भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३


श्रीएकनाथमहाराजकृत ॥॥ श्रीभावार्थरामायण ॥
बालकाण्ड॥ अध्याय तिसरा ॥
॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥
कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण :

कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।
तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥
ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात कैकयीचा भाग घारीने नेल्यानंतर माता कैकयी अतिशय दु:खी झाल्या असताना कौशल्यामाता कैकयी ला पोटाला धरून समजूत घालत आहेत. तु विनाकारण का दु:खी होत आहेस तुझे आणि माझे सुख आणि दु:ख एकच आहे. 
एकोदरा सख्या बहिणी ।दोघी पर्णिजे दोघींजणी/त्यांसी काही नाही मिळतील/दो दुस्सर पाटणी नांदती सख्या ॥२॥
आपण खऱ्या अर्थाने बहिणी आहोत ज्या एका पटातून जन्मतात पण दोघींना दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिलेल्या असतात. 
दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।
 दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥
दोघींची कधीच गाठभेट होत नाही सतत चर्चा होत नाहीत एकमेकींना कधी दिसत नाहीत त्यामुळे त्यांच्या सखेपणाच्या गोष्ठी खोट्या आहेत. आपल्या दररोज भेटी होतात असे माता कौशल्या माता बोलतात. 
दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।
दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥
एकापोटातून जन्मलेल्यांमध्ये रोज कोणताच संबध येत नाही संवाद होत नाही एकमेकींच काय सुरु आहे याचा बोध होत नाही. त्यामुळे ते सखेपणा खोटा आहे. 
दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।
तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥
दोघींचे पती वेगळे, दोघींचा संसार वेगळा त्या दोघींना अज्ञानी लोक सखी म्हणतात पण कैकयी आपला पती एकच, आपला संसार एकच आहे मग तु का विनाकारण शोक करत आहेस. 
आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां तुम्हां एक निजभूषण ।
आम्हां तुम्हां एक निजमंडन सख्यपण एकत्वें आम्हां तुम्हां ॥६॥
माझे आणि तुझे पती एकच आहेत आपले मंगळसुत्र एकच आहे आपले अलंकार भुषन अहेवपन एकच आहे त्यामुळे आपणच खऱ्या सख्या बहिणी आहोत असे माता कौशल्या कैकयी ला समजवत आहेत. 
आम्हां तुम्हां एक सांगात । आम्हां तुम्हां एक भोगार्थ ।
आम्हां तुम्हां एक कांत । सख्य सख्यार्थ आम्हां तुम्हां ॥७॥
तुझा आणि माझा सोबती एकच आहे एका पसूनच आपले भोग आहेत आपला कांत एकच आहे त्यामुळेच आपला सख्यसंबंध खरा आहे. 
 आम्हां तुम्हां एक नाहो । आम्हां तुम्हां एक सद्भावो ।
