भावार्थ रामायण बालकांड अध्याय १
भावार्थ रामायण बालकांड अध्याय १
॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥
बालकाण्ड॥ अध्याय पहिला ॥॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥श्रीगणेश वंदनॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥जय श्रीराम जय हनुमानग्रंथ कर्ते संत एकनाथ महाराज ग्रंथ सुरुवातीला श्रीगणेशाला वंदन करत आहेत ओमकार रूप असलेले गणेश ज्याच्या कोणीही आदी नाही, ज्याने वेद व वेदातांचे प्रतिपादन केले आहे, जो वंदनाच्या दृष्ठिने पाहिले तर परम वंदनीय आहे ज्याच कोणीही प्रतिपादन करू शकत नाही असा स्वसंवेद्य असलेल्या गणेशाला माझे वंदन ....तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥हे गणराया तुमचे रुप विशिष्ठ असे आहे म्हणून त्याची कल्पना करता येत नाही कारण कल्पित गोष्टि या नाशवान असतात व तुम्ही अविनाशी असे निर्गुण( अरुप ) आहात. त्याअरुपाला भक्तिभावाने साकार समजून अवयवांची कल्पना करुन भजन केले तर अंत असलेल्या कल्पित भावनेचा लोप होऊन अनंत असलेल्या तुमच्या स्वरुपाची प्राप्ती भक्ताला होते..यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥त्यामुळे तुम्ही कसे आहात या तर्कात न पडता जसे आहात तसे म्हणजे साकार किंवा निराकार मला वंदनीय आहात या अव्दैत भक्तीभावाने वंदन केले तर अशा भक्ताला तुम्ही स्वत:सारख बनवतात म्हणजेच त्याच अंगत्व हि परिछिन्न भावना लोप होऊन सर्वव्याप्त अनंताची अनुभूती त्याला होते.ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥ज्याला मनोभावे वंदन करताच जो भक्ताला सर्वव्याप्त अनंताची अनुभूती देतो ...त्या गणेशाचे साकार रुप संत एकनाथ महाराज सांगतात ,ज्याच्या एका हातात ज्ञान तेजाने तेजस्वी अशी फरशी आहे तर दुसऱ्या हातात त्या ज्ञानाला नित्य स्मरणाची धार आहे कारण नित्य स्मरणाशिवाय ज्ञानतेज सदोदीत राहत नाही म्हणून बुद्धीला तेज पुंज रहायच असेल तर नित्यस्मरण महत्वाच आहे आणि जर नित्य स्मरणाच तेज असेल तर आनंदाच्या आमोदाने भरलेला सुरस असा मोदक भगवान गणेशाच्या एका हातात आहे जो गणपती बाप्पा नित्यसद्भावाने नमन करणाऱ्या निजभक्ताच्या मुखात देतात.. असे संत एकनाथ महाराज सांगतात....ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन ।माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥संत एकनाथ महाराजांनी केलेली स्तुती ऐकून गणपती बाप्पाला एवढा आनंद झाला की गणपती बाप्पा स्वत:च वक्त्याच्या मुखात बसले आणि त्यांनी स्वत:च्या शब्दातून ग्रंथ सांगायला सुरुवात केली.असे ग्रंथ कर्ते संत एकनाथ महाराज सांगतात...ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न ।उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥विघ्नहर्ता असणारे गणपती बाप्पा इतके प्रसन्न झाले की त्यांनी रामायणावर येणाऱ्या सर्व विघ्नांच हरण केल आणि अतिशय उल्हासाने रामायण सुरुकरणारांना सांगितले की बाबांनो लवकरात लवकर भावार्थ रामायण कथेला सुरु करा... आणि रोज नित्यनेमाने चालवा... कथेला कोणत्याही प्रकारच विघ्न येणार नाही कारण मी स्वत: हातात फरशी, मोदक घेऊन विघ्नाला दुर करण्यासाठीच बसलेलो आहे कथेला सहकार्य करेल त्याला मोदक देतो आणी त्रास देतो त्याला फरशी कुऱ्हाड आहे असे गणपती बाप्पा बोलतात....श्रीसरस्वती वंदनआतां वंदूं सरस्वती । जे चित्तचेतना चैतन्यशक्ती ।जे सकळ स्फूर्तीची स्फूर्ती । अमूर्ताची मूर्ति स्वरूप जिचें ॥ ७ ॥भगवान गणेशानी ग्रंथाला अनुमोदन दिल्यानंतर ग्रंथकर्ते सरस्वतीला वंदन करतात जी चित्ताला सर्वप्रकारची चेतना देणारी चैतन्यशक्ती आहे, कार्याला स्फूर्ती देणारी स्फूर्ती आहे व जी अमूर्त(नदिसणारी)स्वरुप आहे.हंसवाहिनी हा शब्द रूढ । परी तें परमहंसी आरूढ/गुह्यार्थ जे अति गूढ । ते दावी उघड ग्रंथार्थीं ॥ ८ ॥सरस्वती हि हंसावर बसलेली आहे अस म्हणायची रुढी आहे परंतू श्रीरामकथा श्रवणासाठी चित्ताला चेतवनारी, स्फूर्ती देणारी चैतन्यशक्ती रुपी सरस्वती म्हणजेच श्रीरामकथेबद्दल आस्था असणाराच अंतकरण रूपी सरस्वती हि सामान्य हंसावर बसलेली नसून परमहंसावर आरुढ आहे कारण संत हे परमहंस आणि त्यांची श्रीराम कथेची आस्था म्हणजेच माता सरस्वती होय या आस्थेने जर आपण ग्रंथ श्रवणाला बसलो तर ग्रंथातील प्रभु चरित्र ज्यामध्ये अतिशय गुह्यार्थ दडलेला आहे तो सुध्दा आस्थावंताला उघड करुन दाखवणाऱ्या माता सरस्वतीला माझे नमन असो...परमहंस अंशाअंशीं । शोभा शोभे अहर्निशी ।सत्त्वातीत शुद्धतेसीं । तोचि निजांगासी शुभ्रवर्ण ॥ ९ ॥आस्थावंताचा अंश अंश श्रीरामकथेच श्रवण करण्यासाठी सावध असतो त्यामुळे त्यांच्या तेजस्वी आस्तिक आस्थेची शोभा रात्रंदिवस शोभायमान दिसते म्हणून नास्तिक भावनेला जन्म देणाऱ्या रज, तमाची मलिनता त्यांना स्पर्शच करत नाही हे श्रीराम भक्त सत्व भावनेच्या शुभ्र रंगापेक्षा सुध्दा जास्त शुध्द असतात कारण त्यांच जिवन हरीविन जन्म हा नर्कच आहे या भावनेवर दृढ असत आणि म्हणून श्रीराम कथेचे अधिकारी श्रोते जण पांढरे वस्त्र परिधान करतात ज्याला कोणताही कलंक नसतो अस शुध्द आस्थेच स्वरुप म्हणजेच माता सरस्वती त्यांचे वंदन ग्रंथकर्ते करतात..