भावार्थ रामायण बालकांड अध्याय २

  श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥बालकाण्ड॥ अध्याय दुसरा ॥

॥ श्रीसद्‌गुरु रामचंद्राय नमः ॥

यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग

राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥

राजाने सर्व राष्ट्र पाहिले तर राष्ट्रातील सर्व द्वंद्वदु:ख दुष्काळ संपला सगळीकडे सुकाळ झाला ज्या वृक्षाला फळ लागत नव्हते त्याला सुध्दा फळे लागू लागली. 

प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर । याग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥

प्रजा आनंदाने निर्भयपणे विचरत आहे गाई ब्राम्हणांत आनंद आहे घरोघरी द्विजवर होमहवन, यज्ञ करु लागले. 

पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥

पृथ्वी धनधान्याने परिपुर्ण झाली, कोणालाही दु:ख दैन्य नाही कारण घरोघरी वेदाच अध्ययन सुरु आहे. भगवंताच्या किर्तीच वर्णन सुरु आहे म्हणून सर्वजण सुखी होती. 

भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥

भगवान श्रीराम पृथ्वीवर अवतार घेणार आहेत म्हणून सर्व वैकुंठाच वैभव अयोध्येत आले होते त्यामुळे अयोध्या शोभायमान दिसू लागली. 

अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन

राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना ॥ ५ ॥

राजा दशरथ सिंहासनावर अतिशय शोभुन दिसू लागला, राजभवनात आनंद होता सर्व त्रिभुवनात आनंद मावत नव्हता इतक्यात स्वर्गातून देवांगना अयोध्येत आल्या. 

नमन केले रायासी । इंद्रें पाठविले तुम्हांपासीं ।काय अनुज्ञा आम्हासी । त्या कृतकार्यासी प्रेरावें ॥ ६ ॥

अप्सरांनी राजाला नमस्कार केला आणि सांगितले आम्हाला इंद्राने तुमच्याकडे पाठवले आहे. आम्हाला काय कार्य आहे त्याची आज्ञा द्यावी अस अप्सरा बोलू लागल्या.... 

राजा म्हणे तया अप्सरासी । प्रलोभोनि आणावे ऋष्यशृंगासी ।कळो न द्यावे विभांडकासी । अचुक कार्यासी साधावें ॥ ७ ॥

राजा अप्सरांना सांगु लागला तुम्ही प्रलोभन देऊन ऋष्यशृंगाला अयोध्येत आणावे परंतू हि गोष्ट विभांडक ऋषीला कळणार नाही याची काळजी घ्यावी. 

विभांडक गेला अनुष्ठानासी । एकला ऋष्यशृंग गुंफेसीं ।प्रमदा पातल्या तयापासीं । हावभावेंसीं उद्यत ॥ ८ ॥

विभांडक ऋषी अनुष्ठान आला गेल्यानंतर ऋष्यशृंग गुंफेमध्ये एकटेच होते त्याठिकाणी अप्सरा आल्या आणि वेगवेगळे हावभाव दाखण्यासाठी उतावीळ झाल्या. 

अप्सरांना पाहून झालेली ऋष्यशृंगाची अवस्था

त्यांसी देखतांचि दृष्टी । ऋष्यशृंगें सांडिली पर्णकुटी ।होतां डोळियां डोळेभेटी । पळे उठाउठी मृगभावें ॥ ९ ॥

त्या अप्सरांना पाहिले आणि ऋष्यशृंग पर्णकुटी सोडून पळाला. 

मुख मुरडी मागिलीकडे । परतोनि पाहें तयांकडे ।स्वेग पाउलीं पळे पुढें । रहों राहों उडे सत्राणें ॥ १० ॥

ज्याप्रमाणे हरीण थोडस पळून मग मागे पाहते तसेच तो परत परत मागे वळून पाहू लागला पळू लागला उड्या मारू लागला. 

दुरोनि पाहे दृष्टी । मा कैसेनि होईल भेटी ।बोलण्याच्या खुंटल्या गोष्टी । नातुडे दृष्टी मृगभावें ॥ ११ ॥

अप्सरा दुरून पाहु लागल्या म्हणू लागल्या माय कशी भेट होईल कस बोलता येईल याला मृग भावनेमुळे हा सापडतच नाही. 

झाली विभांडकाची वेळ । प्रमदा गेल्या सकळ ।

ऋष्यशृंग अति विकळ । आला तत्काळ गुंफेसीं ॥ १२

विभांडक ऋषी आश्रमाला येण्याची वेळ झाली सर्व स्त्रीया निघून गेल्या ऋष्यशृंग विकळ झाला व आश्रमात आला. 

करितां पितयाचे सेवेसी । त्या आठवतीं मानसीं ।कैसे आले होते तापसी । अति विव्हळे ऋषीश्वर ॥ १३ ॥

वडीलांची सेवा करताना त्या अप्सरा ऋष्यशृंगाला आठवू लागल्या त्याने कधी स्त्री पाहिली नव्हती तरीही सौंदर्य आकर्षीत करत होते त्यामुळे विचार करतोय कसले ऋषी आले होते किती सुंदर होते याच विचाराने तो विव्हळ झाला. 

पिता पुसे पुत्रासी । आजि दुश्चित कां मानसीं ।तो म्हणे आले होते तापसी । तुमचे भेटीसी अति साधु ॥ १४ ॥

वडील विचारत होते आज तुझ मन स्थिर दिसत नाही तेव्हा तो म्हणतो की बाबा आज तुमच्या भेटीला काही तपस्वी साधु आले होते. 

त्यांच्या जटांसीं मवाळी । मनोहर अंगें सोज्ज्वळीं ।मज पळतां तत्काळीं । अदृश्य ते वेळी ते झाले ॥ १५ ॥

त्यांच्या अतिशय नाजूक जटा होत्या, मनाला वेध लावेल अस सोज्वळ शरिर होते. त्यांना पाहून मी पळालो आणि मग त्या अदृश्य झाल्या. 

मी न घे त्यांचे दर्शन । व्यर्थ केले पलायन ।क्षणक्षणां होय आठवण । उद्वेग पूर्ण त्यांचेनि मी ॥ १६ ॥

मी त्यांचे दर्शन न घेता उगीच पळालो. मला त्यांची क्षणोक्षणी आठवण होत आहे. म्हणून माझ मन स्थिर नाही अस ऋष्यशृंग म्हणू लागला. 

येरू न सांगे जीवींची गोष्टी । त्यांची लागली आवडी पोटीं ।केव्हा होईल त्यांची भेटी । जीवीं चटपटीं मोठी लागली ॥ १७ ॥

ऋष्यशृंग अंतकरणात त्या स्त्रियांबद्दल निर्मान झालेली आवड सांगत नाही परंतू त्याच्या चित्ताला सारखी त्या स्त्रियांच्या भेटीची चटक लागली होती. 

ऋष्यशृंगाची मनोव्यथा

आश्रमा आले अतिथी । तेपूजावे अति प्रीतीं ।मी वंचलों देहभयअीशक्ती । मज त्यांची भक्ति नघडेचि ॥ १८ ॥

आश्रमाला आलेल्या अतिथींची पुजा करण्या ऐवजी मी देवभयाने पळालो आणि त्यांच्या सेवेपासून वंचित राहिलो मला त्यांची भक्ती घडली नाही याच दुख ऋष्यशृंगाला वाटू लागले. 

