे मिठी स्वानंदी//९१//

तिला बघीतल आणि राजाला आनंदच झाला जणू काही सर्व 

सृष्ठीतला आनंद झाला तिला बोलल्यानंतर स्वानंदाशी मिठी पडते असे एकनाथ महाराज सांगतात.

मग बैसोनीया पै नेहटी/हाती धरोनी हनुवटी/झणीमाझी लागेल दृष्टी/जे डोहाळे पोटीं ते सांग//९३//

राजाने कौसल्येला जवळ बसवले व हाताने हनुवटी धरून म्हणू लागला कौसल्ये तुझा गर्भाला कोणाची दृष्ट लागेल ती लागू नये लवकर तुझे काय डोहाळे आहे ते मला सांग.

येरी न पाहे वरती/दृश्य द्रष्टा न देखे स्थिती/रामरुपी रतली वृत्ती/व्यक्ताव्यक्ती न देखे//९४//

राजा पत्नी समजून बोलतोय परंतू ती रामस्वरुपाशी एकरुप झाली होती त्यामुळे ती वर पाहत नाही तिची वृत्ती रामरुप पाहण्यात रत झाली आहे त्यामुळे तिला व्यक्त आणि अव्यक्त काहीही द्वेत पदार्थाचे भान उरले नाही.

राजा ओसंडला अतिप्रिती/आलिंगली दोही हाती/येरीस लागली विदेहस्थिती/देह अहंकृती नाठवे//९५//

राजाच्या चित्तात पत्नी म्हणून प्रेम ओसंडू लागले प्रेमाच्या भरात राजाने कौसल्येला आलिंगन दिले परंतू तिला विदेह स्थिती लागली असल्याने मी स्त्री आहे हि अहंकृती ती विसरली होती असे सांगतात.

उदरीं संभवला विदेही/यालागी आठवू नाठवे देही/सबाह्य अंतरी उरली नाही/तथस्थ पाही श्रीराम//९६//

उदरात विदेही श्रीराम प्रगटला असल्याने तिला देहभाव आठवत नाही ती आत आणि बाहेर एक स्त्रि किंवा कौसल्या म्हणून उरलीच नाही ती रामाशी एकरुप होऊन राम पाहत होती.

राजा म्हणे कटकटा/कैसेनि ही अवचटली बरवंटा/की महद्भूत आले पोटात/नयनीं ताठा चढलासे//९७//

पत्नी प्रतिसाद देत नाही हे पाहून राजा घाबरला व त्याला वाटू लागले काय कटकट मागे लागले की काय का मोठे भुतं पोटाला आले हिचे डोळे का ताठरले आहेत असे राजाला वाटू लागले.

कैसें करील मेघश्याम/केवीं पुरे पुत्रकाम/सिध्दी पाववील पुरुषोत्तम/आत्माराम रघुवीर//९८//

देव कसं करेल?कशी माझी पुत्रप्राप्तीची ईच्छा पुर्ण करेल?हे देवा पुरुषोत्तमा आत्मारामा,श्रीरामा अशी याचना राजा दशरथ करू लागला.

रामनाम कर्णपुटीं/ऐकतांची गोष्टी/उघडोनि पाहे दृष्टीं/देखे सृष्टी राममय//९९//

राजाच्या मुखातून हे श्रीरामा ऐकल्या बरोबर कौसल्येने डोळे उघडले तर तिला सर्व सृष्टी राममय झालेली दिसू लागली.

जंव सादरे राव पाहे/नयनी निजतेज न समाये/मी एक गर्भिणी येथे आहे/हा आठवू देहें नाठवे//१००//

राजा आदरपूर्वक लक्ष देऊन कौसल्येच्या डोळ्यात बघतो तर तिच्या डोळ्यातील तेज आकाशात बसणार नाही एवढे दिसू लागले मी एक गर्भवती आहे,मी एक स्त्री आहे समोर बसलेला माझा पती आहे याची आठवण कौसल्येला नाही.