आम्हा तुम्हा एकात्मस्नेहो आम्हां एक भोगभुवन ॥ ८ ॥
आम्हाला आणि तुम्हाला एकच न्याहळणारा आहे आपण एकावरच सद्भाव ठेवणाऱ्या आहोत एकच आत्मस्नेह दोघींना पण राजा दशरथाचा आहे माता कैकयी ची समज काढत आहेत. 
आम्हा एक निवासस्थान/आम्हा एक भोगभूवन/आम्ही एकें सुखें संपन्न । सत्य सखेपण आम्हां तुम्हां ॥९॥
आपण एकाच्याच सुखाने संपन्न आहोत म्हणून आपला खरा सखेपणा आहे. 
आम्हां  नित्यत्वें चाळिता । आम्हां एक नित्यत्वें प्रतिपाळिता ।
आम्हां एक नित्यत्वें न्याहाळिता । हे नित्य सख्यता आम्हां तुम्हां ॥१०॥
आपल्याला नित्य सदोदित पाहणारा आपल प्रतिपालन करणारा न्याहळणारा आणि आपला सखा एकच राजा दशरथ आहे. 
आम्हां तुम्हां एक गोसावी । आम्हां तुम्हां एक निववी ।
आम्हां तुम्हां एक जीववी । हे सत्य पदवी सख्याची ॥११॥
आपल्या दोघींचा मालक एक आहे तोच आपल्याला तृप्त करतो, तोच आपले पालन करतोय त्यामुळे सखेपनाची खरी व्याख्या आपली आहे.
आम्हां तुम्हां एक पांचभौतिक । एकचि हस्तपादादिक ।
आम्हां तुम्हां देखणें एक । हें अलोलिक निजसख्य ॥१२॥
एकाच पंचमहाभूतांचे बनलेले शरिर,एकच हातपाय,अवयव तु पाहते तेच मी पाहते त्यामुळे लोकांच्या वेगळे आपले खरे सख्य आहे असे कौसल्या माता बोलतात.
आम्हां तुम्हां एक नाथ । सत्यत्वें जाण दशरथ ।
तूं खेद करितेसी व्यर्थ । ऐक वृत्तांत साजणी ॥१३॥
तुझा आणि माझा पती एक आहे दशरथ आहे मग तु का दुःख करत आहेस साजणी ऐक मी तुला सांगते.
पुढिलांचे देखोनि दुःख । सुख मानिता परम मूर्ख ।
परांचे निरसोनि असुख । द्यावे सुख शुद्धत्वें ॥१४॥
समोरच्या व्यक्तीच दु:ख पाहून ज्याला आनंद होतो तो मनुष्य मोठा मुर्ख असतो म्हणून समोरच्याचे दु:ख समजून त्याचे निवारण करावे आणि त्याला शुद्ध सुख द्यावे.
परदुःखें होय सुखी । तो ब्रह्मराक्षस तिहीं लोकीं ।
सदा निंद्य शास्त्रमुखीं । शुद्ध सात्विकी तो नव्हे ॥१५॥
दुसऱ्याच्या दु:खाला पाहून जो सुखी होतो तो ब्रम्ह राक्षस आहे सतत शास्त्र अशांची निंदा करते तो कधीच शुद्ध सात्विक असू शकत नाही.
तूं राहसी अपुत्रपणीं । आम्ही सुख पावों पुत्रपणीं ।
तैं पूर्वज पडती पतनीं । तो दोष त्रिभुवनीं न समाये ॥१६॥
कैकयी तुला मुले होणार नाहीत आणि आम्हाला मुले होणार म्हणून जर आम्ही आनंदी झालो तर आमचे पुर्वज नरकात पडतील तो दोष त्रिभुवनात बसणार नाही एवढा मोठा असेल.
उपजला पुत्र देऊं जातां । तो पोसणा म्हणती तत्त्वता ।
साधूं दोघींच्या निजस्वार्था । अवंचकता परमार्थ ॥१७॥
माझ्या पोटी जन्मलेला मुलगा तुला देऊ तर लोक म्हणतील फक्त पोसण्यासाठी दिला आहे त्यामुळे दोघींना आनंद होईल असा मार्ग निवडून ज्यामुळे अवंचक परमार्थ होईल.