नाहीं पुसलें आगमन । नाहीं दिधलें अभ्युत्थान ।न करींच पूजाविधन । विमुख सज्जन म्यां केले ॥ १९ ॥

तुम्ही कोठून आलात मी विचारले नाही त्यांना बसण्यासाठी स्थान दिले नाही. त्यांची पुजा केली नाही. मी सज्जनाला विमुक्त केले असे त्याला वाटू लागले. 

त्यांसी म्यां केले नाहीं नमन । नाहीं बोलिलों मृदु वचन ।देहलोभें ठकलो पूर्ण । विमुख सज्जन म्यां केले ॥ २० ॥

मी त्यांना नमस्कार केला नाही, विनम्र बोललो नाही, देहलोभाने मला ठकवले आणि माझ्याकडून सज्जन विमुख झाले असे त्याला वाटू लागले. 

त्यांची मागुती होईल जरी भेटी । तरी पुसूं त्यांसी गृह्य गोष्टी ।हृदयीं आवडी बैसली मोठी । केव्हा ते दृष्टी देखेन ॥ २१ ॥

आता जर परत त्यांची भेट झाली तर त्यांना गुह्यगोष्टी बोलेन, त्यांची सेवा करीन हे त्याच्या मनात बसले तो त्यांची वाट बघू लागला. 

ऐसी करितां तळमळ । तंव झाला प्रातःकाळ ।विभांडक अनुष्ठानशील । गेला तत्काळ स्नानासी ॥ २२ ॥

अशी तळतळ करत रात्र संपली प्रातःकाळी विभांडक ऋषी स्नान, अनुष्ठानाला निघून गेले. 

ऋष्यशृंग मोहजालात अडकतो

एकाकी पुत्र पर्णकुटीं । देखोनि प्रमदा आल्या उठाउठीं ।त्यांसी देखोनियां दृष्टी । करितां गोष्टी साशंक ॥ २३ ॥

एकटा ऋष्यशृंग पर्णकुटित बघीतला आणि अप्सरा आल्या आणि त्याला साशंक पणे काय बोलतात. 

धैर्य धरोनि उभा ठाके । मृग स्वभावें मागे चवके ।आवडीचेनि भावें खुडके । सवेंचि फडके गजबजिला ॥ २४ ॥॥

बोलण्याची आवड असल्याने तो धिर धरुन उभा राहू लागला लगेचच हरणाच्या नैसर्गिक स्वभावाने घाबरून मागेपुढे पाहू लागला परंतू सुंदर स्त्रियांना बोलण्याची आवड होती म्हणून गजबजला तरी धीर धरून बोलू लागला. 

तिहीं झणत्कारिला वीणा । नाद संचरला श्रवणा ।मोह उपजला अंतःकरणा । गमनागमना विसरला ॥ २५ ॥

अप्सरांनी विणावाजवायला सुरु केले तो आवाज काणाला आनंद देऊ लागला अंतकरणापर्यंत पोहचला आणि ऋष्यशृंग गमणागमण विसरला. 

घंटा पारधी जैसा । मधुरनादें मृगमानसा ।भुलवोनियां पाडी फांसा । तैसी दशा पावला ॥ २६ ॥

घंटा पारधी ज्याप्रमाणे मधुर आवाजाणे हरणाला फाशात टाकतो त्याचप्रमाणे ऋष्यशृंगाला विण्यावरील मधुर आवाजाणे भुलविले. 

टवकारली कर्णकुटी । उचलोनियां ग्रीवागांठी ।प्रमदा लक्षोनि दृष्टी । मान त्यांच्या कंठी घातली ॥ २७ ॥

मधुर आवाजावर भुललेला ऋष्यशृंग महिलांकडे पाहून आपली मान उचलून अप्सरांच्या गळ्यात घालून नाचू लागला. 

मृगाचा स्वभाव पूर्ण । व्हावें नादाअधीन ।जंव जंव ऐके गायन । अंव तंव आपण नाचत ॥२८ ॥

हरणाचा स्वभावच आहे तो मधूर गायनाच्या अधिन होतो. जसजस गायन ऐकू लागला तस तस तो त्याच्या तालावर नाचू लागला.

कोण तुमचे वस्तीचें स्थान । कोण्या अर्थें येथें आगमन ।तुमचे हृदयीं व्यथा कोण । गंडें अति तीक्ष्ण दिसताती ॥ २९ ॥

ऋष्यशृंग विचारु लागला हे ऋषीवर तुम्ही कोठे राहतात, तुम्ही इकडे कोणत्या कारणाने आलात. तुमच्या ह्रदयात काही त्रास आहे का? तुम्हाला अतिशय तीक्ष्ण गंड कसे दिसत आहेत. 

तुझे माथां शृंग तीक्ष्ण । तुज ऋष्यशृंग अभिधान ।आमचे हृदयीं गंडे तीक्ष्ण । गंडऋषी जाण आम्हांसी म्हणती ॥ ३० ॥

त्या अप्सरा म्हणू लागल्या ऋष्यशृंगा ज्याप्रमाणे तुझ्या डोक्यावर शिंगे आहेत म्हणून तुला शृंग म्हणतात तसेच आमच्या ह्रदयावर गंड आहेत म्हणून आम्हाला गंडऋषी म्हणतात असे त्या म्हणू लागल्या... 

आमचें रतिमण स्थान । चाख पां येथील जीवन ।म्हणोनि करविती रसपान । देती चुंबन अधरामृतें ॥ ३१ ॥

आमचा रतिआनंद घे येथील रसपान कर तुला आनंद होईल म्हणून ओठांचे चुंबन देऊ लागल्या... 

आमचें सर्वांग सिद्ध अनुष्ठान । आमच्या गंडांचे स्पर्शन ।करितां सुखसमाधान । म्हणोनि आलिंगन त्यासी देती ॥ ३२ ॥

आमच्या सर्व अंगासोबत सिध्द अनुष्ठान करण्यात खुप आनंद आहे, आमच्या गंडाला स्पर्श केल्याने खुप आनंद येतो म्हणून त्याला आलिंगन देऊ लागल्या. 

आमचे वनींचा फळपाडे । म्हणोनि देती साकरेचे लाडु ।ये वनीं नाहीं हा सुरवाडु । अति दुर्वाडु अनुष्ठान ॥ ३३ ॥

आमच्या वनातील रतीअनुष्ठान रुपी साखरेचे हे लाडू आहेत इथल्या वनामध्ये हे मिळत नाहीत हे अतिशय दुर्लभ आहेत म्हणून विषयात अडकवू लागल्या. 

ही आमुची समाधीस्तिती । म्हणोनि रतिमुद्रा लाविती ।रत्यासनीं बैसविती । झाला वशवतीं तयांसी ॥ ३४ ॥

आम्ही असे समाधीत बसतोत म्हणून रति मुद्रा लावून त्याला विषयात वश करून घेतले. 

विसरला आश्रमस्थिती । विसरला आपुली गती ।यावें परतोनि मागुती । हें निश्चिंतीं विसरला ॥ ३५ ॥

आपण ब्रम्हचर्य आश्रमात आहोत याचा विसर पडला आपण तप अनुष्ठान करून देव मिळवावे हे विसरला स्त्रियांनी आपल्याला वश केले आहे त्यांच्या आकर्षणातून बाहेर यावे हे विसरला. 