ॐकार तो तिचा वीणा । त्रिमात्रा तिन्हीं तंती गहना ।वेदोपनिषद पुस्तक जाणा । अर्थवी अर्थना परमार्थता ॥ १० ॥अशा सरस्वतीच्या म्हणजेच आस्थावंताच्या हातात ओमकार स्वरुपविना आहे ज्याला तिन तारा आहेत जसे ओम शब्दात तिन मात्रा आहेत त्या म्हणजेच विण्याच्या तिन तारा आणि त्याविण्याच्या तालावर वेद व उपनिषदांच सार असलेल्या देवाचे गुणवर्णन म्हणजेच परमार्थाचा अर्थ अतिशय मधुर ध्वनीत भाविक गायण करतात..ऐसी अगाधत्वें अति सुंदर । प्रभा परमार्थै मनोहर ।जेणें प्रकाशे चराचर । तो मिथ्या जगडंबर स्वप्रभा करी ॥ ११ ॥साधूच्या अंतःकरणातील सद्कार्याला चेतना तथा स्फूर्ती देणारी आणि परमार्थाची शोभा वाढवणारी दृढआस्तिक परमार्थ विस्तारवते आणि विस्तारलेल्या परमार्थाच तेज परमार्थापासून जिवाला दुर नेणाऱ्या मनाला सुध्दा हरवून श्रीराम सेवेला लावत आणि ज्या परमार्थ शोभेसमोर जग खोट दिसत आणि देव खरा दिसतो हे सामर्थ परमार्थिक आस्थेला जागवून जगाला कल्याण मार्गाला लावणाऱ्या चित्तचेतना चैतन्यशक्ती रुपी माता सरस्वती मातेला ग्रंथकर्ते वंदन करतात....ऐसी ऐकोनी स्तुती । सुप्रसन्न सरस्वती ।स्वभावेतिची वदनीं वस्ती । या वचनोक्ती ते वदवी ॥ १२ ॥अशी स्तुती ऐकून सरस्वती माता प्रसन्न झाली स्वभावत: सरस्वतीची वस्ती मुखामध्ये आहे म्हणून वक्त्याकडून आस्तिक्यतेच्या सामर्थ्याने श्रीरामकथा ती वदवत आहे.....ते म्हणे गा रामकथेतें वेगीं चालवीं भावार्थें ।सद्भावें होईल सरतें । प्रिय संतांतें मी करीन ॥ १३ ॥संत एकनाथ महाराजांनी केलेल यथार्थ स्तवन ऐकून सरस्वती मातेला एवढा आनंद झाला की ती म्हणाली नाथा तुम्ही लगेच कथेला सुरु करा सदभावाने सुरु केलेली कथा पुर्णत्वाला जातच असते आस्थावंत संतजनांना कथा आवडेलच... याची जिम्मेदारी मी स्वत: घेते अस सरस्वती म्हणतातश्रीसंत वंदनआता वंदूं संतसज्जन । जे आर्तचातकां चिद्घन ।त्रिविध तापां उपशमन । जे निजजीवन साधकां ॥ १४ ॥ग्रंथकर्ते आता त्या संतसज्जनांना वंदन करतात जे श्रीराम कथा श्रवणासाठी चातकासारखे चित्त लावून बसलेले आहेत. ज्यांच्या संगतीत आल्यानंतर त्रिविधतापांच शमन होते जे साधूजण साधकरूपी बिजवृध्दीसाठी पाणि आहेत.ज्यांची सहज झाल्या संगती । सकळ कर्मां होय निवृत्ती ।स्वधर्म सच्छांती येती । भावार्थें प्राप्ती परमार्था //१५॥श्रीराम कथेला येत असलेल्या संताची सहज संगत झाली आणि त्यांच्यासोबत कथेला आले तर कथेच्या श्रवणामुळे सर्व कर्माची समाप्ती होते व स्वधर्म कळतो आणि स्वधर्म कळाल्यावर खरी शांती मिळते आणि या कथेच्या श्रवणावर भाव ठेवला तर साधक परमार्थाला प्राप्त होतो.सत्संगाचे निजमेळीं । परमार्थ जाय पाल्हाळीं ।लगडोनि ये स्वानंदफळीं । सर्वकाळीं सफळित ॥ १६ ॥ज्यांच्या संगतीत परमार्थ प्राप्त होतो अशा साधूंचा जर मेळ असेल आणि सर्व मिळून जर श्रीरामकथेला सर्वसाधकांसह उपस्थित राहत असतील तर परमार्थ पाल्हाळी जातो आणि त्या परमार्थ वृक्षा सदोदीत स्वानंदाच फळ लागत.बीजत्वाचा ना फेडिजे देंठ । आदि मध्य नाकळे शेवट ।स्वानंद रसाळ फळघोंट । अनुभव स्पष्ट सत्संगें ॥ १७ ॥स्वानंदाचे फळ बिज, देठ, न काढता संपुर्ण खाण्यायोग्य रसाळ आहे पण ते फळ खाण्याचा अनुभव स्पष्टपणे संत संगतीत मिळतो.ऐसिया संतांचे महिमान । आकळे ऐसें कैंचें ज्ञान ।बालत्वें वोलिलो तें न्यून । द्यावें अवधान कथेसी ॥ १८ ॥ज्या संताच्या संगितीत आल्याने परमार्थ कळतो स्वानंद मिळतो त्या संताचा महिमा वर्णन करण शक्य नाही मी बालबुध्दीने बोललो परंतू ते कमीच आहे... असो श्रीराम कथा श्रवणासाठी बसलेल्या संत जणांनी कथा श्रवणाकडे लक्ष द्यावे हि विनंती.ऐसें ऐकोनि वचनस्तवन । सुखावले संतसज्जन ।तुझे मनोगतीं आमुचें मन । सदा सावधान ग्रंथार्थीं ॥ १९ ॥स्तुती ऐकूण संताना आनंद झाला आणि संत म्हणाले तुमच्या मनात रामायण सांगायचे आहे आणि आम्हाला ते ऐकायचे आहे आम्ही सदैव ग्रंथ ऐकण्यासाठी सावध आहोत.आम्हांसी आवडे रामकथा । तेथेंही तूं रसाळ वक्ता ।तरी स्तुती सांडोनि आतां । वदें ग्रंथार्था अर्थान्वयें ॥ २० ॥कारण आम्हाला श्रीराम कथा आवडते आणि तुम्ही कथा सुंदर सांगतात म्हणून लवकरात लवकर तुम्ही अर्थाच्या अन्वयाने कथा सांगावी.श्रीकुलदेवता वंदनआतां वंदूं कुळदेवतां । जे नामरूपें एकनाथा ।एकपणादेही माथां । नांदवी निजभक्तां निजान्वयें ॥ २१ ॥आता आपल्या कुलदेवतेला वंदन करुयात जी नावाने आणि रुपाने सर्वांची एकनाथ आहे म्हणजे सर्वांचा नाथ एकच आहे ज्याशिवाय सर्व अनाथ आहेत अशा अद्वैत भावनेचा बोध करून निजभक्तांना निजसत्तेने एकत्र नांदवते तिला वंदन.ऐकोनि सद्गुरूची बोली । बोधपरशुरामें निवटिली ।अनेकत्व सोडोनि वहिली । स्वयें उठली एकत्वें ॥ २२ ॥