उदकस्य रसः चैत्यं अन्नस्य स्वादरो रसः ।
आनुकूल्यं रसः स्त्रीणां मित्रस्य अवंचको रसः ॥१॥

उदकाची गोडी शीतळता । अन्नाची गोडी आर्द्रता ।
स्त्रियांची गोडी अनुकूलता । अवंचकता मित्रगोडी ॥१८॥
संत एकनाथ महाराज उदाहरण देतात पाणि थंड असेल तर गोड लागते प्यावे वाटते, अन्नपदार्थामध्ये आद्रता म्हणजे पाण्याचे प्रमाण असेल तरच ते खाता येते, पत्नी जर अनुकूल असेल तरच संसारात गोडवा असतो आणि मित्र मित्राच्या कामासाठी तत्पर असेल तरच ती मैत्री आनंद देते.
आम्ही तुम्ही सख्या बहिणी । ऐसी बोलिजे कहाणी ।
ते करून दावावी करणी । येर बोलणी अति मिथ्या ॥१९॥
तु आणि मी सख्याबहिणी आहोत असे मी बोलले ते फक्त बोलण्यापुरते असेल तर ते खोटे असते जसे बोलले तसे करून दाखवावे लागते असे कौसल्या माता बोलतात.
जैसें बोले तैसें करी । त्यातें वंदिजे हरहरीं ।
येर ते व्यर्थ बोलाची ज्ञानफरारी । तो संसारी पढतमूर्ख ॥२०॥
बोलण्यासारखेच जो वागतो त्याला हरीहर वंदन करतात व जे फक्त बोलण्यातच चतूर असतात आणि कृती शुन्य असतात त्यांचं ज्ञान फरार असते असे सांगतात.
जैसा बोले तैसा क्रियार्थ । या नांव मुख्य परमार्थ ।
येर बोलणें ते व्यर्थ । विषयस्वार्थ परमार्थी ॥२१॥
जसे बोलतो तसेच करतो याला मुख्य परमार्थ म्हणतात याशिवाय जे बोलणे आहे ज्यात सत्यता नाही ते फक्त विषय स्वार्थ आहे असे सांगतात.