विसरला संध्यास्नान । विसरला अनुष्ठान ।विसरला जपध्यान । गमनागमन विसरला ॥ ३६ ॥

संध्यास्नान करावे, जप, तप, अनुष्ठान विसरला गमणागमण विसरला आणि स्त्रियांच्या छंदात नाचू लागला. 

विसरला स्थितिगई । विसरला प्राप्ति अप्राप्ती ।विसरला पितृभक्ती । स्त्रियानुवतीं वर्तत ॥ ३७ ॥

आपण कोण आहोत आपण काय केले पाहिजे आपण करत आहोत, आपल्याला काय प्राप्त करायचे आहे हे विसरला वडीलांची सेवा करायची हे विसरला आणि स्त्रिया सांगतील तसे वर्तन करू लागला. 

विसरला निजअभवस्था । विसरला निजस्वार्था ।

विसरला जो निजपिता । स्त्रियां तत्वतां वश्य केला ॥ ३८ ॥

स्वत:च्या मृग स्वभावाला विसरला,स्वार्थाला विसरला, पित्याला विसरला आणि फक्त स्त्रियांचाच झाला. 

विसरला वेदाध्ययन । विसरला शास्त्रपठण ।विसरला मी तूं कोण । स्त्रियांधीन तो झाला ॥ ३९ ॥

दररोज वेदाध्ययन करणारा आज वेदाच अध्ययन विसरला, शास्त्राच पाठांतर करण्याच विसरला. मी तु हे सर्व विसरून स्त्रियांच्या अधिन ऋष्यशृंग झाला. 

स्त्रीसंगाचे दुष्परिणाम

क्षणार्ध स्त्रियांची संगती । वनवासी होय वशवतीं ।जे नित्य स्त्रियांतें सेविती । त्यांची निर्गति कैसेनि होय ॥ ४० ॥

स्त्रि कशाला म्हणतात हे माहिती नसलेला वनवासी शृंग एका क्षणात वश केला तिथे अहोरात्र विषय सेवन करणारी जिव स्त्रिलोभातून कसे काय सुटतील? 

स्त्रिया वश्य केले वनवासी । स्त्रियां केले किंकर ग्रामवासी ।अपभ्रंशता स्त्रियांपासी । घात मुक्तीसी स्त्रीसंगे ॥ ४१ ॥

स्त्रियांनी वनवासी वश केलेली उदाहरणे आहेत, गावात, वस्तीत राहणारे तर स्त्रियांनी सेवक बनवले जे रात्रंदिवस स्वहित विसरुन स्त्रीची सेवा करतात. स्त्रिसंगतीमध्ये बुध्दीचा अपभृंश होऊन मुक्त अवस्थेचा घात होतो त्याला मुक्त होण्याची आठवण सुध्दा राहत नाही. 

स्त्रियांचे दर्शन स्पर्शन । स्त्रियांचे जें भाषण ।स्त्रियांची जी आठवण । अपभ्रंश संपूर्ण स्त्रीसंग ॥ ४२ ॥

स्त्रियांना पाहणे, त्यांचा स्पर्श, त्यांच्याशी बोलणे, त्यांची आठवण या सर्व आकर्षणातून बुध्दीचा अपभ्रंश होतो. 

नको स्त्रियांची संगती । ऋष्यशृंग झाला वशवतीं ।भुलोनियां स्त्रियांप्रती । आणिला निश्चितीं नगरासी ॥ ४४ ॥

स्त्रियांची संगती नसावी. स्त्रियांनी ऋष्यशृंगाला वश करून, भुलवून अयोध्येला आणले. 

ऋष्यशृंगाचा शांतनेशी विवाह

आणिले देखोनि ऋष्यशृंगासी । परम आल्हाद दशरथासी ।शृंगारिले नगरासी । गुढिया चौपासीं उभविल्या ॥ ४५ ॥

अप्सरांनी ऋषीशृंगाला आणले हि बातमी समजल्यावर राजाला आनंद झाला राजाने सर्व अयोध्येला सजवले घरोघर गुड्या उभ्या केल्या. 

मखरें तोरणे टिळे माळा । वस्त्रें भूषणें लोकां सकळां ।शृगारिलें गाई गोवळां । विभांडकें सोहळा देखावया ॥ ४६ ॥

मखरे,तोरणे, माळांनी अयोध्या सजवली टिळे लावले लोकांना नविनवस्त्र देऊन सजवले गाईंना शृंगार केला सर्व पाहून विभांडक ऋषीला आनंद व्हावा असे राजाने बनवले. 

मेळवोनि ऋषी सज्जन । वसिष्ठें निर्धारिलें लग्न ।ऋष्यशृंगासी कन्यादान । केले सुलग्न शांतनेसीं ॥ ४७ ॥

सर्व ऋषी सज्जनांच्या उपस्थितीत वसिष्ठांनी ऋष्यशृंगाचे शांतनेसी लग्न लावले. 

शांतनेचा पिता शांतन । राजाचा मित्र जीवप्राण ।तो आणिला पाचारून । लग्नालागूनी शांतनेच्या ॥ ४८ ॥

राजाचा जिवलग मित्र असणारा शांतनू ला बोलावून त्याच्या उपस्थितीत राजाने शांततेचा विवाह ऋष्यशृंगाशी लावला. 

राजा दशरथ भाग्यनिधी । वसिष्ठ कुलगुरू सद्‌बुद्धी ।विवाहहोम लग्नसिद्धी । कार्य त्रिशुद्धीं साधिलें ॥ ४९ ॥

राजा दशरथ भाग्यवान आहे कारण त्यांना वसिष्ठा सारखे महान कुलगुरु आहेत त्यांनी योग्यवेळी लग्नकार्य संपवून विवाहहोम संपन्न करून कार्य सिध्दीला नेले. 

विभांडक आला आश्रमासी । न देखे ऋष्यशृंग पुत्रासी ।

ठकवूनि दशरहें नेलें त्यासी । अति क्रोधेंसीं चालिला ॥ ५० ॥

इकडे अनुष्ठाणाला गेलेले विभांडक ऋषी आश्रमाला आले त्यांना ऋष्यशृंग आश्रमात दिसला नाही त्यांनी दिव्यदृष्ठीने पाहिले त्यांच्या लक्षात आले की माझ्या मुलाला दशरथाने ठकवून घेऊन गेला आहे याचा राग आला आणि रागाच्या आवेशात अयोध्येकडे विभांडक निघाले. 

आला अयोद्या प्रांतासी । देखे शृंगारिले नगरासी ।गाई गोवळे शृंगारेंसीं । मार्गीं त्यासी पैं भेटले ॥ ५१ ॥

अयोध्येच्या प्रांतात आल्यानंतर सर्व नगरी सजवलेली दिसली गाई राखणारे गोपाळांना नविन वस्त्र होती गाईंना झुली टाकल्या होत्या असे गोपाळ त्यांना भेटले. 

चाळवोनि आणिलें माझ्या बाळा । कायसा ये नगरीं सोहळा ।पुसो झाला गोवळां । भेटला सकळां मार्गस्थां ॥ ५२ ॥

विभांडक गायराखणाराला म्हणू लागले दशरथाने माझ्या मुलाला फसवून आणले आहे आणि नगरी का? सजवली आहे सर्वांना नविन वस्त्र दिसायला काय कारण आहे असे विचारले. 