एकनाथ या सद्गुरुची एकत्वाच प्रतिपादन करणारे बोध्दस्वरुप शब्द रुपी फरशीकुर्हाडीने अनेकत्व भावनेच्या बध्दतेच निवारण केले आणि अनेकत्व भावना सोडली आणि एकतत्व नाम दृढधरी मना.... या भावनेन बुध्दी उठली अस सांगतात..... म्हणजेच एकनिष्ठ भावनेण पांडुरंगाला शरण जाण्याची शक्ती म्हणजेच कुलदेवता होयते एकरूपें एकनाथा । मूळान्वयें कुळदेवतां ।एकाकारावांचूनि सर्वथा । द्वैताची कथा करूं नेदी ॥ २३ ॥ती सर्वठायी एकरुप दाखवते सर्वान्वयाने एकतत्व प्रतिपादन करते एक भगवंता शिवाय कोणत्याही द्वैत भावनेचा संचार भक्तजनांमध्ये होऊ देत नाही म्हणून अशा कुलदेवतेला माझे वंदन असो....एकपणजनीं वनीं । एकपण मनीं नयनीं ।एकपण त्रिभुवनीं । नांदवीं म्हणोनि कुळदेवाता ॥ २४ ॥एकतत्व भगवंतच जनामध्ये,वनामध्ये, मनामध्ये, डोळ्यांमध्ये म्हणजेच संपुर्ण त्रिभुवणावर एका श्रीहरीचीच सत्ता आहे या एकतत्व भावनेण सर्वांना नांदवते म्हणूनच तिला कुलदेवता म्हणतात तिला माझे वंदन असो..ब्रह्मा आणि हरि हर । त्रिगुणी तेन्ही अवतार ।मी त्रिगुणांच परी प्रियकर । केलों साचार एकात्मता ॥ २५ ॥ब्रम्हदेव, महादेव, विष्णू हे गुणांच्या आधारे देवांचे तीन रुप झाली आहेत माझे शरीर सुध्दा तीनगुणांनीच बनले आहे परंतू माझ्या कुळदेवतेने कोणत्याही गुणांचा माझ्यावर प्रभाव पडू न देता एक हरी आत्मा जिवशिव सम याभावणेवर आम्हाला स्थिर ठेवले म्हणून तिला वंदन असो...ब्रह्मा आणि हरि हर तियेचें खेळणें जगडंबर ।मज खेळावया चिदंबर । देवोनि प्रियकर कुळदेव्या केलों ॥ २६ ॥ब्रम्हा, विष्णू, महेश हे जगाच्या निर्मिती, पोषण व विनाश करण्याचा खेळ करतात परंतू त्यांच्या पेक्षाही आम्हा एकत्व भावणेच आमच्या कुळदेवतेन पांडुरंगाच्या भक्तीच चिदंबर दिलेल आहे अशी कोणत्याही द्वेत भावनेची दृष्ठ आपल्या भक्ताला लागणारच नाही याची सतत काळजी करणारी प्रेमळ अशी आमची कुळदेवता आहे...ते जय जय जगदंबा । उदो म्हणे ग्रंथारंभा ।श्रीरामकथेची शोभा । अति वल्लभा मजलागीं ॥ २७ ॥ती संपुर्ण महाराष्ट्राला एकत्व भावणेच चिदंबर देऊन विठ्ठलाच्या भक्तिला लावणारी महाराष्ट्राची कुळदेवता आई तुळजाभवाणीचा उदो उदो ग्रंथकर्ते करतात तोपर्यंत माता जगदंबा म्हणू लागली एकनाथ महाराज श्रीरामकथा माझे स्वामी भगवान शंकरांना खुप आवडते...तेंचि भावार्थरामायण । तुज करितां निरूपण ।न्यून तें तें करीन पूर्ण । कथा संपूर्ण संपादी ॥ २८ ॥माझ्या स्वामी शंकरांना आवडणार् या श्रीरामकथेच तुम्ही निरुपण करत असताना जिथ काही कमी पडेल ते पुर्ण करून घेईल तुम्ही संपुर्ण कथा सांगा असा आशिर्वाद कुळ स्वामीनी आई तुळजाईने दिला..श्रीसद्गुरु वंदनआतां वंदूं सद्गुरू । जो स्वानंदबोधवज्रपंजरू ।ज्याचेनि हा संसारू होय सुखकरू तरणोपाया ॥ २९ ॥॥आता ग्रंथकर्ते सद्गुरुला वंदन करतात जे परमार्थापासून मिळालेला स्वानंद सांभाळण्यासाठी वज्रपंजर होऊन साधकाच अहंभावणेपासून संरक्षण करतात त्यांच्या आशिर्वादाने परमार्थाला पोषक असा संसार होतो.जेणें मस्तकीं ठेवितां हात । अहंभावा होय घात ।सोहंभाव होय प्राप्त । दावी अप्राप्त अद्वयानंद ॥ ३० ॥ज्यासद्गुरुने डोक्यावर हात ठेवल्यावर साधकातील अहंभावनेचा घात होतो व व्यापक असणार सोहंम तत्व प्रचितीला येत व कोणत्याही अनाथ साधकाला अप्राप्य, अवघड असणारा अद्वेत भावनेतील भजनाचा आनंद प्राप्त करून देतात त्यांना वंदन असो...जन तोचि जनार्दन । जनार्दन सकळ जन/एका जनार्दना शरण । मीतूंपण विरालें चिदन्वयें ॥ ३१ ॥जन हेच जनार्धन आहेत आणि जनार्दन म्हणजेच सर्वजन याप्रमाणे सर्व जगाला धरणारा एकच प्रभु आहे त्या देवाला आपलस करण्याचा उपदेश ज्यामध्ये मी व तु पणा नसुन केवळ सद्चिदानंदाचाच अन्वय आहे असा मार्ग दाखवणार्या माझ्या जनार्दन सद्गुरुरायांना वंदन असो....जनार्दना पढिये एकपण । एका पढिये जनार्दन ।स्वरूप एक नामें भिन्न । अनन्य शरण या नांव ॥ ३२ ॥सद्गुरुंना एक देव आवडतो त्या एकादेवाला जनार्दन आवडतो कारण यांची देव आणि गुरु अशी नावे भिन्न असली तरी ते एकच आहेत म्हणून ते एकमेकांना अनन्य आहेत म्हणजे अन्य नाहीत यालाच अनन्य शरण म्हणतात.जनार्दन माझे मन । जनार्दन माझे नयन ।जनार्दन वदतें वदन । वक्ता वचन श्रीजनार्दन ॥ ३३ ॥अशा सद्गुरु जनार्दन स्वामिंना अनन्य शरण गेल्यामुळे माझ मन,डोळे,बोलणार मुख हे सर्व जनार्दन झाले म्हणजे आता कथेचे वक्ते आणि वक्तृत्व स्वत: जनार्दन स्वामीच झाले आहेत.जनार्दन गतीची गती । जनार्दन मतीची मती ।जनार्दन स्फुरे स्फूर्तीं । सकळ व्युत्पत्ति जनार्दन ॥ ३४ ॥माझ्या गतिची गती, बुध्दीची बुध्दी आणि सर्व स्फुर्तीला स्फुर्ती देणारे स्वत:जनार्दनच आहेत त्यामुळे सर्व युत्पती स्वामीच आहेत.निजांगें जो सकळ जन । यालांगी नांवे जनार्दन ।लिंगदेहा करी मर्दन । यालांगी जनार्दन व्युत्पतिव्याख्या ॥ ३५ ॥सर्वव्याप्तपणे जो अंगाने सर्वजन झाला आहे म्हणून त्याला जनार्दन म्हणतात ज्याच्या व्यापकत्वापुढे लिंगदेहभेदाचे भान हारपते म्हणून व्युत्पतिव्याख्येनुसार त्यांना जनार्दन म्हणतात त्यांना माझे वंदन असो....येथे तो कर्ता मी अकर्ता । हेंही बोलणें अति मूर्खता ।मी कर्ता तो अकर्ता । हे परम मूर्खता सोलींव ॥ ३६ ॥या सद्गुरु जनार्दन स्वामींना अनन्य भावनेतून शरण गेल्यानंतर लिंगदेहभान संपुण जनार्दन व्युत्पत्ती व्याख्या अनुभुतीत आल्यानंतर कोणी कर्ता नाही किंवा अकर्ता नाही त्यामुळे कर्तुत्वभावणेची जाणीव असण हे परममुर्खतेच(साली) लक्षण आहे.यापरी मीतूपण । दूरी दवडो जनार्दन ।बोलवी भावार्थ रामायण । कथानिरूपण चालवी ॥ ३७ ॥याप्रमाणे मी आणि तु पणा सद्गुरु जनार्दन स्वामींनी दुर करावा आणि आमच्याकडून भावार्थ रामायण कथेच निरुपण करून घ्यावे.रामायणाचे मूळ कारणअजापास्नि उत्पत्तीजेत । दशेंद्रियें अति समर्थ ।जन्मला राजा दशरथ । अतिविख्यात तिहीं लोकीं ॥ ३८ ॥अज राजापासून दहाइंद्रीयांनी समर्थ तिन्ही भुवणात विख्यात असा राजा दशरथ जन्मला.मूळचे अजत्व लोपोनि चृष्टी । अजन्मा राम जन्मेल पोटीं ।हे रामायणींची मूळ गोष्टी । शास्त्रपरिपाठी परमार्थ ॥ ३९ ॥मुळस्वरूपाने अजन्मा आहे जो कधीही जन्मत नाही तो परमात्मा श्रीराम स्वत:चे अजत्व लोपवून भक्त कार्यासाठी विश्वकल्यानासाठी जन्मघेईल हि रामायणाची मुळगोष्ठ आहे आणि भक्तासाठी भगवंत अवतार घेतात हाच शास्त्रांच्या परिपाठातील गुह्य परमार्थ आहे..रावणाचे नित्यांकित । सुरवर झाले जी समर्थ ।ब्रह्मादिकां चिंता अद्भुत । तिहीं रमानाथ प्रार्थिला ॥ ४० ॥समर्थ असणारे सर्व देवलोक विश्वद्रोही रावणाचे नित्यांकित झाले त्यामुळे ब्रम्हदेवाधीक सर्वांनी महाविष्णूची प्रार्थना केली.करावया राक्षसांचा घात । मी अवतरेन रघुनाथ ।रमा मुख्य कलहा हेत । इचेनि अंत निशाचरां ॥ ४१ ॥भगवंतांनी सांगितले राक्षसांना मारण्यासाठी मी लक्ष्मीसह श्रीराम अवतार घेईल रमेच्या निमित्ताने राक्षसांचा विनाश होईल.तुम्ही सकळही सुरवर । वेगीं व्हावें वानर ।आम्ही दोघें धरोनि अवतार । सत्य करूं वचनार्थ ॥ ४२ ॥तुम्ही सर्व देवलोक लगेच वानर व्हावे मी व लक्ष्मी लगेच अवतार घेतोत, तुम्ही आणि आम्ही मिळून राक्षसांना संपवण्याच वचन सत्य करुयात.फेडावया देवांची सांकडी । स्वधर्म वाढवावया वाढी ।नामें मोक्षाची उभवावया गुढी । सूर्यवंशा गाढी दशा आली ॥ ४३ ॥देवांची बांधवडी सोडवण्यासाठी जगामध्ये नामस्मरणानेच मोक्षाला जाता येईल असा स्वधर्म वाढवण्यासाठी सुर्यवंशात भगवंताचा अवतार होणार आहे त्यामुळे सुर्यवंशाचा भाग्योदय झाला..राजा दशरथाची कथाते सूर्यवंशीं अजाचा सुत । अहमात्मा जन्मला दशरथ ।ऐका त्याचा वृतांत धर्मयुक्त स्वधर्मीं ॥ ४४ ॥सुर्यवंशामध्ये अजराजाचा मुलगा अहमात्मा म्हणजे जसा दहाइंद्रीयत आत्मा असतो व तो अजन्मा असतो तसा अजाचा मुलगा दशरथ अतिशय स्वधर्मयुक्त होता त्याचा वृतांत ऐका म्हणतात..त्यासी तिघी राणिया प्रबुद्धा । लोकोत्तर अति प्रसिद्धा ।धर्मपत्न्यां विशुद्धा । नामानुवादा अवधारा ॥ ४५ ॥त्या दशरथाला तीन प्रबुद्ध, लोकोत्तर प्रसिध्द आणि विशुध्द धर्मपत्न्या होत्या त्यांची नावे ऐका अस संत एकनाथ महाराज सांगतात..ज्येष्ठ कौसल्या ते सुद्विधा । सुमित्रा ते शुद्ध मेधा ।कैकेयी ते अविद्या । मंथरा कुविद्या तीपासीं ॥ ४६ ॥जेष्ठ कौसल्या जी सुद्विधा आहे सुमित्रा म्हणजे शुध्द बुध्दीची आहे , कैकई जी अविद्या आहे आणि तिच्याजवळ वाईटबुध्दीची मंथरा आहे अस सांगतात.उदरा येईल आदिमूर्तीं । त्या आधी नव्हती संतती ।अपुत्रपणें नृपती । पुत्रार्थीं उद्यत ॥ ४७ ॥पोटाला आदिमुर्ती भगवान अवतार घेणार आहेत याअगोदर संतती नसल्याने राजा संतती मिळावी यासाठी प्रयत्नशिल होता.सुख नेदी राजभुवन । सुख नेदी सिंहासन ।सुख नेदी भोगस्थान । मान सन्मान सुख नेदी ॥ ४८ ॥संतती नसल्याने राजाला राजमहल, सिंहासन, भोगवस्तू,मानसन्मान यातून सुख समाधान मिळत नव्हते.सुख नेदी अलं कार वस्त्र । सुख नेदी भोग कलत्र ।सुख नेदी छत्र चामर । स्तुतिस्तोत्र सुख नेदी ॥ ४९ ॥अलंकार, वस्त्र, भोग, पाहूणे, राजछत्र,केलेली स्तुती यापैकी कोणतीच गोष्ट राजाला सुख देत नव्हती.राजा पोटांतून भोगीं विरक्त । यालागीं पोटा येईल रघुनाथ ।जो अत्यंत विषयासक्त । त्यासी भगवंत स्पर्शेना ॥ ५० ॥राजा सर्व विषयभोगाबाबतीत विरक्त असल्याने पोटाला भगवान येणार आहेत जे विषयाधिन असतात त्यांना भगवान स्पर्शसुध्दा करत नाहीत.जेवीं आंधळे न देखे पिता । तेवी विषयी नेणती भगवंता ।तोच त्यांचा प्रतिपाळिता । देखणी अवस्था त्यां नाहीं ॥ ५१ ॥ज्याप्रमाणे आंधळा आपल्या वडीलांना सुध्दा पाहू शकत नाही तसेच विषयांध व्यक्तीचा सांभाळसुध्दा भगवंतच करतो तरी सुध्दा ते भगवंताला ओळखू शकत नाहीत.दशरथा न गमे जनस्थानीं । निघाला पारधीलागीं वनीं ।विचरे एकाकी होऊनी । आवडे विजनीं रहिवास ॥ ५२ ॥राजाला लोकांमध्ये करमत नाही म्हणून तो पारधीसाठी वनामध्ये गेला एकटे राहणे राजाला आवडू लागले.दुसरियाचा सहसा घात । सर्वथा न मानी दशरथ ।हृदयीं कळवळला रघुनाथ । झाला विरक्त सर्वार्थीं ॥ ५३ ॥इतरांचा घात करावा असे दशरथाला आजिबात वाटत नव्हते कारण ह्रदयामध्ये श्रीराम होते त्यामुळे तो सर्व विषयांवर विरक्त होता.वनीं एकाकी विहार । करी वनफळांचा आहार ।नावडे राजोपभाग उपचार पुत्रार्थीं थोर साक्षेपीं ॥ ५४ ॥राजा वनात एकट राहूण वनफळांचा आहार करू लागला राजभोगामध्ये मनरमत नव्हते पुत्रप्राप्तीबद्दल राजाला खुप अपेक्षा होती.श्रावणाची कथाहोणारासारखी बुद्धी । मांडली निशि अवस्था पारधी ।अंधारीं श्रावणातें वधी । मातापिता खांदी कावडीसी ॥ ५५ ॥काही होणारच असेल तर त्या अनुकुल बुध्दी कार्य करते कारण ते नियतीला मान्य असत तसच एकारात्री राजाने अंधारात मातापिता कावडीमध्ये खांद्यावर घेतलेल्या श्रावणाला मारले.लौकिकाची लोकवार्ता । श्रावणें पितरें कावडी ठेवतां ।हे तंव समूळ अबद्ध कथा । तो मातापिता न विसंबे ॥ ५६ ॥लोक अस म्हणतात की श्रावणाने मातापिता कावडीत ठेवले परंतू तो माता पित्याला सोबतच वागवत होता थोडाही विसरत नव्हता.अंधारीं अंध माता-पिता । झाडीं ठेवी हे मिथ्या वार्ता ।खांदीं घेवोनि ताता । जीवनार्थ तो आला ॥ ५७ ॥अंधारामध्ये तो मायबापांना ठेवेल हि वार्ता खोटि आहे तर तो मायबाप खांद्यावरच घेऊन पाण्यासाठी आलेला होता.बुडबुड कमंडलूच्या शब्दीं । ध्वनी उठली जळसंनिधी ।दशरथ केवळ शब्दवेधी । बाणवेधी विंधिला ॥ ५८ ॥कमंडलू पाण्यात बुडाल्यावर बुडबुड असा आवाज हिंस्रप्राणी जिभेणे पाणि पिताना तसाच आवाज येतो म्हणून शब्दवेधी दशरथाने बाण विधीला.घाव लागता संपूर्ण । काय बोलिला श्रावण ।कोण्या सभाग्याचा बाण । रामस्मरणेंसी आला ॥ ५९ ॥बाणाचा घाव लागल्यानंतर श्रावणाला जिवजाण्याची भिती किंवा चिंता वाटली नाही तर श्रीरामनामांकित बाण लागल्यामुळे आनंद झाला म्हणून श्रावण म्हणतो कोणत्या भाग्यवंताचा बाण आहे ज्यामुळे मला श्रीरामाच स्मरण झाले. एवढ रामनामाच महत्व आहे.श्रावणासी बाण लागतां । नठवेचि मातापिता ।नाठवेचि देहममता । राम स्मरतां देह त्यागी ॥ ६० ॥संत एकनाथ महाराज सांगतात एक क्षण सुध्दा माय बापाला न विसरणार श्रावण परंतू बाण लागल्यानंतर त्याला मायबाप आठवले नाहीत तारुण्यात माझा मृत्यू होतोय देह पडतोय याच दुख झाले नाही तर श्रीरामाच स्मरण झाले याचा आनंद श्रावणाला झाला व आनंदाने त्याने जिव सोडला.अंतरीं श्रीरामस्मरण । परम भाग्य हें कल्याण ।बाण नव्हे तो ब्रह्म पूर्ण । स्मरणेंसीं प्राण त्यागिला ॥ ६१ ॥अंतकरणात सदैव श्रीरामस्मरण करणे हे कल्याण करणार्या परम भाग्याचे लक्षण आहे त्यामुळे श्रीरामनामांकित बाण हा पुर्ण ब्रम्ह स्वरुपच होता तो लागताच श्रीरामाच्या स्मरणासह श्रावणाने जिव सोडला.दशरथ बोलिला आपण । कोण्या साधूचें हें वचन ।माझ्या पापाचें न्र्दळण । केलें संपूर्ण रामनामें ॥ ६२ ॥श्रावणाने केलेले श्रीरामस्मरण ध्वनी दशरथाने ऐकला आणि दशरथ म्हणू लागला कोण साधु आहे ज्यांनी केलेल्या श्रीरामस्मरण माझ्याकाणावर पडल्याने माझे सर्व पाप नाहीसे झाले.श्रीरामनाम स्वयें ऐकतां । रायासी न बाधे ब्रह्महत्या ।रामस्मरणें देह त्यागितां । नित्य मुक्तता श्रावणासी ॥ ६३ ॥श्रीरामाचे नाव ऐकल्याने दशरथाला ब्रम्ह हत्येचे पाप लागलेच नाही नामस्मरणामुळे देहांताची व्यथा श्रावणाला झाली नाही श्रावण नित्यमुक्त झाला तर दशरथ पापमुक्त झाला त्यामुळे(स्वधर्मे निधनंम श्रेयो:परधर्मो भयावह) कारण स्वधर्मात लोक रामराम करुन व्यवहार करतात त्यामुळे दोन्ही बाजूंच कल्याणच होत परंतू श्रीराम स्मरण नसलेल्या श्रीरामद्वेषी कोणत्याही प्रवृत्तींशी ठेवलेल सौजन्य नर्कालाच घेऊन जात... कारण हरीविन जन्म नर्कची पै जाणा यमाचा पाहूना प्राणी होय.रामनामें नित्य निर्धूत । एक मुक्त एक पापातीत ।ब्रह्महत्येसीं दशरथ । अति अलिप्त रामनानें ॥ ६४ ॥रामनामामुळे एक मुक्त झाला तर एक पापा वेगळा कारण सदैव श्रीराम नामस्मरण हा आपला स्वधर्म आहे आणि स्वधर्म वर्तनात पापाचा संचार होतच नाही म्हणून ब्रम्ह हत्येचे पाप राजाला लागलेच नाही.दशरथ जंव येवोनि पाहे । तंव श्रावण बाणें विंधिला आहे ।त्याच्या पितरें पुत्रमोहें । राजा लवलाहें शापिला ॥ ६५ ॥राजा दशरथ श्रावणाजवळ येऊन पाहतात तर श्रावणाला बाण लागलेला दिसला श्रावणाचे माता पित्याने दशरथाला शाप दिला. एक गोष्ट लक्षात घ्यावी त्याक्षणी श्रीरामाच स्मरण नसल्याने माझा मुलगा या ममतेने प्रवृत्त होऊन श्रावणाच्या मातापित्याने शाप दिला परंतू स्मरणात असलेला राजा व श्रावण द्वेत भावनेच्या वेगळे होते हे स्मरणाचे महत्व आहे.आम्हांसी दिधले पुत्रदुःख । तूही पावसी पुत्रशोक ।शापें रायासी परम हरिख । मी पुत्रमुख देखेन ॥ ६६ ॥राजा तु आम्हाला पुत्रशोक दिलास तुला सुध्दा पुत्रशोक होईल असा शाप दिल्यानंतर राजाला आंदन झाला की मला नक्की संतती होणार आहे जिथ निष्ठेने श्रीरामस्मरण आहे तिथे शापसुध्दा सुखात परिवर्तीत होतो आणि जिथ श्रीरामाचा विसर आहे तिथला आशिर्वाद सुध्दा दु:ख देणारा असतो.ब्राह्मणशाप नव्हे वृथा । मी पुत्र पावेन सर्वथा ।परम आल्हाद दशरथा । आनंद चित्ता वोसंडे ॥ ६७ ॥ब्राम्हण शापाने मला मुलगा होणार हे निश्चित झाल्याने राजाला परम आनंद झाला.शाप नव्हे परमामृत । उल्हासे रायाचें चित्त ।पोटीं प्रकटेल रघुनाथ । शाप दशरथा सुखरूप ॥ ६८ ॥