कौसल्या व सुमित्रा स्वतःच्या प्रसादातील अर्धा भाग कैकेयीला देतात 

माझें बोलणे सत्य सांग । माझ्या भागाचा अर्धभाग ।
साजणी गुएई वो सवेग । दोघींचे अभंग सख्यत्व येणें ॥ २२ ॥
कौसल्या माता म्हणतात माझं बोलणं सर्व अंगांनी सत्य आहे माझ्या भागातील अर्धा भाग तुला देते तु लवकर घे यामुळे आपलं प्रेम अखंड राहिल.
ऐकतां कौसल्येचें वचन । कैकेयीस जालें समाधान ।
करूनि सुद्धाचमन । भागार्थ घे आपण स्वानंदें ॥ २३ ॥
कौसल्या मातेचे बोलणे ऐकले आणि कैकयीला समाधान वाटले उठली आणि सुध्दाचमन केले आणि आनंदाने कैकयीने कौसल्या मातेचा अर्धभाग स्विकारला.
मृत पावे अमृतपान । तृषिता मुखीं निज जीवन ।
अंधा उघडले लोचन । तैसें वचन कौसल्येचें ॥ २४ ॥
मेलेल्या माणसाला अमृत मिळावे, तहानलेल्या मुखात पाणि पडावे किंवा अचानक अंध व्यक्तीला डोळे भेटावेत तसे कैकयीला कौसल्या मातेचे शब्द वाटले.
रंका लाधलें निधान । अकर्मी पावे ब्रह्मज्ञान ।
दुष्काळिया मिळे मिष्टान्न । तैसें वचन कौसल्येचें ॥ २५ ॥
गरिबाला धनाचा हंडा सापडावा किंवा सदाचारहिन व्यक्तीला ब्रम्हज्ञानाची प्राप्ती व्हावी तसे कैकयीला कौसल्याचे शब्द वाटले.
कौसल्येची बुद्धि समान । समत्वें भागविभाग आपण ।
कैकेयीसी दे विभागून । सुखसंपन्न समत्वें ॥ २६ ॥
कौसलेच्या बुध्दीत भेद नाही त्यामुळे स्वतः पुर्ण अधिकार असलेल्या भागाचे समान दोन भाग करून कैकयीला अर्धा भाग दिला आणि अभेदाच्या सुखाने कौसल्या संपन्न झाली.
भाग देतां कैकेयीसी । कौसल्या अति उल्हासी । 
सवतीभाव नाहीं मानसीं । देत उल्हासीं निजभाग ॥ २७ ॥
कैकयीला आपल्या हक्काचा अर्धाभाग देताना चित्तात आपण आपल्या वाट्याचे देतोत द्यावे की नाही हा भाव नसून सवतीला आपल्या हक्काचा अर्धाभाग देताना आनंद आहे असे सांगतात.
जैसी कौसल्येची विधी । तैसीच सुमित्रेची सद्बुगद्धी ।
बाप सत्संगाची सिद्धी । दे अर्धार्ध निजभाग ॥ २८ ॥
कौसल्या माता ज्याप्रमाणे कृती करतात कोणताच संकोच न बाळगता माता सुमित्रा कौसल्या मातेचे अनुकरण करतात.संत एकनाथ महाराज उदाहरण देतात हि संत्संगाची सिध्दी आहे सुमित्रा सुध्दा आपला अर्धभाग कैकयीला देतात.
सत्संगाचें निजमहिमान । कौसल्या देत आपणासमान ।
कौसल्येसंगें सुमित्रा जाण । दे आपण भागार्ध ॥ २९ ॥
हा संत संगतीचा महिमा आहे की दुसऱ्याला आपल्या बरोबर बनवावे खरे पाहता पिंडावर पुर्ण अधिकार कौसल्या मातेचा असताना आपल्या वाट्याचा कैकयीला देत असताना कमी न देता स्वतः घ्या बरोबरच दिला हे श्रेष्ठत्व माता कौसल्येचे आहे आणि कौसल्येच्या संगतीत राहून त्या श्रेष्ठत्व भावनेच अनुकरण सहजपणे सुमित्रा माता करत आहेत हा संत संगतीचा महिमा आहे असे सांगतात.
सुष्ठु मैत्री कौसल्येसीं । म्हणोनि सुमित्रा म्हणणें तियेसी ।
तेणें सुमित्रा भावेंसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३० ॥
सुमित्रा व कौसल्येची श्रेष्ठ मैत्री आहे म्हणून सुमित्रा म्हणतात ज्या भावनेने कौसल्या भाग देतात त्याच भावनेने सुमित्रा आपला भाग देतात.
जैसा संग होय ज्यासी । तैसी बुद्धि होय त्यासी ।
कौसल्यासंगे सुमित्रा तैसी । दे कैकेयीसी भागार्ध ॥ ३१ ॥
व्यक्तीला जशी संगत मिळेल तशी त्याची बुद्धी होते कौसल्या मातेच्या संगतीत सुमित्रा अर्धा भाग कैकयीला देतात.