ते ऐसा संगती वृतांत । ऋष्यशृंग मृगीसुत ।त्यासी कन्या दे दशरथ । सोहळा नगरांत लग्नाचा ॥ ५३ ॥

त्यांनी सांगितले हरणीचा मुलगा ऋष्यशृंगला राजा दशरथाने स्वत:ची मुलगी देऊन लग्न लावले आहे त्यामुळे सर्व नगरी सृंगारली आहे. 

मूळ धाडिलें विभांडकासी । तो त्यातें न भेटे वनवासी ।विधियुक्त लाविलें लग्नासी । उल्हासेंसीं दशरथें ॥ ५४ ॥

ऋष्यशृंगाचे वडील विभांडक यांना सुध्दा राजाने लग्नासाठी मुळ पाठवले आहे परंतू ते वनात गेले असल्याने भेटले नाहीत म्हणून विधियुक्त लग्न लावून दिले अशी वार्ता गोवळ्यांनी विभांडकाला सांगितली. 

विभांडकाला आनंद

ऐकतां पुत्र विवाहासी । विभांडक अति उल्हासी ।संतोष झाला मानसीं । प्रसन्नतेसीं तो आला ॥ ५५ ॥

आपल्या मुलाचा विवाह आणि त्याचा एवढा मोठा सोहळा होतोय याचा खुप आनंद झाला आणि आनंदात विभांडक अयोध्येला आला. 

राव वेगें सामोरा आला । धांवोनियां चरणां लागला ।अति प्रीतीने आलिंगिला । म्हणे भला भला दशरथा ॥ ५६ ॥

राजा दशरथाने समोर येऊन विभांडकाचा सन्मान केला चरण वंदन केले. विभांडकाला आनंद झाला तो दशरथाला मोठेपणा देऊ लागला. 

सर्वालंकारभूषणेंसी । वाहिली देखोनि वोहरासी ।विभांडक सुखसंतोषी । दशरथासी तुष्टला ॥ ५७ ॥

सर्वालंकाराने नवरदेव नवरी सजवलेले विभांडकाने पाहिले विभांडकाला खुप आनंद झाला तो राजावर खुप प्रसन्न झाला. 

राया जे जे तुझे मनोरथ । ते ते पुरवीन मी समस्त ।म्हणोनि आल्हादयुक्त । पुत्रप्रीतीं दशरथा प्रिय झाला ॥ ५८ ॥

थोडावेळाखाली दशरथावर रागावणार विभांडक मुलाचा लग्न सोहळा पाहून प्रसन्न झाला आणि आनंदाने म्हणू लागला राजा तुझी जी जी इच्छा असेल ती सर्व पुरवतो... 

विष्टरोक्त वरासन । षोडशोपचारें पूजन ।केलें चरणतीर्थप्राशन । ऋषि प्रसन्न रायासीं ॥ ५९ ॥

राजाने बसण्यासाठी ऋषींना योग्य असणे दिले. षोडशोपचाराने ऋषीचे पुजन केले.त्यामुळे ऋषी राजावर प्रसन्न झाले. 

लोमपादाच्या राज्यात अवर्षण

शांतन आणि मित्र रायासी । लोमपाद म्हणती तयासी ।

अवर्षण त्याच्या देशीं । तेणें दशरथासी प्रार्थिलें ॥ ६० ॥

शांतन आणि राजा दशरथाचा मित्र असलेले लोमपाद यांच्या राज्यात सुध्दा दुष्काळ पडला होता त्याने दशरथाला विनंती केली. 

विभांडक द्यावा मजपासीं । करवीन पर्जन्येष्टियागासी ।पीडा निवारेल भूतांसी । गोब्राह्मणांसी सुख करील ॥ ६१ ॥

आम्हाला विभांडक ऋषी प्रजन्येष्टियज्ञ करण्यासाठी द्यावेत. त्यांच्या यज्ञ करुन पाऊस पडेल आणि गाई, ब्राम्हण सर्व जगाला सुख देता येईल. 

दशरथासी उदार स्थिती । अवंचक मित्रकार्यार्थीं ।लोमपादाचे कार्याप्रती । प्रार्थिला निश्चितीं विभांडक ॥ ६२ ॥

दशरथ राजा उदार आहे मित्र कार्यासाठी तत्पर आहे त्याने लगेच लोमपादाच्या राज्यात प्रजन्यार्थ यज्ञ करण्यासाठी विभांडक ऋषीची विनंती केली. 

विभांडक प्रेमें आपण । म्हणे भावार्थेंसीं मी तुज अधीन ।राया तुझें निल्लंघीं वचन । करीन यज्ञ लोमपादाचा ॥ ६३ ॥

विभांडक ऋषी प्रेमाने राजाला म्हणू लागले राजा मी भावार्थाने तुझ्या अधिन आहे तुझ्याशब्दाबाहेर जाणार नाही. मी लोमपादाचा यज्ञ करून त्याच्या राज्यात सुखाचा सुकाळ करीन. 

विभांडकें करिता यज्ञ । राष्ट्रीं वर्षला पर्जन्य ।तृणधान्यें मेदिनी पूर्ण । गोब्राह्मणां आल्हाद ॥ ६४ ॥

लोमपादाच्या राज्यात विभांडक ऋषींनी यज्ञ केला मोठा पाऊस पडला सर्वांना आनंद झाला. तृणधान्याने पृथ्वी बहरून आली सर्वांना आनंदी आनंद झाला. 

पूजोनियां विभांडकासी । आणिला दशरथापासीं ।ऋषि येतांचि अयोध्येसी । रायें यागासी आरंभिले ॥ ६५ ॥

अगोदर लोमपादाचा यज्ञ संपन्न केला आणि परत विभांडक ऋषी अयोध्येत आल्यावर दशरथाने यज्ञाला सुरुवात केली. अगोदर मित्र कार्याला दुष्काळ निवारण करून जगाला सुखी करण्याच्या कार्याला प्राधान्य देणारा दशरथ होता म्हणून पोटाला श्रीराम येणार आहेत. 

ऋष्यशृंगाकडून पुत्रकामेष्टी यज्ञ

वसिष्ठ श्रेष्ठ कुळगुरू । दुजा विभांडक ऋषीवरू ।ऋष्यशृंग हर्षनिर्भरू । यज्ञांगीकारू तेणें केला ॥ ६६ ॥

श्रेष्ठ कुळगुरू वसिष्ठ, दुसरे विभांडक ऋषी यांच्यासमोर ऋष्यश्रंगाने आनंदात यज्ञाचा अंगिकार केला. 

ऋष्यशृंग म्हणे रायासी । मी पुत्र देईन तुम्हांसी ।म्हणोन अति उल्हासेंसीं । स्वयें यागासी प्रवर्तला ॥ ६७ ॥

ऋष्यशृंग उल्हासाने राजाला म्हणाला म्हणाला मी तुम्हाला यज्ञातून मुलगा देतो म्हणून यज्ञ करण्यास प्रवृत्त झाला. 

निमूनियां निजपिता । वसिष्ठ वंदोनि तत्वता ।दसह्रथाच्या निजस्वार्था । यज्ञ करी ऋष्यशृंग ॥ ६८ ॥

ऋष्यशृंगाने पिता विभांडकाला वंदन केले, वसिष्ठाला वंदन केले आणि दशरथाचा स्वार्थ साध्य होण्यासाठी यज्ञाला सुरुवात केली. 