जवं तळवटी पृथ्वी पाहे/तंव ते रामरुप जाली आहे/फिटली पार्थिवाची सोय/देही विदेह श्रीराम//१०१//

कौसल्या खाली पृथ्वीकडे पाहतेय तर तिला पृथ्वी रामरुप झालेली दिसते.सगळीकडे रामच दिसत असेल तर निर्जिव काहीच नाही एकच चैतन्य सगळीकडे वास करतेय यांची अनुभुती कौसल्या घेत आहे श्रीराम हे देही असून विदेही असल्याचा तिला अनुभव येतो.

जंव अवलोकी दाही दिशा/तवं पडला रामरुपे ठसा/पाहता न दिसे आकाशा/श्वासोच्छ्वासामाजी राम//१०२//

कौसल्या दहादिशात बघू लागली तिला सगळीकडे श्रीरामच दिसतोय तोच ह्रदयात ठसावला आहे आकाश दिसत नाही फक्त रामच दिसतोय प्रत्येक श्वासाश्वावासात रामच दिसतोय.

वृक्षवल्ली आणि मंडप/आवघे देखे रामरुप/आशोक ना्व श् चंपक/पाहता एक श्रीराम//१०३//

वृक्षवल्ली,मंडप एकंदरीत तिला सर्व रामच दिसू लागले अशोकाचे झाड असो की चंपकाचे सर्व श्रीरामच दिसू लागले.

जो उदरी संभवला/तोचि सर्वेद्रियी वोसंडला/देहाचा पांग फिटला/प्रपंच जाला ब्रम्हरुप//१०४//

जो भगवान उदरात प्रगटला आहे तोच सर्वेंद्रीयात भरला ओसंडून वाहू लागला देव भेटला देहाचा पांग फिटला, सर्व प्रपंच ब्रम्हरुप झाला.

देखे क्रिडेचे पाडसें/पाहता रामची प्रकाशे/ जे जे देखावया बैसे/ते ते देखे श्रीराम//१०५//

खेळण्यातील वस्तू एकंदरीत सर्वच श्रीरामांमुळे प्रकाशमान असून जे जे पाहायचा प्रयत्न कराल ते ते श्रीरामच दिसू लागले.

दोरु सर्प नाही झाला/दोरा सर्प नाही भेटला/दोरे सर्प नाही देखीला/भ्रमे भाविला भुजंग//१०६//

श्रीराम हे परब्रह्म आहेत त्यामुळे ते संसारात नाहीत जसे साप कधी दोरा झाला नाही दोऱ्याची सापांची गाठ पडली नाही तरीही भ्रमाने माणूस दोरीला साप बोलतात.

तेवीं ब्रम्ही प्रपंच नाही देखीला /ब्रम्ही प्रपंच नाही चाखिला/ब्रम्ही प्रपंच नाही ऐकीला/भ्रमे भाविला अति भ्रांती//१०७//

तसेच ब्रम्हाणे कधीच प्रपंच बघीतला नाही त्याची गोडी चाखली नाही कधी प्रपंच ऐकला नाही तर भ्रमाच्या भ्रांतीत  फक्त भासला गेला आहे असं वाटतं होती.

प्रपंच एक झाला होता/हे समुळ मिथ्या वार्ता/पुढे होईल मागुता/हे ही कल्पांती घडेना//१०८//

प्रपंच कधी झाला नाही होणार नाही कोणी झाला बोलले तर 

ती गोष्ट खोटी आहे पुढेही  होणार नाही.हे कल्पांतात होणार नाही.