ऋषींना आनंद :

ऐकोनि कौसल्येचा वचनार्थ । देखोनि भागदानींच नि स्वार्थ ।
वसिष्ठ आनंदें नाचत । स्वयेंडुल्लत स्वानंदें ॥ ३२ ॥
कौसल्येचे शब्द वशिष्ठजींनी ऐकले आणि कौसल्येने कैकयीला अर्धा भाग देण्यातच दोघींचे यश आहे स्वार्थ आहे हे समजले आणि वशिष्ठ नाचू लागले,स्वानंदाने डूलू लागले असे सांगतात.

करितां भागप्राशन । उदरा आला रघुनंदन ।
धन्य अयोध्या-राजभुवन । तेथें स्वानंदघन क्रीडेल ॥ ३३ ॥
कौसल्या मातेने आपल्या अर्धभागाचे प्राशन केले आता तिच्या पोटाला भगवान श्रीराम येणार आहेत धन्य धन्य अयोध्येचे लोक आहेत ज्यांना प्रभु खेळताना पहायला मिळतील.
उभवोनी स्वानंदाची गुढी । नारदाची पडे उडी ।
नाचूं लागे आवडी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ३४ ॥
स्वानंदाची गुडी उभी करून म्हणजे अतिशय आनंदी होऊन नारदजी नाचू लागले आता सुर्यवंशा मोठी चांगली दशा आली आहे असे नारद सांगतात.
सुटेल देवांची बांधवडी । तुटेल नवग्रहांची बेडी ।
मुक्ति सुरवाडेल गाढी । सुख सुरवाडी पाल्हेजेल ॥ ३५ ॥
रावणाच्या बंदित असलेल्या देवांची बांधवडी सुटेल नवग्रहाची बेडी सुटेल मुक्ती सहज सर्वांना मिळेल सगळीकडे सुख सुरवाडेल म्हणजे सुखच सुख होईल.
माझ्या वाल्मीकीचें वचन । जालें प्रत्यक्षप्रमाण ।
राम प्रगटला निजनिधान । धन्य जन अयोध्येचे ॥ ३६ ॥
नारद मुनी नाचू लागले त्यांना खुपचं आनंद झाला कारण नारदांचे शिष्य वाल्मिकमुनी यांनी लिहिलेल्या अनागत रामायणाला अनुसरुनच भगवान वर्तन करतील याचा अतिशय आनंद नारदांना झाला खरोखरच अयोध्येचे लोक धन्य आहेत जेथे प्रभु श्रीराम प्रगट झाले.
लंकेपुडें युद्ध दारुण । राम करील रणकंदन ।
तें मी देखेन आपण । हरिखें उड्डाण करी नारद ॥ ३७ ॥
श्रीराम लंकेला जाऊन पुढे युद्ध करतील ते मला पहायला मिळेल नारदांना युद्ध बघायची आवड असल्याने मोठं मोठ्या उड्या मारत नादर नाचू लागले.
जेवित्याची चवी जेविता जाणे । तेवीं वसिष्ठनारदांचे नाचणें ।
तें सुख तिहींच भोगणें । येरीं पाहणें टकमकां ॥ ३८ ॥
जेवन करत असताना जेवणाची चव आणि त्याचा आनंद जेवनारालाच मिळतो इतरांना तो समजत नाही तसेच नारद आणि वसिष्ठ यांचा आनंद इतरांना समजणार नाही नारदाच्या शिष्यांचा वाल्मिकाचा शब्द खरा ठरणार आहे त्या शब्दाचा सन्मान प्रभु श्रीराम ठेवणार आहेत हा आनंद नारदाला आणि कौसल्या सवतीमत्सर न ठेवता आपला अर्धभाग कैकयीला देत आहे त्यामुळे जिथे मत्सर , द्वेष नाही तिथे श्रीराम प्रकट होतात विशिष्टांची शिष्य कौसल्या आणि नारदाचे शिष्य वाल्मिकमुनी देव मिळवण्यात परिपक्व झाले याचा दोन श्रीगुरुना आनंद झाला असे संत एकनाथ महाराज सांगतात.
विभांडक आनंदे मनीं । कौसल्या सत्वशिरोमणी ।
इचेनि पावन जाली अवनी । धन्य त्रिभुवनीं कौसल्या ॥ ३९ ॥
विभांडक ऋषींना आनंद झाला ते म्हणू लागले खरोखरच कौसल्या सत्विकांमधील सर्वश्रेष्ठ आहे तिच्यामुळे पृथ्वी पावन झाली आज त्रिभुवन कौसल्येमुळे धन्य आहे कारण तिच्या पोटाला भगवान श्रीराम येणार आहेत.
ऋष्यशृंग तये वेळीं । सुखावला सुखकल्लोळीं ।
उड्डाण करोनि दे आरोळी । कौसल्या भूतळीं आणील राम ॥ ४० ॥
शृंग ऋषींना आनंद झाला मोठ्याने जय श्रीराम अशी आरोळी दिली आणि म्हणू लागले ब्रम्हांडनायक श्रीराम आज कौसल्येमुळे पृथ्वीवर प्रकट होणार आहेत.