कुंड मंडप वेदिका सुलक्षण । इध्मा बर्हि त्रिसंधान ।करोनियां परिस्तरण । अग्निस्थापन तेणें केले ॥ ६९ ॥

यज्ञासाठी लागणारे, कुप, मंडप, वस्त्र, इंधन सर्व सामग्री तयार करून अग्नीस्थापन केला

प्रणीतापात्रें परिपूर्ण । आज्यस्थाली बर्हिआस्तरण ।

स्रुक्‌स्रुवा परिमार्जन । केलें प्रोक्षण यज्ञोपचारां ॥ ७० ॥


यज्ञपुरुष प्रकट होतो

ऋष्यशृंगाचें अनुष्ठान । अतिशयें श्रेष्ठ संपूर्ण ।होम करितां प्रधान । यज्ञपुरुष आपण प्रकट झाला ॥ ७१ ॥

ऋष्यशृंगाचे अतिशय श्रेष्ठ अनुष्ठान आहे त्यांनी मुख्यस्थानी बसुन होम केल्यामुळे यज्ञपुरुष प्रगट झाला. 

गगन झालें देदीप्यमान । परी त्या तेजाचें लक्षण ।नव्हे अति शीत ना उष्ण । स्वानंदपरिपूर्ण निजतेजें ॥ ७२ ॥

यज्ञ पुरुषाच्या तेजाने सर्व आकाशात प्रकाशच प्रकाश दिसू लागला परंतू ते तेज थंड किंवा उष्ण नसून स्वानंद देणारे होते. 

वसिष्ठासी विस्मय पूर्ण । विस्मय पावे विभांडक आपण ।विस्मय पावले ऋषीगण । अयोध्येचे जन तटस्थ ॥ ७३ ॥

तेजस्वी यज्ञ पुरुषाला पाहून वसिष्ठ ऋषींना, विभांडक ऋषींना सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले सर्व अयोध्येचे लोक तटस्थ झाले. 

खुंटली श्वासोच्छ्वासाची गरी । लवों विसरलीं नेत्रपाईं ।ऋष्यशृंगतपाची खाती । यज्ञमूर्ति प्रकटली ॥ ७४ ॥

सर्वांच्या श्वासोच्छवासाची गती मंद झाली, ते तेज पाहून कोणीही पापणीही पाडत नव्हते. ऋष्यशृंगाने केलेल्या तपाच्या सामर्थ्याने यज्ञमुर्ती प्रकट झाली असे सांगतात. 

मागें यज्ञ केले बहुतीं । तेणें पावले फळप्राप्ती ।परी यज्ञीं प्रकटे यज्ञमूर्ती । हे केली ख्याती ऋष्यशृंगें ॥ ७५ ॥

या अगोदर अनेकांनी यज्ञ केले यज्ञातून फळही मिळाले परंतू साक्षात यज्ञमुर्ती प्रकट होण्याची ख्याती हि ऋष्यशृंगानी केली आहे.. 

पायसदान

उदरा येईल रघुपती । यालागीं यज्ञी यज्ञमूर्ती ।पायसपात्र घेवोनि हातीं । ऋष्यशृंगाप्रति देता झाला ॥ ७६ ॥

दशरथाच्या पोटाला साक्षात श्रीराम येणार होते म्हणून यज्ञाच्या अग्निकुंडातून यज्ञमुर्ती प्रकट झाली व त्या यज्ञपुरुषाने ऋष्यशृंगाला प्रसादपात्र(खिरीचे)दिले.

हा यज्ञपुरोडाश संपूर्ण । द्यावा राजपत्निमयांसी विभागून ।येणें पुरोडाशें जाण । पुत्रसंतान होईल ॥ ७७ ॥

आणि त्या पुरुषाने सांगितले की या प्रसादाचे समान भाग करून राजाच्या पत्नीमध्ये विभागून द्यावेत यामुळे त्यांना पुत्रसंतान होईल असे सांगितले. 

येणें प्रसादें पुत्रप्राप्ती । त्याचेनि पावन त्रिजगती ।ऐसी निर्माण पुत्रसंतती । होईल निश्चितीं रायासी ॥ ७८ ॥

या प्रसादापासून उत्पन्न झाले पुत्र हे त्रिभुवणाला पावन करतील अशी पवित्र आणि पराक्रमी पुत्र राजाला होतील. 

विलंब न करावा अर्धक्षण । तत्काळ करावा प्राशन ।विलंबीं उपजेल विघ्न । हे सांगोनि आपण अदृश्य झाला ॥ ७९ ॥

प्रसाद प्राप्त झाल्याबरोबर तात्काळ ग्रहन करावा उशीर लावू नये जर उशीर केला तर विघ्न येतील असे सांगून यज्ञ पुरुष अदृश्य झाला. 

अदृष्य जालिया यज्ञमूर्ती । तें पायसपात्र घेवोनि हातीं ।ऋष्यशृंग दे रायाप्रती । पुत्रार्थी प्रसाद ॥ ८० ॥

यज्ञपुरुष अदृश्य झाल्यानंतर ऋष्यशृंगाने ते खिरप्रसादाचे ताट पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून दशरथाच्या हातात दिले. 

गुह्य सांगे वसिष्ठासी । विलंबू करूं नये यासी ।समभाग दे राणियांसी । विलंबासी अति विघ्न ॥ ८१ ॥

ऋष्यशृंग श्रीवसिष्ठांना सांगू लागले प्रसाद भक्षणाला अजिबात उशीर करू नये समान भाग करून तुम्ही राणींना द्या उशिर झाला तर मोठ विघ्न येईल. 

फं मूलं तथा तीर्थं प्रसादो राघवस्य च ।

शीघ्रमेवानुसेवेत विलंबः कार्यनाशकः ॥ १ ॥

वसिष्ठांकडून यज्ञप्रसादाचें विभाजन

यालागीं तुझे नांव वसिष्ठ । कुळगुरु अति श्रेष्ठ ।कार्य साधावें उद्‌भट विभागीं इष्टविभागें ॥ ८२ ॥

तुम्ही कार्य साधण्यात अतिशय वरिष्ठ आहात म्हणून तुमच नाव वसिष्ठ आहे. तुम्ही प्रसादाची ज्याचा जसा अधिकार आहे त्याला तसा याप्रमाणे विभागणी करून वितरण करावे आणि कार्य साधावें. 

जाणोनि भविष्याची स्थिती । वसिष्ठ पायस घेवोनि हातीं ।भाग केले यथानिगुती । विभागस्थिती अवधारा ॥ ८३ ॥

भविष्यात काय होणार आहे याची जाणीव वसिष्ठांना होती त्यांनी पायसपात्र हातात घेऊन यथायोग्य प्रसाद विभागणी केली ती कशी केली ते ऐका अस ग्रंथकर्ते संत एकनाथ महाराज सांगतात. 

कौसल्या ते धर्मपत्नी । सुमित्रा वरिली साध्वी म्हणोनि ।कैकेयी वरिली सुंदरपणीं । रूपयौवनीं गर्विष्ठ ॥ ८५ ॥

कौसल्या हि धर्मपत्नी आहे, सुमित्रा हि साध्वी आहे म्हणजेच सुशिल, निरागस, निरपेक्ष पतिवर प्रेम करणारी आहे. तर कैकयी सोबत राज्याने तिच्या सौदर्याकडे पाहून लग्न केले आहे. त्या सौदर्यांचा आणि इतरांपेक्षा जास्त तारुण्यात असल्याचा गर्व कैकयीकडे होता यासर्व गोष्टींचा विचार वसिष्ठजी करतात... कारण कधीही कोणतीही गोष्ट एखाद्याला देत असताना त्याच्या पात्रतेचा विचार केलाच पाहिजे. 