या विषयीचा श्लोक /वसिष्ठ बोले अलोलिक/त्याचा अर्थ तात्विक /परिसोत सात्विक सज्जन//१०९//

प्रपंच खोटा असल्याबद्दलचा श्लोक श्रीवशिष्ठजींनी बोलले आहेत श्रोते, सज्जन, सात्विकांनी श्रवण करावे असे संत एकनाथ महाराज सांगतात 

भ्रमे श्रेष्ठत्व ईश्वर /भ्रमे कर्म धर्म सदाचार/भ्रमें वाढला व्यवहार/भ्रममुळ संसार निजसत्य//११०//

ज्ञान नसताना निर्माण झालेल्या भ्रमातूनच आपण कनिष्ठ असून ईश्वर श्रेष्ठ आहे अस वाटत तर तसे नसून ज्ञान दृष्टीने जिव ब्रम्ह एकच आहेत तसेच व्यापक भावनेच्या विसरातूनच धर्म,कर्म, सदाचार या प्रकरणात जिव आडकतो आणि याच संभ्रमात जन्म, मृत्यू, संसार हा व्यवहार वाढतो तर संसाराच मुळ भ्रम हेच असून त्याचा शेवट ब्रम्ह आहे जे निजसत्य आहे.

जनकादीक मुक्त असती/तेही प्रपंची वर्तती/त्यांच्या प्रपंचाची स्थिती/वसिष्ठ श्लोकोक्ती वदे ते ऐका//१११//

विदेही जनकासारखे महात्मे प्रपंचात वर्तन करत असताना सुध्दा मुक्त असतात त्यांच्या प्रपंचात राहण्याची स्थिती कोणती आहे हे श्री वशिष्ठ श्लोकातून सांगतात ऐका.

जैसा सोन्याचा रवा घेता/तो अलंकार समस्ता /सोनेपणे घे तत्वता/तेवी व्यवहार मुक्ता परब्रह्मत्वे//११२//

ज्याप्रकारे सोन्याचा रवा म्हणजे पिठ आहे त्याचा अलंकार बनवला तर पिठ आणि अलंकार या दोन्ही वेळी ते सोनेच आहे फक्त अलंकार बांधला जातो आणि मुक्त बंधमुक्त असतो तसंच व्यवहार मुक्त व्यक्ती परब्रह्म भावनेतून मुक्त जिवन जगत असतो.

मुक्त ब्रम्हरुप मीतूंपण/शत्रु मित्र ब्रम्हपुर्ण/ब्रम्हरुप त्रिभुवन/भुते सनातन ब्रम्हरुप//११३//

मुक्त व्यक्ती ब्रम्ह रुपाने जिवन जगतो त्यामुळे त्याच्यात मी तू पण नाही शत्रू आणि मित्र ब्रम्ह दिसतात सर्व त्रीभुवन ब्रम्हरुप दिसते, संपुर्ण भुतजात सनातन ब्रम्हरुप वाटते.

ऐसीया ब्रम्हस्थिती/मुक्त संसारी वर्तती/जिच्यासं मरण्याची भ्रांती/नाही त्या चित्ती ब्रम्हरुपत्वें//११४//

अशा ब्रम्हस्थितीवर राहून मुक्त व्यक्ती संसारात वर्तन करतात ज्याला मरणाची भ्रांती नसते कारण चित्तब्रम्हरुर्वत एकवटले आहे.

कौसल्या रामगर्भत्वें निभ्रंत/राजा पुत्रधर्मे कर्मभ्रात/डोहाळे तिसी पुसतां तेथ/ विनोद विस्मित परमार्थी परिसा//११५//

कौसल्येच्या उदरात राम असल्याने ति भ्रमरहीत होती परंतू राजामात्र माझा पुत्र मी त्याचा पिता या पुत्र धर्माने कौसल्येला डोहाळे विचारतोय.

स्वस्ति श्रीरामायण/एका जनार्दना शरण/डोहळ्यांचे निरुपण/विनोद पूर्ण परब्रह्म//११६//

एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात कौसल्येच्या डोहाळ्याचा विनोद सांगत आहेत.

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे/एकाकारटीकायां कौसल्यादोहदनिरुपणं नाम चतुर्थोऽध्याय://४//श्लोक//३//ओव्या//११६//








Comments

Popular posts from this blog

भावार्थ रामायण बालकांड अध्याय १

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३

बालकांड अध्याय ६