कौसल्येचा शुद्ध भावो । ते भावीं प्रकटला रामरावों ।
धन्य दशरथ महाबाहों । गर्भान्वयो अलोलिक ॥ ४१ ॥
कौसल्येचा भाव शुध्द आहे त्याच भावामुळे राम प्रकट झाले.दशरथही धन्य धन्य आहे ज्यांच्या पोटी श्रीराम जन्मणार आहेत.
विस्मय करिती ऋषीश्वर । तटस्थठेले सुरवर ।
अवघे करिती जयजयकार । भागिला रघुवीर चतुर्थ भागीं ॥ ४२ ॥
सर्व ऋषींना आश्चर्य वाटले,देव लोक तटस्थ झाले सर्वांना आश्चर्य वाटू लागले देव प्रकट होणार!सगळेच मोठ्याने गर्जना करून लागले सर्वसृष्ठीचे पालनहार चार ठिकाणी विभागून प्रगट होणार आहेत.
मुख्य द्वेष सवतीमत्सरासी । तो मत्सर नाहीं कौसल्येसी।
म्हणोनि श्रीराम आला कुसी । त्या गर्भासी अवधारा ॥ ४३ ॥
जगात सर्वात मोठा द्वेष कोणता असेल तर तो सवती द्वेष असतो परंतु सवतीला सुध्दा सख्खी बहिण समजणारी कौसल्या असल्याने तिच्या पवित्र कुसीमध्ये श्रीराम येणार आहेत.
सवती मत्सर कैकेयीसी । म्हणोनि हारविलें निजभागासी ।
शुद्ध भाव कौसल्येसी । तिच्या गर्भासी श्रीराम ॥ ४४ ॥
कैकयीच्या ठिकाणी सवती मत्सर असल्याने तिने तिचा भाग हारवला कौसल्येचा भाव शुध्द असल्याने तिच्या पोटी श्रीराम आले असे सांगतात.
एक ताट आलें जञशेषीं । तेथेचि गर्भ निश्चयेसीं ।
तो विभागला चतुर्थ भागेंसी । चतुर्विध त्यासी बोलिजे ॥ ४५ ॥
यज्ञपुरुषाने एकच ताट दिले होते त्याचे चार भाग केले याला चतुर्विध असे म्हणतात.
मुख्यार्थ कौसल्येपासी । तद्भंजनार्ध जाणा सुमित्रेसी ।
दोनी अर्धार्ध कैकेयीसी । स्वतंत्र भाग तिसी असेचिना ॥ ४६ ॥
भागातील मुख्य अर्धा भाग कौसल्ये जवळ आणि तिच्या भागाची भक्ती करणारा मधील अर्धा सुमित्रा जवळ आहे दोघींचे अर्ध अर्ध भाग कैकयी जवळ आहेत.
पुढां पोटीं होती पुत्र । ते तिचे नव्हती स्वतंत्र ।
यालागीं बोलिजे परतंत्र । कैकेयीचरित्र नावडे त्यांसीं ॥ ४७ ॥
पुढं कैकयीला मुलं होतील पण ते तिचे स्वतंत्र नसल्याने दुसऱ्या भागापासून झाल्यामुळे त्यांना परतंत्र म्हणतात त्यांना कैकयी चे वागणं आवडत नाही.
असो पुढील कथेसी । वसिष्ठें पाचारोनि तिघींसी ।
देवोनि भाग विभागासी । म्हणे विलंबासी करूं नये ॥ ४८
वशिष्ठ ऋषींनी तिघींना बोलवले भाग दिले वेळ न लावता प्राशन करा असे सांगितले.
कैकेयीचा उद्वेग व याचे परिणाम :

दोघीं निजभागप्राशन । केलें न लगतां दर्शन ।
कैकेयी भागप्राशन । करितां उद्विग्न ते जाली ॥ ४९ ॥
दोघींनी स्वतःचे भाग तात्काळ प्राशन केले कैकयी भाग प्राशन करताना उद्विग्न झाली.
दोनी अर्ध जंव घोंटी । तंव ते बैसले कंठीं ।
गिळूं जातां अति संकष्टीं । गोंटितां घोटी गोंटेना ॥ ५० ॥
दोन्ही भाग जसे एकत्र मुखात टाकले तसे ते कंठात बसले गिळता येत नसल्याने कैकयी माता दुःखी झाल्या‌.
भाग तिचे नव्हते स्वतंत्र । परभाग गिळूं न शके वक्त्र ।
पांढरे जाले तिचे नेत्र । वमनोद्‌गार ते जाली ॥ ५१ ॥
भाग तिचे स्वतंत्र नसल्याने परभाग ते पण दोन्ही एकदम मुखात टाकल्याने गिळता येत नव्हते तिचे डोळे पांढरे झाले आणि ती ओकाऱ्या करू लागली.
पराचें ओझें वाहणें । तें आपणासी होय उबगवाणें ।
तेवीं परभाग घोंटिता तिणें । जीवे प्राणें घोंटेना ॥ ५२ ॥
संत एकनाथ महाराज सांगतात दुसऱ्या चे ओझे वाहणे म्हणजे आपल्याला त्रास करून घेणं होय तसेच दुसऱ्याचे भाग लवकर खाण्यासाठी प्रयत्न केला पण नरड्याच्या खाली घास जात नसल्याने तिला त्रास होऊ लागला.
विभागें रोधली तिची घांटी । ऐसें वसिष्ठें देखिली दृष्टी ।
मंत्रोदक देऊन उठाउठी । तेणें घोटी विभाग ॥ ५३ ॥
घास तिच्या कंठात अडकले हे गुरुदेव श्री वशिष्ठ ऋषींनी बघीतले आणि लगेच मंत्र उदक दिल्याबरोबर कैकयी कडून घास घोटले गेले.
सेवितां ते मंत्रोदक । फिटली शंका पावली सुख ।
पुत्रगर्भाचा संतोष । आत्यंतिक ते पावे ॥ ५४ ॥
ते मंत्र उदक प्राशन केल्याने शंका संपली आणि कैकयी सुखी झाली गरोदर झाल्याचा आत्यंतिक आनंद तिला झाला.
साधु असतां निजनिकट । भलतें निवारे संकट ।
गर्भमंडित जालें पोट । सुख उद्भट कैकेयीसी ॥ ५५ ॥
साधू जर जवळ असतील तर आलेले भले मोठे संकट दुर होतात जसे कैकयी चे झाले आणि गरोदर झाल्याचे मोठे सुख कैकयी ला झाले.
हरपले सांपडे रत्न । मरत्या घडे अमृतपान ।
तेवीं वसिष्ठोदकें जाण । सुख परम कैएयीसी ॥ ५६ ॥
हारवलेले रत्न सापडावे किंवा मरणाराला अमृत मिळावे तसेच वशिष्ठांनी दिलेल्या मंत्र उदकामुळे कैकयी चे दु:ख गेले आणि कैकयी सुखी झाली.
सत्संगमहिमा :