शाप नसुन ते परमामृत होत कारण पोटाला श्रीराम येणार होते राजाला शापामुळे अतिशय सुख झाले.पुत्र झाले इत्थ्ंभूत । ऐसा मानिला निश्चितार्थ ।हृदयीं संचरला रघुनाथ । उद्वेगरहित यालागीं ॥ ६९ ॥मला आता निश्चित मुल झालेच असा निश्चय राजाने केला ह्रदयात श्रीराम प्रगट झाला त्यामुळे राजा उद्वेगरहित झाला.शाप देवोनि दारुण । तिहीं दोघीं सांडिला प्राण ।तिघांसी देवोनि दहन । उत्तरविधान करविले रायें ॥ ७० ॥शाप दिल्यानंतर श्रावणाच्या पितरांनी देहसोडला राजाने तिघांचे उत्तर कर्म केले.श्रावणाचा पूर्वजन्म वृत्तांतजळचर पक्षियांचे युग्म । त्यांसी एका मीनासी मित्रत्व परम ।तया समकाळें मरणधर्म । झाला तो जन्म मागील ॥ ७१ ॥एकजळचर मासा आणि दोन पक्षी यांची पुर्वजन्मी खुप मैत्री होती व त्या जन्मात हे तीनही एकदाच मृत्यु पावले होते.आटतां देखोनि सरोवरा । शीतळ निशिये चंचुभारा ।धरोनिया तया मकरा । अगाध नीरा स्नेहें नेत ॥ ७३ ॥मासा ज्या तळ्यात राहत होता तिथले पाणि आटू लागले म्हणून दोन्ही पक्षांनी आपल्या चोचीमध्ये त्या मास्याला घेऊन जिथ भरपूर पाणि आहे तिकडे प्रेमाने घेऊन जाऊ लागले.तंव मार्गीं वन तें नवखंड । तेथोनि उसळले बेलुकांड ।तें मत्स्यांतें लागता चंड । पहिला दुखंड धरणिये ॥ ७३ ॥वाटेत जाताना वेळूचे वन होते व वेळूचा फाटा चंचुतील मास्याला लागला आणि तो जमीनीवर पडून त्याचे दोन तुकडे झाले.तेणें दुःखे गृध्रीं दोघीं । देह ओपिले तयालागीं ।तेचि ऋणानुबंधयोगी । धरिले तिघीं नरदेह ॥ ७४ ॥त्यावेळी मासा मेला यादु:खाने ते पक्षी सुध्दा गतप्राण झाले व नंतर ते तिघेही मनुष्य जन्माला प्राप्त झाले.मत्स्य तोचि श्रावण जनीं । पक्षिये ते जनक जननी ।एके अवसरीं निमाले तिन्ही । ऐसी पुराणीं मूळकथा ॥ ७५ ॥तो मासा म्हणजे श्रावणबाळ, ते पक्षी म्हणजे आई वडील आणि याही जन्मात ते एकदाच मृत्यू पावले अशी कथा पुराणात आहे.ब्रह्महत्येचे दुष्परिणामराजा रामनामें दोषातीत । तरी लोकप्रवृत्तिशास्त्रार्थ ।अश्वमेध करी दशरथ । वसिष्ठयुक्तविधाने ॥ ७६ ॥श्रीरामनामस्मरणामुळे राजाला ब्रम्ह हत्येचे पाप लागलेच नव्हते तरीही लोकांना आदर्श देण्यासाठी ब्रम्हहत्येचे प्रायश्चित म्हणून राजा दशरथाने वशिष्ठ ऋषींकडून विधियुक्त अश्वमेध यज्ञ करुन घेतला.फेडावया ब्रह्महत्याडाग । केला अश्वमेधयाग ।राजा शुद्ध झाला सांग । परी राष्ट्रीं भंग मांडिला ॥ ७७ ॥ब्रम्ह हत्येचा डाग फेडण्यासाठी अश्वमेधयाग करून राजा लोकप्रवृत्ती आणि श्रीरामनामाने म्हणजेच आध्यात्मशास्त्राने निष्कलंक झाला तरीही राजाच्या राज्यात दुष्काळ पडला.जें राज्यीं ब्रह्महत्या घडे । ते राज्यीं पर्जन्य न पडे ।शुक्रें धरियले पाणियाडें । अवर्षण पडे बहुकाळ ॥ ७८ ॥ज्या राज्यात ब्रम्हहत्या घडते त्या राज्यात दुष्काळ पडतो असे शास्त्र आहे राजा ब्रम्हहत्येपासून मुक्त होता परंतू इंद्रपदावर राक्षस होते राक्षस सज्जनाला खोट्या आरोपाखाली त्रास देण्यासाठी उतावीळ असतात म्हणून शुक्राचार्याने राजा दशरथाच्या राज्यातील पाऊस थांबऊन दुष्काळ पाडला.तृणाची काडी न मिळे । उष्णें झाडोरे करपले ।वृक्ष शेंडियास वाळले । सरितांचे शोषिले जळस्रोत ॥ ७९ ॥गवताची काडी मिळत नव्हती, झाडे करपून, शेंडे वाळून गेले , नद्यांचे पाणि आटले.प्रजा घरोघरी आक्रंदती । गाई हंबरडा फोडिती ।द्विजांची नित्यकर्में राहती । हाहाभूत क्षितीं प्राणिमात्र ॥ ८० ॥जनता घरोघर आक्रंदन करू लागले, गाई हंबरडा फोडू लागल्या, ब्राम्हणांची नित्यकर्म थांबली होती. सर्व प्राणिमात्रांमध्ये हाहाकार माजला.दैत्यगुरूशी दशरथाचे युद्धदेखोनि भूतांची दशा ऐसी । राजा कळवळला मानसीं ।शुक्रें धरिलें पाणियाडासी । त्यासी युद्धासी निघाला ॥ ८१ ॥सर्व प्राणीमात्रांची अशी दशा बघीतली राजाच्या मनात कळवळा आला शुक्राने पाणि आडवले म्हणून राजा त्याच्यासोबत युध्दाला निघाला.दशरथाची शक्ति कैसी । रथ चालविला स्वर्गासी ।कैकेयी चालली रायासरसी । राहवितां तिसी न राहे ॥ ८२ ॥बलवान असलेल्या दशरथाची शक्ती कशी आहे त्याने रथ स्वर्गाकडे मार्गस्थ केला. कैकई राणी सोबत येण्याचा आग्रह करू लागली तिला घरी थांबवण्याचा प्रयत्न केला तरीही ती थांबत नव्हती.तुम्ही जाल स्वर्गाप्रती । मी पाहीन स्वर्गसंपती ।वसिष्ठ म्हणें न्यावें निश्चिंती । भविष्यस्थिती जाणोनि ॥ ८३ ॥ती राजाला म्हणत होती मला स्वर्गाची संपत्ती पहायची आहे राजाने राणीला नेण्याबद्दल वशिष्ठ ऋषींना विचारले असता भविष्याचा विचार करून ऋषींनी राणिला स्वर्गाला नेण्याची परवानगी दिली.रायासीं तिचे अति प्रीती । प्रीतीनें बैसविली रथीं ।क्षणार्धें शक्रलोकप्रती । आला भूपति संग्रामा ॥ ८४ ॥राजाला कैकई खुप आवडत होती म्हणून राजाने तीला प्रेमाने रथात बसवले व क्षणात रथ युध्दासाठी स्वर्गाला नेला.परम योद्धा श्रीरामजनक । देखोनि शुक्रें घेतला धाक ।साह्य दैत्यसेना अनेक । दशरथें एकैक खिळिले बाणीं ॥ ८५ ॥श्रीरामाचे पिता राजा दशरथ हे पराक्रमी योध्दा होते त्यांची शुक्राने भिती घेतली त्याला साह्य असलेल्या एका एका दैत्याला बाणाने त्रस्त केले.