कैकेयीचा असंतोष, वसिष्ठांचे उत्तर

कैकेयी म्हणे वसिष्ठाप्रती । मी रायाची पढियंतीं ।ज्येष्ठ भाग देई मजप्रती । येरें निरुती वारिली ॥ ८६ ॥

गर्विष्ठ कैकयीची हिंमत तर बघा ती प्रत्यक्ष सद्गुरु वसिष्ठांना म्हणू लागली जेष्ठ भाग मला द्यावा कारण मी राजाची आवडती आहे. परंतू महानसाधू वसिष्ठजींना तिला दुर केले. तीच्या अयोग्य मागणीला क्षणात फेटाळून लावले. 

ज्येष्ठ भाग ज्येष्ठेप्रती । तो केवी ये कनिष्ठेप्रती ।जेवीं गजाची भूषणस्थिती । अजेप्रति अतिभार ॥ ८७ ॥

मोठ्याचा वाटा मोठ्यालाच मिळाला पाहिजे तो लहानाला कसा मिळेल. ज्याप्रमाणे हत्तीच्या शरीरावरील अलंकाराचे सुध्दा शेळीला ओझे होते तर ती हत्तीवाहतो तो भार वाहू शकेल का? 

जरी अमोलिक हिरे होती । ते शालीग्रामास पूज्य न होती ।तू जालियाही पढियंती । ज्येष्ठ भागाप्रती अयोग्य ॥८८ ॥

ज्याप्रमाणे किती जरी मौल्यवान हिरे माणिक असले तरी ते शालिग्राम रत्नासारखे पुज्यनिय नसतात. त्याप्रमाणे तु राजाची जरी आवडती असलीस तरीही जेष्ठ भाग तुला प्राप्त व्हावा या योग्यतेची तु नाहीस. 

ज्येष्ठ भाग दिधला कौसल्येसी । दुजा दिधला सुमित्रेसी ।तिजा दिधला कैकेयीसी । तिच्या मानसीं अति क्रोध ॥ ८९ ॥

ऋषींनी जेष्ठ भाग कौसल्या दिला, दुसरा भाग सुमित्रेला दिला आणि तिसरा भाग कैकयीला दिला. पहिल्या भागाची अपेक्षा ठेवणारीली तिसरा भाग मिळाला त्यामुळे अभिमानी कैकयी श्रीगुरुंबद्दलच राग धरु लागली. 

कांही न चाले वसिष्ठावरी । क्रोधे द्वेष गुरूचा करी ।

विभाग आलियाही करीं सुख जिव्हारी असेना ॥ ९० ॥

वसिष्ठांच्या पुढ कैकयीच काही चालत नव्हते रागाने गुरुचा द्वेष करु लागली. तिला प्रसाद मिळाल्यानंतर सुध्दा द्वेषामुळे सुख मिळाले नाही. 

मी गेले होतें स्वर्गाप्रती । म्यां भोगिल्या स्वर्गसंपत्ती ।ज्येष्ठ पिंड नये माझ्या हातीं । तो द्वेष चित्तीं गुरूचा ॥ ९१ ॥

मी राजासोबत स्वर्गाला गेले होते मी स्वर्गाचे भोग भोगले तरीही मला पहिला भाग मिळत नाही म्हणून सद्गुरुंचा द्वेष करु लागली. खर पाहता स्वर्गाच सुख भोगणे, लाडकी असणे हि काही जेष्ठ असल्याची लक्षण परंतू अहंकाराच भुत बुध्दीला भ्रमिष्ठ करत आणि विनाकारण मोठ्यांचा द्वेष करुन माणूस विनाशाला निमंत्रण देत असत. 

करावया पिंडप्राशन । दोघी केलें शुद्धाचमन ।कैकेयी पाहे रायांचे वदन । तो विलंब विघ्न वोढवलें ॥ ९२ ॥

पिंडप्राशन करण्यासाठी माता कौसल्या, सुमित्रा यांनी शुध्दाचमण केले. तोपर्यंत कैकयी राजाकडे रागाणे बघत होती. गुरुचा द्वेष आणि पतीकडे रागाणे पाहिल्याने तात्काळ काय विघ्न आले ऐका. 

घारीचा पूर्वजन्मवृत्तांत

जे न मानिती गुरुवचन । त्यांसी तत्काळ होय विघ्न ।तेचि अर्थांचे निरूपण । कथानुसंधान अवधारा ॥ ९३ ॥

जे गुरुचे बोलणे ऐकत नाहीत त्यांच्यावर लागलीच विघ्न येतात. ते विघ्न कसे येतात याबद्दलची कथा ऐका. 

सुवर्चसा अति नाचणी । नाचों आली मद्य सेवूनी ।ताल चुकतां तत्क्षणीं । तिसी ब्रह्मयानें शापिले ॥ ९४ ॥

सुवर्चसा नावाची अप्सरा मद्य प्राशन करुन नृत्य करण्यासाठी आली आणि नाचताना तिचा तोल गेला ब्रम्हदेवाने तिला तात्काळ शाप दिला. 

सत्यलोकी मद्यपान । अत्यंत पैं निंद्य जाण ।ताल चुकली आपण । हे लक्षण मद्याचें ॥ ९५ ॥

सत्यलोकामध्ये मद्यपान करणे अत्यंत निंदनीय आहे. तिथे नृत्य करताना मद्यपिल्यामुळे तिचा ताल चुकला. 

निर्लज्जे उन्मत्ते सुंदरी । नष्ट पापिणी होय घारी ।ताल चुकोनि जासी चांचरी । तसें तूं करी परिभ्रमण ॥ ९६ ॥

ब्रम्हदेव म्हणाले निर्लज्ज, उन्मत्त, नष्ट,पापिने तु घार होऊन आकाशात परिभ्रमण करत राहशील. 

शाप ऐकोनि दारुण । उःशाप मागे अति दीन ।प्रसन्न केला चतुरानन । वरदवचन तो वदला ॥ ९७ ॥

भयंकर शाप ऐकला आणि लहान तोंड करून मृदू शब्दात तिने ब्रम्हदेवाला माफी मागितली ब्रम्हदेवाला आनंद झाला आणि त्यांनी तिला वरदान दिले. 

दशरथायाग पुत्रजन्य । तेथें यज्ञपुरोडाश परमान्न ।त्रिधा भागें विभागिती अन्न । एक भाग प्राशन करावा ॥ ९८ ॥

राजा दशरथ हा पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ करेल त्या यज्ञात यज्ञपुरुष प्रकट होऊन प्रसाद देईल तो प्रसाद तिन भागात विभागला जाईल व त्यातील एक भाग तु प्राशन करावा. 

ज्येष्ठभागीं तुज नाहीं गती । मध्यभागीं न पावे शक्ती ।कनिष्ठा कनिष्ठभागप्रती । तेणें न्र्मुक्ती निजशापा ॥ ९९ ॥

त्यातील जो मोठा भाग आहे तो मिळवण्यात तुला गती नाही, मध्य जो सुमित्रेचा भाग आहे तिथे सुध्दा तुझी शक्ती चालू शकत नाही मग तु तिसरा कनिष्ठाचा भाग घ्यावा आणि त्यातून तुझी मुक्ती होईल असा वर ब्रम्हदेवाने दिला. 