यालागी सत्संगती । दुःख नव्हे ना अधोगती ।
सत्संगाची परम ख्याती । नेणों किती उद्धरले ॥ ५७ ॥
म्हणूनच संतांच्या संगतीत राहिले तर दु:ख राहत नाही आणि अधोगतीला जात नाही हि संत्संगाची ख्याती आहे आजपर्यंत अगणीत लोकांचा सत्संगामुळे उध्दार झाला आहे असे संत एकनाथ महाराज सांगतात.

सत्संगेन हि दैतेया यातुधानाः खगा मृगाः ।
गंधर्वा राक्षसा नागां सिद्धचारणगुह्यकाः ॥ २ ॥

दैत्यदानव राक्षसृष्टी । गण गंधर्व मृग पक्षी पुष्टी ।
सिद्ध चारण गुह्यक कोटी । उद्धरले सृष्टी सत्संगें ॥ ५८ ॥
दैत्य,दानव,राक्षस,गण, गंधर्व,हरिण,पक्षी,सिध्दचारण असे अनेक लोक सत्संगामुळे उध्दार गतीला प्राप्त झाले असे सांगतात.
मनुष्यलोकींची गोष्टी । सत्संग लाधल्यापाठीं ।
उद्धरले कोट्यनुकोटी । सभाग्य सृष्टी सत्संगें ॥ ५९ ॥
मनुष्य लोकांमध्ये सत्संगतीला लागल्यामुळे कोट्यान कोटी लोकांचा उध्दार झाला खरोखरच सत्संगामुळे जगात भाग्यवान होता येते.
धन्य धन्य तो दशरथ । ज्यासी सत्संग पुरोहित ।
त्याची काठी मानी आदित्य । तो घरांत निजसखा ॥ ६० ॥
खरोखरच तो दशरथ धन्य धन्य आहे ज्यांच्या घरी श्री वशिष्ठांसारखे संत पुरोहित आहेत ज्यांची काठीला सुर्याचे तेज आहे तो घरात सखा सद्गुरू श्री वशिष्ठ आहे.
तेणें विसिष्ठें आपण । तिघींस करविलें पिंडप्राशन ।
एका विनवी जनार्दन । गर्भावधारण अवधारा ॥ ६१ ॥
त्या महान श्री वशिष्ठांनी तिघी मातांकडून पिंड प्राशन करून घेतले एका जनार्दन स्वामींना विनंती करून संत एकनाथ महाराज सांगतात आता गरोदर पणातील कथा ऐकायला तयार रहावे.
स्वस्ति श्री भावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां
पिंडप्राशनं नाम तृतीयो‍धायः ॥
॥ श्लोक २ ॥ ओंव्या ६२ ॥ एवं ६४ ॥

या अध्यायाचे यजमान श्री शिवाजी लक्ष्मण मुंडे 
स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे सिकिंद्राबाद 

यांच्या द्वारा सहकार्य खुप खुप धन्यवाद 

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

भावार्थ रामायण बालकांड अध्याय १

बालकांड अध्याय ६