वृषपर्वा तेजोराशी । रायें विरथ केले त्यासी ।मुकुट पाडोनि भूमीसीं । मोकळे केशीं पळविला ॥ ८६ ॥इंद्राच्या पदावर असलेला वृषपर्वा राक्षस राजाने विरथी केला त्याचा मुकुट जमीनीवर पाडला आणि मोकळ्या केसांनी दैत्य पळवून लावला.वृषपर्वा जो दैत्यनाथ । युद्धीं झाला हताहत ।देखोनि दैत्यसेना समस्त । पळे कुंथत रणघायीं ॥ ८७ ॥वृषपर्वा दैत्यांचा राजा हतबल झालेला पाहून राक्षससैन्य कन्हत कुंथत पळाले.शुक्रें युद्ध केलें अनेक । दशरथ योद्धा अति अचूक ।सिंहनाद करोनि देख । शुक्रासंमुख लोटला ॥ ८८ ॥आजपर्यंत शुक्राने अनेक युध्द केले परंतू दशरथासारखा अचुक संधान साधणारा त्याला मिळाला नव्हता दशरथाने सिंहनाद करून शुक्राच्या समोर युध्दासाठी रथ आणला.शुक्रें केले अलोलिक । अचूक छेदिला रथाचा आंख ।कैकेयीनें बाहु घातला देख । तेणें पराङ्मुख नव्हेचि राजा ॥ ८९||शुक्राने दशरथाच्या रथाचा आंख मोडला कैकयीने त्याठिकाणी हात घातला व राजाला सहकार्य केले त्यामुळे राजाचा पराभव झाला नाहीरामप्रताप दशरथ पोटीं । तेणें झांकली शुक्राची दृष्टी ।धाकें पळे उठाउठीं । दिधली पाठीं संग्रामी ॥ ९० ॥श्रीरामांच सामर्थ दशरथाच्या उदरात असल्याने दशरथ अतिशय तेजस्वी दिसत होता त्याच्या तेजामुळे शुक्राची दृष्ठी झाकली शुक्राला काही दिसत नव्हते त्यामुळे तो पाठ देऊन पळाला.दशरथाचा विजयब्राह्मण म्हणोनि राखिला हात । येरवीं तत्काळ करिता घात ।विजयी झाला जी दशरथ । हर्ष अद्भुत सुरनरां ॥ ९१ ॥ब्राम्हण म्हणोनी शुक्राचा जिव न घेता त्याला पळवून लावले आणि राजा दशरथ विजयी झाला सर्व देव लोकांना आनंद झाला.मोकळे झालें पाणियाडें । तत्काळ तेथें पर्जन्य पडे ।फिटले गाईंचे साकडें । ब्राह्मणीं रोकडे मांडिले याग ॥ ९२ ॥आवडलेला पाऊस पडला गाई, ब्राम्हणांचे सांकडे सुटले, ब्राम्हणांनी यज्ञ सुरु केले.चालिले स्वहास्वधाकार । हरिखले देव पितर ।दशरथावरी अपार । सुमनसंभार वर्षले ॥ ९३ ॥यज्ञाच्या माध्यमातून स्वहा, स्वधाकार सुरु झाले म्हणजेच देव पितरांच्या नावाने यज्ञात आहुती पडू लागली सर्वजण तृप्त झाले. दशरथावर सर्वजण फुलांचा वर्षाव करू लागले.अवघे करिती जयजयकार । इंद्रासी आल्हाद अपार ।दैत्य पराभविले थोरथोर । तेणें अमरेंद्र संतोषला ॥ ९४ ॥सर्वजण जयजयकार करू लागले इंद्राला खुप आनंद झाला. मोठमोठ्या दैत्यांचा पराभव झाला व गेलेले इंद्रपद परत मिळाले.दिव्यांबरे अलंकार । रायासी दिधले अपार ।इंद्रें सन्मान केला थोर । अवघे सुरवर संतुष्ट ॥ ९५ ॥दिव्य अलंकार वस्त्रे देऊन इंद्राने राजाचा मोठा सन्मान केला सर्व देव जनांना अतिशय आनंद झाला.पराभविलें दैत्यगुरूसी । अति आनंद बृहस्पतीसीं ।तेणें सन्मानिलें दशरथासी । धरिले पोटासीं स्वानंदे ॥ ९६ ॥दैत्यगुरू शुक्राला पळवल्यामुळे देवांचे गुरु बृहस्पतीला आनंद झाला. त्यांनी दशरथाला आनंदाने पोटाला धरुन सन्मान दिला.बृहस्पतींचा वरदेवगुरु वरद वदत । जे जे तुझे मनोरथ ।सिद्धि पावतील समस्त । जाण निश्चित नृपनाथा ॥ ९७ ॥देवांचे गुरु दशरथाला वरदान देतात राजा तुझी जी इच्छा ती निश्चित पुर्ण होईल.तुज होईल पुत्रसंतती । ते मी सांगेन श्रेष्ठ युक्ती ।याग करावा अयोध्येप्रती । विभांडकाहातीं पुत्रेष्टी ॥ ९८ ॥तुला पुत्रसंतती होईल, त्यासाठी मी मोठी युक्ती सांगतो पुत्र व्हावेत म्हणून तु अयोध्येमध्ये पुत्र कामेष्ठी यज्ञ कर.विभांडक नित्य वनवासी । तो भेटी न देईल तुम्हांसी ।मृगीसुत पुत्र त्यासी । ऋष्यशृंग तया नाम ॥ ९९ ॥विभांडक हे सतत वनात राहतात ते तुम्हाला भेटणार नाहीत. हरणीपासून त्यांना झालेला एक मुलगा आहे त्याच ऋष्यशृंग अस नाव आहे.तो प्रमदामदें वेधवोन । नगरा आणावा छळून ।येतांच त्याचें आपण । करावें लग्न निजकन्येसी ॥ १०० ॥त्याला स्त्रियांचे आकर्षण दाखवून अयोध्येत आणावे व आणल्यावर लगेच त्याचे स्वत:च्या मुलीबरोबर लग्न लावावे.तुज नाहीं गा संतान । यालागीं तुझा निजमित्र शांतन ।तेणें तुज दिधलें कन्यारत्नी । ते शांतनेसीं लग्न करावें ॥ १ ॥तुला संतान नसल्याने तुझा मित्र शांतन याने तुला दिलेली मुलगी शांतनेशी ऋष्यशृंगाचा विवाह करावा.इंद्र म्हणे दशरथासी । आणावया ऋष्यशृंगासी ।अप्सरा धाडीन तुजपासीं । त्या तत्काळ त्यासी आणतील ॥ २ ॥इंद्र दशरथाला म्हणाला ऋष्यशृंगाला आणण्यासाठी मी अप्सरा पाठवतो त्या तात्काळ त्यांना अयोध्येला आणतील.कैकयीला राजाचे वरदानयुद्धीं रथीं सूदलें बाहूसी । राजा तुष्टला कैकेयीसी ।म्हणे देईन जें जें मागसी । ऐसी भाक तिसीं दिधली ॥ ३ ॥युध्दावेळी कैकयीने आखामध्ये हाथ घातल्याने राजा कैकयीवर प्रसन्न झाला. आणि म्हणू लागले तु जे जे मागसील ते ते मी देईन ही माझी प्रतिज्ञा आहे.तंव ते बोलली आपण । तुझेनि मज काय अपूर्ण ।स्वर्गादि दिव्य भूषण । मी भोगी आपण तुझेनि ॥ ४ ॥कैकयी म्हणू लागली राजा तुझ्यामुळे मला स्वर्गाचे वैभव भोगायला मिळत आहे दिव्य आभूषण आहेत आणखी मला काहीच नको.कल्पतरुपारिजातमाळा । तुझेनि शोभती माझिया गळा ।स्वर्गसुखाचा सोहळा । भोगिजे स्वलीळा तुझेनि ॥ ५ ॥