हें होईल अयोध्यानगरीं । यलागीं ते जाणावी खरी ।मोक्षाची प्रथम पुरी । वेदशास्त्रां निजगजर ॥ १०० ॥

तुझ्या उध्दाराची हि घटना अयोध्येत होईल कारण अयोध्या हि मोक्षाची प्रथमपुरी आहे असा वेदशास्त्र गजर करतात. 

काशी मुक्तिक्षेत्र होय पाहीं । मेल्या मुक्ति तियेच्या ठायीं ।सकळ वैकुंठा गेली नाहीं । अयोध्येची नवाई अपूर्व ॥ १ ॥

काशी हे मुक्तीक्षेत्र आहे तिथे मुक्ती मिळते परंतू मृत्यूनंतर मिळते सर्व काशी कधिच वैकुंठाला गेली नाही. परंतू अयोध्येच आश्चर्य वेगळच आहे अस सांगतात. 

काशीहूनि ते वहिली । अयोध्येची उदारता भली ।त्रिवार नगरी वैकुंठा नेली । नमरता केली सहकुटुंब मुक्त ॥ २ ॥

काशीपेक्षा उध्दार करण्यात अयोध्या जास्त उदार आहे. अयोध्या तिनदा वैकुंठाला गेली आणि लोकांना मृत्युशिवाय सहकुटुंब सहपरिवार मोक्ष दिला अशी अयोध्या आहे. 

प्रथम रुक्मांगदे नेली । दुजी शिबीने ख्याती केली ।तिजी श्रीरामें वहिली । वैकुंठा नेली निजगजरें ॥ ३ ॥

पहिल्यांदा अयोध्या रुक्मांगद राजाने वैकुंठाला नेली. दुसरी वेळ शिबीराजाने नेली. तिसर् यांदा भगवान श्रीरामांनी नेली अशी अयोध्या मोक्ष देण्यात उदार आहे तुझा तिथे उध्दार होईल असे ब्रम्हदेव अप्सरा म्हणाले. 

आणि चौथेनि ही मागुती । अयोध्या जाईल वैकुंठाप्रती ।ऐसी वसिष्ठादिकांची ख्याती । अयोध्येप्रति असे पैं ॥ ४ ॥

आणि चौथ्यावेळी सुध्दा अयोध्या वैकुंठाला जाईल अशी ख्याती करण्यासाठी सज्ज, समर्थ असे कुलगुरू वसिष्ठजी आहेत. 

यालागी मुक्तिक्षेत्राच्या शिरीं । अयोध्या जाण प्रथम पुरी ।जड जीवांतें उद्धरी । शाप निवारी स्नानमात्रें ॥ ५ ॥

मुक्ती मिळणारे जेवढे ठिकाण आहेत त्यामध्ये अयोध्येचा प्रथम क्रमांक आहे. अयोध्येत जडजिवांचा, शाप प्राप्त झालेल्या पतितांचा पवित्र शरयुचे स्नान जरी केले तरी उध्दार होतो. 

ते अयोध्येसी भागप्राशन । केलिया तुज शापमोचन ।ऐसे बोलिला चतुरानन । अप्सरा आपण घारी जाली ॥ ६ ॥

त्या अयोध्येत तु जर यज्ञभाग प्राशन करशील तर तु शापापासून मुक्त होशील अस ब्रम्हदेव म्हणाले त्यावेळी लगेच ती अप्सरा मोठी घार बनली. 

कैकेयीच्या प्रसादावर घारीची झडप

ते ऐशीं सहस्र वर्षेंवरी । भोंवे अयोध्येच्या महाद्वारी ।यज्ञभाग देखतां करीं । झडप मारी तत्काळ ॥ ७ ॥

ती घार ऐंशीवर्षापासून अयोध्येच्या परिसराभोवती फिरत होती. यज्ञभाग हातात घेतलेले पाहिले आणि तिने तात्काळ त्यावर झडप मारली. 

कौसल्या सत्य पतिव्रता । तीवरी न घालवेचि सर्वथा ।सुमित्रा शुद्ध सात्विकता । तीहीवरी तत्वता न घालवेची ॥ ८ ॥

तिची झडप सत्य पतिव्रता असलेल्या कौसल्येच्या भागावर चालत नाही. तसेच शुध्द सात्विकभक्त असलेल्या सुमित्रेच्या भागावर सुध्दा चालत नाही. 

कैकेयी अति क्रोधायमान । निजभागीं नाहीं मन ।रागें पाहे रायाचें वदन । तंव घारीनें हिरोन भाग नेला ॥ ९ ॥

कैकयी अतिशय रागात होती तिला मिळालेला भागात समाधानी नव्हती. ती राजाकडे रागाने पाहत होती. तोपर्यंत त्याच्या प्रसादभागावर घारीने झडप घातली. 

तोंडावरी हाणी पाखीं । हात ओरबाडिला नखीं ।भाग घालोनियां मुखीं । गेली एकाएकीं गगनासी ॥ ११० ॥

भाग झडपला आणि घारीने कैकयीच्या मुखावर नख्या ओरबाडल्या आणि मुखात भाग घेऊन घार आकाशात उडाली. 

लोक करिती हाहाकार । एक सवेग विंधिती तीर ।अवघे पाहती ऊर्ध्वशिर । थोर चमत्कार सर्वांसी ॥ ११ ॥

घारीने भाग नेल्यानंतर लोकांमध्ये हाहाकार उडाला. काही लोक बाण मारून घारी पासून भाग सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. सगळेजन वर मुंडक करून पाहू लागले. सर्वांनाच आश्चर्य वाटू लागले. 

लागतां पांखाची झडे । कैकेयी उलथोनि क्षितीं पडे ।भाग गेला मग रडे । रायाकडे पाहोनी ॥ १२ ॥

घारीच्या पंखाची झडप लागल्यानंतर कैकयी उलथून जमिनीवर पडली घारीने भाग नेला म्हणून राजाकडे पाहून मोठ्याने रडू लागली. 

रायास म्हणे पाहतां काय । येरू म्हणे मी करूं काय ।तुझा गर्व तुज आडवा होय । येथें उपाय न चालती ॥ १३ ॥

कैकयी राजाला म्हणू लागली माझी फजिती झाली, माझा भाग नेला आणि तुम्ही शांत राहून पाहत आहेत. त्यावेळी राजाने सांगितले कैकयी मी काय करु तुला तुझा गर्व आडवा आला आणि तुझा भाग गेला. इथ वसिष्ठांसारख्या श्रेष्ठ साधुंपुढे गर्व सोडून विनंम्र राहण्याशिवाय कोणताच उपाय चालत नाही. 

घारी भाग करितां प्राशन । तुटले तिचें देहबंधन ।खुंटलें गमनागमन । सुखसंपन्न ती जाली ॥ १४ ॥

घारीने भाग प्राशन केल्यानंतर लगेचच तिच्या देहाला आलेल घारीच्या शरिराच बंधन सुटले तिचे गमनागमन खुंटले आणि ती सुखी झाली. 

तोचि भाग उपेक्षितां । कैकेयीसी परमावस्था ।बाप गर्वाची अति गर्वता । निजस्वार्था अति घात ॥ १५ ॥

जो भाग मिळाला होता कैकयीने त्याची मी सुंदर आहे मला जेष्ठ भागच मिळायला हवा या अहंकारजनित भावनेने हेळणा केली आणि मिळाला होता तो पण भाग घारीने नेला हा गर्वाचा परिणाम आहे ज्यामुळे माणूस निजस्वार्थाला मुकतो. 

जेवीं उपेक्षितां आत्मज्ञान । अंगी आदळे अज्ञान ।विषयी पावई अधःपतन । ते दशा परिपूर्ण कैकेयीसी ॥ १६ ॥

आत्मज्ञान मिळत असताना ते न घेता त्याची उपेक्षा केली तर अज्ञानाला माणूस प्राप्त होत असतो. अज्ञानी व्यक्ती विषयाचरणाला बळी पडतो आणि त्याच अधःपतन होत. त्याप्रमाणे सद्गुरुच न ऐकणे आणि त्यांची उपेक्षा करण यामुळे कैकयी दुखाला प्राप्त झाली. 

कैकेयीचा आक्रोश

काय मायबाप बहुत दिवस जितां । पुत्र उपेक्षी हेळसितां ।रडे मेल्यामागें तर्पण करितां । पिंड देतां सद्गति ॥ १७ ॥

मायबाप बरेच दिवस जिवंत असताना मुलगा त्यांची हेळणा करतो आणि ते मेल्यानंतर रडतो, तर्पन करतो पिंड देऊन सद्गती देण्याचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे कैकयी पश्चाताप करू लागली. 

तैसी दशा कैकेयीसी । उपेक्षिले निजभागासी ।गेलीया मागें कुसमुसी । उसकाबुकसीं स्फुंदन ॥ १८ ॥

तसी गती कैकयीची झाली स्वत:च्या अधिकाराची उपेक्षा केली आणि दुसर्याच्या भागाचा अभिलाष केला परिणामी दोन्ही गेले आणि मग मोठ्याने उसकाबुकसी स्फुंदन करून रडू लागली. 

जे मी रायाची पढियंती । ते मी जालें अभाग्य क्षितीं ।मज नव्हेचि पुत्रसंतती । निंद्य सर्वार्थीं मी जालें ॥ १९ ॥

जी मी राजाची प्रिय लाडकी होते ती मी आज माझ्या अभाग्यामुळे नावडती झाले कारण आता मला पुत्रसंतती होणार नाही मी निंदेस पात्र झाले अशी कैकयी म्हणू लागली. 

माझें रायासी अति कोड । तें कोणासी नव्हेची गोड ।जळो माझें काळें तोंड । लोक वितंड निंदिता मज ॥ २० ॥

माझी राजाला खुप आवड आहे परंतू ते कोणालाही आवडत नाही. मी गर्व केला गर्वाने माझा तोंड काळे केले. आता प्रत्येकजण माझी निंदा करत आहेत याच दु:ख तिला वाटू लागले. 

ज्येष्ठ भाग मागतां आवडी । तंव कनिष्ठासीच आली धाडी ।मज हे थडी ना ते थडी । निंद्य रोकडी मी जालें ॥ २१ ॥

जेष्ठ भाग मिळवण्याच्या नादात माझा कनिष्ठ भागही मी गमावला मला कोणतच साध्य झाल नाही आणि आता मी निंदेला पात्र झाले म्हणून रडू लागले. 

स्वार्था नाडलें मी संपूर्ण । जिवों न लाहें लोकांभेणें ।मज येतें कां वो मरण । रडे दारुण संतापें ॥ २२ ॥

स्वार्थाने माझी फजिती केली. माझ तोंड काळ झाल आता लोक माझी इतकी निंदा करतील की मला जगण कठीन होईल. हे देवा मला तरी दे रे... म्हणून संतापाने रडू लागली. 

स्वर्गीं जे मी सुरवरा वंद्य । ते मी मृत्युलोकी निंद्य ।विभागीं भाग्य माझे मंद । पाषाणवत मी झाले ॥ २३ ॥

मी कैकयी राजाची लाडकी होते मला स्वर्गातले देव सुध्दा देत होते परंतू आतामात्र मृत्यूलोकातील सामान्यलोक सुध्दा तोंडा निंदा करत आहेत. भाग विभागणीमध्ये माझ नशिब कमी पडले. आता अयोध्येत दगडापेक्षा माझी किंमत कमी झाली असे रुदन करू लागली. 

जे मी रायाची आवडई । तेणेंचि जगा नावडती ।पाषाणवर माझी स्थिती । देवपिररार्थी अति निंद्य ॥ २४ ॥

पात्रता नसताना सन्मान मिळालेली व्यक्ती अपमान सहन करू शकत नाही कैकयी म्हणू लागला मी राजाची अतिशय आवडती राणी आह परंतू राणी म्हणून मी जगाला आवडत नाही दगडासारखी माझी गती झाली. मी देव, पितर यांच्या दृष्टीने निंदनीय झाले. 

अंधाहातींचे रत्न पडे । तें त्याचें त्यास न सांपडे ।कैकेयीही तेणेंचि पाडें । रडे पडे अति दुःखी ॥ २५ ॥

आंधळ्या व्यक्तीच्या हातात एखादे रत्न दिले आणि ते जर खाली पडले तर त्याला परत सापडत नाही तस माझ्या नशिबाने मिळालेला पिंड मी अहंकार, द्वेष आणि गर्वामुळे गमावला याच दु:ख ती करू लागली. 

केश सुटले मोकळे । गडगडां पृथ्वीवरी लोळे ।अश्रुधारा स्रवती डोळे । अति तळमळे तळमळीं ॥ २६ ॥

केश मोकळे सुटले, जमिनीवर गडबडा लोळू लागली, डोळ्यातून अश्रू येऊ लागले भाग गेला फजिती झाली त्यामुळे तीच्या जिवाची तळमळ होऊ लागली. 

देखोनि कैकेयीचें दुःख । कौसल्या कळवळली देख ।हरूनि तिचें असुख । प्रवतें देख उपकारार्थीं ॥ २७ ॥

कैकयीच दु:ख बघीतल आणि कौसल्या मातेला तिच्याबद्दल कळवळा निर्मान झाला तिच दुख दुर करून तिला सुख देण्यासाठी कौसल्या उठली कारण अंतकरण दुसर् यावर उपकार करण्याच्या भावनेन भरलेल होत. 

श्रीभावार्थरामायण । एका जनार्दना शरण ।जालें येथवर निरूपण । पिंडप्राशन अवधारा ॥ २८ ॥

एका जनार्दन स्वामीला शरण जाऊन संत एकनाथ महाराज सांगतात भावार्थ रामायणाचे इथपर्यंत निरुपण झाले आता पुढच्या अध्यात पिंड प्राशन करण्याची गोड कथा होणार आहे भाविकांनी श्रवण करावी असे सांगतात. 

स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायां

पुरोडाशविभागो नाम द्वितीयोऽध्यायः ॥ २ ॥

॥ ओव्या १२८ ॥ श्लोक ० ॥ एवं १२८ ॥

बालकांड अध्याय २ 

यजमान: श्री शिवाजी लक्ष्मण मुंडे साहेब 

सेवानिवृत्त स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे सिकिंद्राबाद

या कार्यासाठी यांनी सहकार्य केले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आभार 

गद्य अनुवाद:श्री वैजनाथ सुर्यप्रकाश गुट्टे

संपर्क:vsgutte१०@gmail.com

सहकार्य हेतू फोन पे:9096232893

हा अध्याय ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.






Comments

Popular posts from this blog

भावार्थ रामायण बालकांड अध्याय १

भावार्थ रामायण बालकांड अध्याय ३

बालकांड अध्याय ६