कल्पतरू पारिजातकाच्या माळा तुझ्यामुळे माझ्या गळ्यात शोभत आहेत स्वर्गभोगत आहे आणखी मला काय पाहिजे.येणेंचि शरीरें आपण । तुझेनि भोगी स्वर्गभुवन ।तुझेनि आम्हा काय न्यून । मी सुखसंपन्न तुझेनि ॥ ६ ॥जिवंत असतानाच मला तुझ्यामुळे स्वर्गाचे वैभव मिळत आहे मला काय कमी आहे तुझ्यामुळे मी संपुर्ण सुखी आहे अस कैकयी म्हणू लागली.हासोनी बोलली रायासी । तुम्हीं मज दिधले भाकेसी ।ते मी मागेन काळविशेषी । यथाकाळेंसीं अनुकूल ॥ ७ ॥मला काहीच नको म्हणली परंतू हासून सहजच म्हणाली तु मला शब्द दिला आहेस तर योग्यवेळी,विशेषवेळी,अनुकुलता पाहून मागेण म्हणाली.(हेच राजाला महागात पडले, खुप प्रसन्न होऊन भविष्याबद्दल पुरुषाने स्त्रिला कधीच शब्द देऊ नये. )राजा म्हणे सत्य वचन । हें माझें भाष्यवरदान ।जेव्हा तूं मागसील आपण तत्काळ जाण मी देईन ॥ ८ ॥राजा आनंदाच्या भरात म्हणाला माझा शब्द खरा आहे जेव्हा केव्हा तु काहीही मागशील तेव्हा मी तुला तात्काळ देईल.ऐसी दशरथाची ख्याती । स्वर्गीं देव वानिताती ।दिग्गज वर्णिती दिगंती । कीर्ति त्रिजगतीं विस्तारली ॥ ९ ॥दशरथाची किर्ती स्वर्गामध्ये देवलोक वर्णन करू लागले, मोठमोठी दिग्गज सर्व जगभर दशरथाच्या किर्तीच वर्णन करू लागले अशाप्रकारे त्रिभुवनात दशरथाच्या कीर्तीचा विस्तार झाला.यश कीर्ति औदार्य । गुणगांभीर्य अति धैर्य ।दशरथाचे वीर्य शौर्य । स्वर्गीं सुरवर वानिती ॥ ११० ॥यश, किर्ती, औदार्य, गुण, गांभिर्य, धैर्य, विर्य, शौर्य संपन्न असा राजा दशरथ आहे अशी देवजन किर्ती वर्णन करू लागले.देवां दैत्यगुरु अदट । त्याचा हरितला प्रताप श्रेष्ठ ।वीर दशरथ सुभट । प्रवाद पाठ तिहीं लोकीं ॥ ११ ॥देवांना त्रास देणारा दैत्यगुरु शुक्राच्या प्रतापाचे हरण करून श्रेष्ठ दशरथाने किर्ती केली असे सर्वजन वर्णन करतात.उदरा येईल रघुनाथ । सकळ संपदा आलिया तेथ ।श्रिया विराजमान होत । श्रीमंत दशरथ यालागीं ॥ १२ ॥उंदराला श्रीराम येणार आहेत म्हणून सर्वश्री दशरथाकडे येऊन विराजमान झाली होती म्हणून दशरथ श्रीमंत होता.स्वर्गीं दशरथ भूपाळ । इंद्रे राहविला बहुकाळ ।अति प्रीतीचा कल्लोळ । दिव्य भोग सकळ भोगविले ॥ १३ ॥स्वर्गामध्ये इंद्राने पाहुना म्हणून दशरथाला भरपूर दिवस प्रेमाने ठेऊन घेतले होते सर्व भोग भोगून घेतले.अयोध्येत दशरथाचे अपूर्व स्वागतयेवढेनि बहुमानैश्वर्येंसीं । राजा आला अयोध्येसीं ।मखरें तोरणें चौपासीं । नरनारींसी आल्हाद ॥ १४ ॥बहुमान, ऐश्वर्यासह राजा अयोध्येला आला अयोध्येत सगळीकडे मखरे, गाड्या, तोरणे लावली होती नरनारींमध्ये आनंद होता.घरोघरीं गुढिया उभारिती । पदोपदीं आरत्या करिती ।बंदिजन कीर्ति गाती । ओंवाळिती धनधान्यें ॥ १५ ॥घरोघरी गुढ्या उभारल्या होत्या पावलो पावली लोक राजाची आरती करत होते. बंदिजन किर्ती वर्णन करत होते. राजावरून धनधान्य ओवाळून टाकत होते.ब्राह्मण जपती शांतिपाठ । भाट गर्जती उद्भट ।नरनारी पाहती घनदाट । पायवाटे नेती घडिया ॥ १६ ॥ब्राम्हण शांतिपाठ जपत होते, भाट स्तुती करतात नरनारी गर्दिकरु राजाकडे पाहती होती राजाला शुभशकुन म्हणून स्त्रिया घागरी नेत होत्या.दशरथाचा प्रताप गहन । मी बोलिलो अल्प जाण ।सकळ आकळिता निरूपण । कथा असाधारण वाढेल ॥ १७ ॥संत एकनाथ महाराज सांगतात राजा दशरथाचा प्रताप खुप मोठा आहे मी थोडक्यात वर्णन केला आहे. सर्व वर्णन करायचे म्हणल्यास ग्रंथ खुप वाढेल अस म्हणतात..अफाट न करावा ग्रंथ । ग्रंथीं बोलावा मुख्यार्थ ।पदीं दावावा परमार्थ । हा निजस्वार्थ कवित्वाचा ॥ १८ ॥अफाट ग्रंथ वाढवू नये. ग्रंथातील मुख्यार्थ प्रतिपादनाकडे वक्त्याचे लेखकाचे लक्ष असले पाहिजे, प्रत्येक पदातून परमार्थच प्रतिपादन करणे आणि श्रोत्याला संत बनवणे हाच कवित्वाचा निजस्वार्थ आहे अस संत एकनाथ महाराज सांगतात. म्हणून वक्ता, वाचक तथा सर्वांनीच या गोष्टीकडे लक्षद्यावे की आपली प्रत्येक कृती ही समाजाला श्रीराम सांगण्यासाठी समर्पित असली पाहिजेत, समाजमनावर श्रीरामभक्ती बिंबवणे हाच आपला स्वार्थ आहे.एका जनार्दना शरण । दशरथप्रतापलक्षण ।कथा झाली हे संपूर्ण । श्रीरामागमन अवधारा ॥ ११९ ॥एका जनार्दन स्वामींना शरण जाऊन ग्रंथ कर्ते सांगतात या अध्यायामध्ये दशरथाच्या पराक्रमाचे वर्णन झाले आहे.आतापुढे श्रीरामाच्या अवताराबद्दलची कथा ऐकावी.स्वस्ति श्रीभावार्थरामायणे बालकांडे एकाकारटीकायांदशरथविजयाभिगमनं नाम प्रथोमोऽध्याय ॥ १ ॥॥ ओव्या ११९ ॥ श्लोक २ ॥ एवं १२१ ॥
सार्थ भावार्थ रामायण बालकांड अध्याय १ चे
यजमान: श्री शिवाजी लक्ष्मण मुंडे साहेब
सेवानिवृत्त स्टेशन मास्टर दक्षिण मध्य रेल्वे
जर कोणाला सार्थ ग्रंथातील अध्यायाचे यजमान व्हायचे असेल तर संपर्क साधावा:श्री हभप रामायणाचार्य वैजनाथ महाराज गुट्टे मो.9096232893
अनुवादरामभक्त श्री वैजनाथ सुर्यप्रकाश गुट्टेआस्था भावार्थ रामायण युट्युब चॅनलवरील कथा आवश्य ऐकावी व प्रतिक्रिया द्याव्यातरामकृष्णहरीसंपर्क :vsgutte10@gmail.comसहयोग हेतू:फोन पे 9096232893

Jay Shree Ram
ReplyDeleteRam krushana hari
ReplyDelete